आज का वाटे मला मी दर्पणातच डोकवावे
आणि मी माझ्याच रूपावर असेच बहाल व्हावे
तीच मी, तारुण्य ही ते, आज का नव भासते ?
तेच डोळे, तोच रंग असून का नव वाटते?
आज माझा बघून मुखडा मीच लाजत राहते
केश संभारास माझी अंगुलीं कुरवाळते
लाज लाजून गाल होती आज हे आरक्त का ?
अधरदल उघडून होती फिरून मग हे बंद का ?
रोजचा कां हा हिमांशु आज रोखून पाहतो ?
तारका ही हसती मजवरी, नभ उभा कां राहतो ?
हा प्रभंजन हळुच येऊन रव करत धावे पुढे
कुसुम गंधित संथ मंथर डोलती मागे पुढे
तीच ऊषा, तीच शर्वरी, तोच दिन ती यामिनी
चिंब भिजते प्रेमॠतुने तीच मी ही कामिनी
सारे ॠतु झाले निर्रथक, एक ॠतु हा भावला
मी अचंबित काय कसला रोग मजला लागला ?
आज कळली ह्या ॠतुची काय ती जादूगरी
कुठून आली साद अन् झंकारली ही पावरी

– रचना : राधा गर्दे
सहज, सुंदर शब्दात भावविभोर करणारी कविता
खुप सुंदर कविता. एका प्रेमिकेचे सुरेख शब्दांत वर्णन केलय.
मस्त…
अप्रतिम गीत