Tuesday, September 16, 2025
Homeलेखबातमीदारी करताना

बातमीदारी करताना

किरण ठाकूर आणि किरण ठाकुर ची गोष्ट 
किरणचंद्र कन्हैयालाल ठाकूर हे माझे शाळेतले नाव. पत्रकारितेच्या अभ्यासासाठी पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूट बिल्डिंग मध्ये १९६९-७० मध्ये प्रवेश केला तेव्हा लेखनासाठी लेखक म्हणून वेगळे नाव नव्हते. मी विजय तेंडुलकर यांचा फॅन होतो. त्यांची नाटके आणि वृत्तपत्रीय लेख खूप आवडायचे. विशेषतः साप्ताहिक माणूस मधील लेख तेव्हा खूप गाजायचे. फॅन म्हणून त्यांना काही पत्रे देखील लिहिली होती. त्यांची सुंदर हिरव्या शाईत लिहिलेली एक दोन पत्रे मला आली होती. ती अजूनही मी जपून ठेवली आहेत.

तेव्हा ते लोकसत्ता मध्ये सहायक संपादक होते. रविवारच्या पुरवणीसाठी एक लेख लिहिला आणि त्यांच्याकडे पाठवला. त्यावेळी सुद्धा माझे हेच पूर्ण नाव दिले होते. आठ-पंधरा दिवसात तो छापून आला. तेंडुलकरांनी त्याचे संपादन केले असे मला उगीचच वाटलं. त्यांनी लेखकाचे म्हणजे माझे नाव बदलून छोटे सहा अक्षरी किरण ठाकूर असे छापले. त्या लेखाच्या शीर्षकात तेरा शब्दांचा मोठा मधळा बसला नाही, म्हणून सहा अक्षरात बसवला. माझ्या नामांतरा चे श्रेय अशा त-हेने विजय तेंडुलकर यांना जाते.

पण या बदलामुळे पुढे आयुष्यात खूप गमती जमती घडल्या आणि अजूनही माझ्या वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी घडत आहेत. त्याची ही गोष्ट;

शेक्सपियर ने नावात काय आहे ? असे म्हणून ठेवले असले तरी नावात खूप गमती जमती करण्याची क्षमता आहे. ती कशी त्याची पार्श्वभूमी आधी.

किरण ठाकूर

विजय तेंडुलकरांमुळे लोकसत्तेत मी किरण ठाकूर नावाने लेख लिहिला. त्यानंतर माणूस, वाङ्मयशोभा, मनोहर, अमृत, सकाळ अशा ठिकाणी हेच नाव कायम राहिले. वडिलांना खूप कौतुक वाटायचे. त्यावेळी ते नाशिकला राहत असत. शहरभर आपल्या सर्व मित्रांना तो अंक दाखवायला ते घेऊन जायचे. लेखावर ‘त्याचे नाव ‘किरण ठाकूर’ असले, पण तरी तो माझाच मुलगा “किरणचंद्र कन्हैयालाल ठाकूर” आहे बरं का असे मित्रांना गमतीने सांगायचे. तेव्हा किरण ठाकूर नावाची दुसरी कुठली व्यक्ती असेल असे ध्यानी मनी देखील नव्हते.

पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर इंग्रजी वृत्तपत्र संस्थे मधली पहिली नोकरी करण्यासाठी दिल्लीला गेलो. काही महिन्यातच राजधानीतील मराठी पत्रकारांच्या ओळखी झाल्या. महाराष्ट्रातील महत्त्वाची मंडळी दिल्लीत आली की पत्रकारांना निरोप जायचे आणि मग सगळ्यांनी एकत्रित भेटायचं अशी प्रथा होती. काहीवेळा बातमीचा विषय असेल तर त्यासाठी भेटीगाठी घ्यायच्या असा उपक्रम सुरू असायचा.

एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते बाबुराव ठाकुर आपल्या काही कामासाठी आले होते हे कळल्यावर त्यांना भेटायला त्यांच्या हॉटेलवर मी गेलो. इंटरकॉम फोनवर निरोप दिला किरण ठाकुर म्हणून नाव सांगितलं. ते अत्यंत त्वरेने बाहेर आले. कुठे आहे किरण म्हणून शोधू लागले. मी तर समोरच होतोय. मग मी स्वतःची ओळख दिली. तेव्हा त्यांचा हिरमोड झाला. त्यांना अपेक्षा होती त्यांचा सुपुत्र किरण बेळगावहुन अचानक दिल्लीत आला आहे ! घरी न सांगता हा कसा आला याची ती काळजी होती. हा तर दुसराच कोणी किरण ठाकूर! त्याची त्यांना ही गंमत वाटली. आमच्या गप्पा झाल्या. चहापान झाले, निरोप घेतला.

येथून नाम साधर्म्य च्या गमतीजमती सुरु झाल्या. बेळगावच्या किरण च्या आडनावात “कु” हृस्व तर माझा दीर्घ “कू ” येव्हडाच काय तो फरक !

किरण ठाकुर

बाबुरावजी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते होते तसे बेळगाव च्या तरुण भारत या वृत्तपत्राचे मालक संपादक होते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर त्यावेळी सतत आंदोलने होत असत. त्यात आधी ते आणि नंतर किरण नेतृत्व करायचे. मुंबई विधानसभेत येऊन आंदोलन केल्यामुळे किरण ला अटक व्हायची. त्याच्या बातम्या मुंबईच्या दैनिकात ठळकपणे यायच्या.

