Sunday, December 22, 2024
Homeबातम्याडॉ प्रशांत थोरात यांना कार्यव्रती पुरस्कार

डॉ प्रशांत थोरात यांना कार्यव्रती पुरस्कार

वी नीड यू सोसायटी” संस्थेतर्फे गेली आठ वर्षे समाजात ‘व्रत’ घेऊन कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कामाची योग्य दखल घेऊन सर्व तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी व विविध ठिकाणी सुरू असलेल्या सामाजिक व शैक्षणिक कामाच्या मागे उभे राहण्यासाठी समाजव्रती, शिक्षणव्रती आणि कार्यव्रती हे पुरस्कार दिले जातात.

कार्यव्रती पुरस्कार नवी मुंबईतील नेत्रतज्ज्ञ डॉ.प्रशांत थोरात यांना जाहीर झाला आहे.
डॉ थोरात गेली १२ वर्षे नवी मुंबईतील ‘नाका कामगारां’ साठी डोळ्यांच्या आजारांच्या उपचारासोबतच त्यांना मोफत चष्मे देणे आणि त्याकरिता सौर ऊर्जेवर चालणारा जगातला पहिला फिरता डोळ्यांचा दवाखाना चालवितात. अत्यंत गरीब आणि गरजू लोकांना अविरतपणे ते रुग्णसेवा देत असल्याबद्दल त्यांना हा “कार्यव्रती” पुरस्कार देण्यात येणार आहे.

अन्य पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत:-
) समाजव्रती पुरस्कार :- श्री सीताराम शेलार
मुंबई महानगर आणि नवी मुंबईमध्ये नागरिकांच्या शुद्ध आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या हक्काकरिता पाणी हक्क समितीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. युवक विकास, सुशासन, दारिद्र्य निर्मूलन आणि पर्यावरण या चार क्षेत्रांमध्ये गेली २०हुन अधिक वर्षे ते कार्यरत आहेत. तसेच ते सेंटर फॉर प्रमोटिंग डेमॉक्रसी चे संस्थापक संचालक आणि ‘हमारा शहर मुंबई अभियान’ केंद्रीय समितीचे सदस्य आहेत.

२) शिक्षणव्रती पुरस्कार:- आरती नाईक.
रायगड जिल्ह्यातील जांभिवलीवाडी या आदिवासी पाड्यावर जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक पदावर एका तपाहून अधिक काम करत असतानाच लैंगिक शिक्षण, शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लिंग समभाव विषयक कार्यशाळा आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या ‘जोडीदाराची विवेकी निवड‘ या अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘संवाद शाळा’ अशा रीतीने शिक्षणाच्या चौकटी विस्तारत नेऊन काम करणाऱ्या आरती नाईक यांना “शिक्षण व्रती पुरस्कार” देण्यात येणार आहे.

विशेष गौरव पुरस्कार :- मधु मोहिते
आयुष्यातील जवळपास पाच दशके समाज परिवर्तनासाठी व्रतस्थपणे देणाऱ्या ‘मधु मोहिते‘ यांना या वर्षी “विशेष गौरव पुरस्कार” देण्यात येणार आहे. सत्तरच्या दशकामध्ये शालेय शिक्षकांच्या प्रभावामुळे विद्यार्थी दशेतच मोहिते सामाजिक चळवळीचा भाग बनले. ते आजतागायत कार्यरत आहेत. युवक क्रांती दलापासून गिरणी कामगार सभा, म्युनिसिपल कामगार संघ, भारतीय रिपब्लिकन पक्ष, सद्भावना संघ आणि युसुफ मेहेरअली केंद्राचे सचिवपद भूषविलेल्या मोहिते यांची कारकीर्द म्हणजे संघर्ष, निर्माण आणि प्रबोधन या त्रिसूत्रीवर काम करण्याचा एक वस्तुपाठ घालून देणारी आहे.

संस्था परिचय
‘वी नीड यू सोसायटी‘ ही संस्था १९८६ पासून ठाणे व नवी मुंबई या विभागात कार्यरत आहे. या कामाचा परीघ शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार व प्रबोधन असा आहे. यासाठी बालवाडी, प्राथमिक शिक्षणात दिशा वर्ग, कॉम्प्युटर आधारित गणित शिक्षण, ब्युटीशीयन व शिवण प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. लोकशिक्षण होण्यासाठी नियमित व्याख्याने, चर्चासत्र व शिबिरे हे प्रबोधन कार्यक्रम केले जातात.

डोळ्यांचा फिरता दवाखाना

पुरस्कार प्रदान कार्यक्रम उद्या, रविवार दि. ७ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महानगरपालिका भवन, ठाणे येथे होणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कथाकार, लेखक आणि ९५व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. भारत सासणे हे आहेत.
तरी ठाणे व नवी मुंबईतील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा लतिका सु. मो, सचिव – अतुल गोरे, विश्वस्त – निलेशचंद्र सिंधकर, जयंत कुलकर्णी, जगदीश खैरालिया, नरेश गायकर, संकेत कळके आणि अभय कांता यांनी केले आहे.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments