बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आर्वी येथील शांतिवनची कन्या चि.सौ. का. नम्रता ( दीपक नागरगोजे आणि कावेरी नागरगोजे यांची मानस कन्या) हिचा विवाह चि. विशाल ( श्री कुंडलीकराव इंगोले रा.आहेर, ता.धानोरा जि. बीड) यांच्याशी कौटुंबिक वातावरणात नुकताच संपन्न झाला. ऊसतोड कामगार वडिलांच्या १२ वर्षांपूर्वी झालेल्या अपघाती निधनानंतर पोरके झाल्यामुळे शांतिवनमध्ये आलेल्या या चिमुकलीचे संगोपन आणि शिक्षण झाले. त्यामुळे तिला विवाह बंधनात गुंफून सासरघरी पाठवताना संपुर्ण शांतिवन परिवार गहिवरून गेला.
१२ वर्षापूर्वी आहेर वडगाव ता. बीड येथील ऊसतोड कामगार कैलासवासी बिभीषण बाबर यांचे पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडीवर असताना उसाच्या फडातच अपघाती निधन झाले. घरातील कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर हे कुटुंब पोरके झाले. दारिद्र्याच्या चटक्याने अगोदरच होरपळून निघालेल्या या कुटुंबावर वाईट वेळ आली. एक गुंठाही जमीन नसणारे आणि राहायला घर नसणारे हे कुटुंब रस्त्यावर आले. बिभीषण यांच्या पाठीमागे पत्नी आणि पाच चिमुकल्या लेकरांना वनवास आला. पतीच्या निधनानंतर या लेकरांना जगवणे या माउलीला शक्य नव्हतें. त्याचवेळी रोहिदास रोहिटे आणि दत्ता नलावडे या सामाजिक कार्यकर्त्यांनी ही माहिती दिपक नागरगोजे आणि कावेरी नागरगोजे यांना दिल्याने त्यांनी एक मुलगा आणि तीन मुली या चार चिमुकल्यांचे संपूर्ण पालकत्व स्वीकारून या चिमुकल्यांना शिक्षण आणि संगोपनासाठी शांतिवनमध्ये आणले.
उसतोडीमुळे शाळाबाह्य असणाऱ्या या लेकरांना मायेचा आधार मिळाला. त्यांना वयावर आधारित वर्गात प्रवेश देण्यात आले. हळू हळू ही बालकं शांतिवनच्या प्रांगणात बागडत लहानाची मोठी होऊ लागली. त्यातील नम्रता आता विवाहबद्ध झाली. कोरोना साथीच्या गंभीर परिस्थितीमुळे सर्व नियम पाळून कपिलधार येथील निसर्गरम्य वातावरणात अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा शांतिवन परिवाराने पार पाडला.
शांतिवनने घेतलेली जबाबदारी आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाली. हा लग्न सोहळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री संतोष हंगे, सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री बालाजी पवार, अरुण जाधव, संतोष राख यांनी संपुर्ण परिश्रम घेतले. – देवेंद्र भुजबळ.9869484800