हेडलाईन मध्ये देखील किरण ठाकुर यांना अटक असं प्रसिद्ध व्हायचं. माझ्या नातेवाईकांना चिंता वाटायची. भेट झाली तेव्हा मला खडसावून विचारायचे, तुला काय गरज आहे या गोष्टी साठी आंदोलन करायची ? “विषय बेळगावचा, आपण जळगावचे. काही अर्थाअर्थी आपला संबंध नसताना तू कशाला या आंदोलनात अटक करून घेतो ?” अशी त्यांची विचारणा असायची.

माझं लग्न झाल्यावर पुण्याच्या लक्ष्मीनगर मध्ये चाळीतील एका घरात राहू लागलो. ज्येष्ठ पत्रकार बाबुराव ठाकुर यांचे निधन झाले ही बातमी पुण्याच्या अनेक दैनिकात प्रसिद्ध झाली. ती वाचून आमचे शेजारी समाचाराला आले. शोकाकुल वातावरण दिसेना. शेवटी एकीने धाडस करून विचारलं की सासरे गेले तरी तुझ्या डोळ्याला आसवाचा एकही थेंब नाही असे कसे ?

काही वर्षांनी बेळगावच्या किरण ठाकुर चे लग्न ठरल्याची पत्रिका पुण्यात काही ठिकाणी आली. ती पाहून माझ्या दोन तीन मित्रांनी माझ्या पत्नीला छेडलेच. तुझा नवरा दुसरे लग्न करायला निघाला आहे आणि तू अशी डोळ्यावर पट्टी बांधल्या सारखी स्वस्थ कशी बसली आहेस ? त्यांनी सोबत त्या पत्रिकेचा एक नमुना आणला होता. पण तो पर्यंत या गमतीजमती दोन-चार वेळा होऊन गेल्या होत्या त्यामुळे तिला फार काळजी वाटण्याचे कारण नव्हते.

मराठी लोकांचे मुखपत्र म्हणून तरुण भारत खूप प्रभावीपणे काम करत असतो. पण त्याचा प्रभाव कर्नाटकामधील बेळगाव परिसरात मर्यादित होता, ते देखील मराठी भाषकांसाठी. महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका कर्नाटक राज्यात प्रभावीपणे मांडण्यासाठी आपण इंग्रजी देखील दैनिक काढावे, असे मालक संपादक किरण ठाकुर यांच्या मनात आले.

एकदा ते पुण्यात आले तेव्हा त्यांनी मला ऑफर दिली: या इंग्रजी वर्तमानपत्राचा संपादक म्हणून मी काम करावे. पण पुणे सोडून बेळगावी येणे शक्य नव्हते. त्यामुळे मी नाही म्हटले. मग त्यांनी मिश्किलपणे हे देखील सांगून टाकले की मला इंग्रजी चा संपादक नेमण्यामागे त्यांचा एक वेगळा हेतू होता. आपल्या एकीकरण समितीच्या कामामुळे अटक करायला बेळगावचे पोलीस आले आणि किरण ठाकूर कोणते हे विचारलं तर स्टाफ च्या लोकांनी माझ्याकडे बोट दाखवायचे आणि मला उचलून तुरुंगात टाकले तरी बेळगाव चे किरण ठाकुर आपले संपादकीय काम चालूच ठेवू शकतील !

त्या किरण ठाकुर यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक, क्षेत्रात भरीव काम केले आहेच. आता लोकमान्य मल्टि पर्पज सोसायटी चे १९९५ पासून काम सुरू केले. फार मोठा पसारा होतो आहे आणि सारखा विस्तार होत आहे. बातम्या, जाहिराती, आणि सामाजिक कार्यातील सहभाग यामुळे त्याच्या नावाची प्रसिद्धी नेहमी होते. तेव्हा नाम साधर्म्य चे याचे आणखी वेगळे अनुभव यायला लागले. माझा फोन नंबर शोधून माझ्याशी या पतपेढी संबंधीची कामे सांगायला काही लोक बोलायला लागले आहेत. त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संबंधीच्या तक्रारी मला ऐकवू लागले. कर्जासंबंधीची गळ घालण्यासाठी रात्री उशिरापर्यंत केव्हाही फोन येऊ लागले. आता हे प्रकार खूप कमी झाले आले आहेत. केव्हातरी एखाद दोन प्रसंग येतात.

पण अगदी अलीकडे आणखी वेगळाच अनुभव आला. मी लोकमान्य चा किरण ठाकुर असे गृहीत धरून पुण्यातील एका महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मी अध्यक्षस्थानी यावे (आणि उपक्रमासाठी साठी देणगी द्यावी ☺️) असा प्रस्ताव देणारा तो फोन होता!!

प्रा. डॉ. किरण ठाकूर

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर, पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. नावातील साधर्म्य यामुळे होणारे गमतीदार प्रसंग
    वाचताना खूप मनोरंजन झाले.
    प्रा.(डॉ) किरण कन्हैयालाल ठाकूर यांना धन्यवाद !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं