रायगड जिल्ह्यातील उरण येथील नाभिक महिला मंडळातर्फे नुकतीच तेरापंथी हॉलमध्ये मंगळागौर
उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष सायली सविन म्हात्रे व श्री समर्थ कृपा सखीच्या अध्यक्षा महाराष्ट्र भूषण संगीता सचिन ढेरे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. नंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मंगळागौरीची पूजा करण्यात आली. श्रावण महिन्यातील मंगळवारी मंगळागौरीची पूजा करण्यात येते. ही पारंपरिक पूजा असते. मंगळागौर म्हणजे पार्वतीचे रूप. तिच्यासोबत भोळ्या शंकराच्या पिंडीची ही देखील पूजा केली जाते. आजच्या या मोबाईलच्या जगात, धावपळीच्या युगात ही परंपरा कमी होत आहे.
दैनंदिन कामकाजातून महिलांना स्वतःसाठी वेळ काढणे कठीण असायचे म्हणून मंगळागौर, भोंडला असे अनेक छोटे छोटे कार्यक्रम पूर्वी करत असत. यातून महिला एकत्र येऊन आपले सुखदुःख एकमेकींसोबत वाटत. हीच परंपरा नाभिक महिला मंडळ उरण यांनी जपत मंगळागौर साजरी केली.
सायली म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महिलांनी एकत्र यावं आणि आपली परंपरा जपावी. तसेच संगीता ढेरे यांनी नाभीक महिला मंडळाने 18 वर्षापासून चालवत असलेल्या अनेक उपक्रमांचे कौतुक केले. नंतर महिलांनी अगदी उत्साहात पारंपरिक मंगळागौरीचे खेळ खेळून आनंद घेतला. खेळ खेळत असताना प्रमुख पाहुण्यांनी देखील या खेळामध्ये भाग घेवून खेळाचा आनंद घेतला.
नाभिक महिला मंडळाच्या अध्यक्षा पूजा चव्हाण, रश्मी मुकादम, दिपाली शिंदे, ऋतुजा मुकादम, ज्येष्ठ सल्लागार सुजाता आपणकर, अश्विनी मुकादम, शिल्पा शिंदे, प्रभावती चव्हाण, कार्यकारणी सभासद संगीता जाधव, भाग्यश्री शिंदे, सुचिता मुकादम, तेजश्री पंडित, मनीष मुकादम, प्रतिभा मुकादम, संध्या शिंदे, सुवर्णा शिंदे, सुमन शिंदे, मनीषा रसाळ, जानवी पंडित, शिल्पा साळुंके या सर्वांनी मेहनत घेऊन मंगळागौरीचा कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला.
– लेखन : विठ्ठल ममताबादे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800