Wednesday, September 17, 2025
HomeUncategorized'भावलेली गाणी' ( १० )

‘भावलेली गाणी’ ( १० )

जहाँ डाल डाल पर ….
गीत : जहाँ डाल डाल पर
चित्रपट : सिकंदर-ए-आज़म (१९६५)
दिग्दर्शन : केदार कपूर
गीतकार : राजिंदर किशन
संगीतकार : हंसराज बहल
कलाकार : दारा सिंघ, मुमताज़, पृथ्वीराज कपूर, वीणा, प्रेम चोपड़ा, प्रेम नाथ
गायक : मोहम्मद रफी

आज पंधरा ऑगस्ट, २०२२. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या वर्षी आपण साजरा करत आहोत. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली याचा प्रचंड अभिमान प्रत्येक भारतीयाच्या मनात नक्कीच आहे.

आज देशभक्तीची भावना मनात खूप उचंबळून येत आहे, आम्ही मातृभूमीपासून इतक्या दूर आहोत, म्हणून ती जास्त प्रकर्षाने जाणवत असेल कदाचित.

भारतात असताना आमच्या सोसायटीमध्ये होणारे ध्वजारोहण किंवा लहानपणापासून शाळेत होणारे ध्वजारोहण याची तीव्र आठवण येत आहे. इथे करतात भारतीय छोटे खानी कार्यक्रम, पण जसे दिवाळी साजरी करावी तर भारतातच, तसेच स्वातंत्र्य दिनाचा माहौल अनुभवायचा असेल तर भारतातच असायला हवे. मग ते एका छोट्याशा गल्ली, नुक्कड, दुकान असो किंवा फ्लॅट, बंगला, नाहीतर राष्ट्रपती भवन. ती उर्मी, ती भावना, मनात साठलेली आहेच, पण मायभूमीची धूळ जोवर हाताला लागून मस्तकी तिचा टिळा लागत नाही, तोवर काहीतरी अधुरे, अपूर्ण वाटत राहते.

कित्येक लोक म्हणतील की एवढेच आहे तर मग कशाला जाऊन बसता परदेशात ? तर माझे त्यांना एवढेच सांगणे आहे की शेवटी नशीब आणि नोकरी हे तुम्हाला कुठे, कधी, कसे घेऊन जाईल, हे कोणाच्याच हातात नसते. शिवाय ज्यांच्याकडे पिढीजात बसून खाण्या इतका पैसा नसतो, ते संधी मिळेल तिथे जातात.

आम्ही असेच आधुनिक जिप्सी लोक ! प्रोजेक्ट असेल तिकडे चंबू गबाळे बांधून जाणारे. संपले की आमचे गलबत पुन्हा भारतात ! पण मध्यंतरीचा देशापासून दूर राहण्याचा काळ असतो ना, तोच अवघड असतो बघा ! असो. फार विषयांतर होत आहे !

तर मी बोलत होते १५ ऑगस्टच्या दिवशी होणाऱ्या ध्वजारोहण समारंभाबद्दल. आदल्या दिवशी पांढरा ड्रेस त्यावर तिरंगी ओढणी, किंवा तिरंगी साडी, अथवा पांढरी साडी, पांढरा कुर्ता पायजमा काढून ठेवला जायचा. तिरंगा आणि कपड्यांवर लावायला तिरंग्याची पिन. कुणी कुणी मॅचिंग बांगड्या, कानातले, नेकलेस पण आणायचे. सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण व्हायचे तेव्हा मस्त सगळे तयार होऊन पाच दहा मिनिटे आधीच हजर असायचे. बरेच जण शाळेतला ध्वजारोहण समारंभ आटोपून मग सोसायटीतील समारंभात सहभागी व्हायचे.

ध्वजारोहण विधीच्या आधी सकाळी सकाळी ध्वनीक्षेपकावरून ऐकू येणाऱ्या देशभक्तीपर गाण्यांनी होणारी सुंदर प्रभात, ध्वजारोहण झाल्यावर छोट्या मुलांचे विविध कलागुण प्रदर्शन असायचे. कोणी गाणी म्हणायचे तर कोणी नाच करायचे. कोणी पियानो वाजवायचे तर कोणी छोटेसे नाटक बसवायचे. मग कार्यक्रम आटोपला की सगळ्यांना मिठाई आणि स्नॅक्स चा बॉक्स दिला जायचा.

त्यांनतर सगळे मज्जा करायला मोकळे. कित्येक जण आदल्या दिवशी जोडून शनिवार रविवार सुट्ट्या आल्या तर फिरायला निघून जायचे. हल्ली असे पाहण्यात आले की भारतात राहून आपण निव्वळ १५ ऑगस्टला लागून किती सुट्टी मिळतेय आणि आपण एन्जॉय करायला बाहेर कुठे जातोय, याचाच दुर्दैवाने विचार करत राहतो.

देशाची एकूण लोकसंख्या बघता, फार थोडे लोक आहेत जे काही देशोपयोगी उपक्रम घेऊ किंवा एकत्र येऊन आजच्या दिवशी देशासाठी काहीतरी नवीन सुरू करू, याचा विचार करतात. का बरे असे ? स्वातंत्र्य मिळाल्यावर देशभक्ती इतक्या लवकर आटली ? ज्यांनी आपल्यासाठी रक्त सांडले, जीव गमावले, त्यांची किंमत तुम्ही लाँग वीकेंडला मजा मारून, पार्ट्या करून शून्यापेक्षाही कमी करत आहात, याची जाणीव नाही होत का ? की पर्वाच नाही राहिली त्यांच्या त्यागाची आता ? आपल्याला जे पाहिजे ते आजच्या पिढीला न मागता मिळत आहे ना, मग त्याची किंमत आपण नको का राखायला ?

एकट्या सरकारने देशासाठी पावले उचलणे पुरेसे नाही. आपल्या पैकी प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकून जे काही करतो, ते जसे आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी करतो, तसेच ते देशासाठी करतो, ही भावना मनात रुजवली पाहिजे. समाज सेवा करणाऱ्यांनीच फक्त देशभक्तीचा ठेका घेऊन ठेवलेला नाही. देशभक्ती ही आपल्या प्रत्येकाच्या नसानसात भिनली पाहिजे. कुठेही रहा, आम्ही भारतीय आहोत, याचा अभिमान बाळगला पाहिजे. स्वतःलाच “देसी टट्टू” म्हणून आपल्याच बांधवांना परदेशात कमी लेखणाऱ्या भारतीयांची मला वैयक्तिकरित्या प्रचंड चीड येते.

भारतीय माणूस भारतात असो वा परदेशात, कितीही शिकलेला असो, सुसंस्कृत असो, कुठेतरी परकियांच्या समोर एक न्यूनगंड मनात बाळगून राहतो, असे कुठेतरी जाणवत राहते. आपल्या रंगाचा, आपल्या accent ची त्याला लाज वाटते. त्यापेक्षा आपल्या ज्ञानाचा, आपल्या हुषारीचा, आपल्या देशाने दिलेल्या शिक्षणाचा गर्व वाटला पाहिजे. म्हणूनच मला वाटते की सगळ्यांनी डॉ. रघुनाथ माशेलकर – भारतीय बौद्धिक संपदेचा उद्गाता, हे डॉ.अ.पां. देशपांडे लिखित पुस्तक अवश्य वाचावे. स्वातंत्र्योत्तर काळात भारताची काय स्थिती होती, त्या नंतर माशेलकर यांनी प्रगती पथावर कसे आणले आणि भारतीयांची कशी मानसिकता बदलायला हवी या विषयी खूप सुंदर पुस्तक आहे हे. आपलाच एक भारतीय म्हणून स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप प्रमाणात बदलेल.

आपल्या देशाचा, संस्कृतीचा, पेहरवाचा, परंपरांचा सार्थ अभिमान असायलाच हवा आपल्याला. अलीकडे व्हॉट्सॲप वर १५ ऑगस्टचा दिवस जवळ आला की इंडियन हे नाव कसे चांगले आहे याचा काहीतरी ॲक्रोनीम सोडवून बनावट देशभक्ती रुजविण्याचा पोकळ प्रयत्न करत मेसेज पाठवला जातो. पण खरे तर हे आहे की इंडियन याचा अर्थ मागासलेले, मूळ रहिवासी या अर्थाने, भारतीयांना कायमचे त्यांची जागा दाखवून द्यावी या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या भारताला दिलेले हे नाव आहे. त्यावर सिंधू नदीचा Indus हा संदर्भ देऊन खोटा मुलामा चढवला इतकेच ! अन्यथा जसे पाकिस्तान नाव दिले गेले, तसे हिंदुस्तान किंवा मूळचे भारत हेच नाव का बरे इंग्रजीत सुद्धा दिले गेले नाही ? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना ?

इंग्रज राजवट अत्याचारी होती. पण इंग्रजांनी त्यांच्या भाषेत लिहिलेले एक वाक्य आज आठवते आहे. “History repeats itself.” आता भारताला स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली. पुष्कळ पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. आपल्या देशाची बरीच प्रगती झाली आहे. तेव्हा आता वेळ आली आहे, इतिहासाची ती जुनी पाने उघडून पुन्हा त्या सुवर्णमयी इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आता इतिहासाची पुनरावृत्ती होण्यासाठी थांबण्याची नव्हे, तर तो ऐतिहासिक काळ आता जाणीपूर्वक, प्रयत्नपूर्वक आपण पुनरुज्जीवित करायची वेळ आली आहे.

आपल्यापैकी प्रत्येकाने आतला शिवाजी जागा करून स्वतंत्र भारतात, स्वराज्य आणि सुराज्य आणण्याचा नव्याने प्रण केला पाहिजे. आपण स्वतःसाठी पैसा मिळवतो, तोच देशासाठी मिळवण्यासाठी तगमग होऊ दे. आपण आपल्या प्रमोशनसाठी कष्ट घेतो, तसे देशाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रमोशन व्हावे म्हणून कष्ट घेऊया. जसे दिवसरात्र आपले पंतप्रधान, श्री. नरेंद्र मोदी झटत आहेत. देशाचे रक्षण करण्याची फक्त सरकार आणि लष्कराची जबाबदारी नाही, तर ती आपल्या प्रत्येकाची आहे. आपल्याला जर तो सुवर्ण इतिहास पुन्हा बघायचा असेल तर प्रत्येकाने आपली मानसिकता बदलली पाहिजे. आठवा ही शाळेत घेतलेली प्रतिज्ञा.

भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.

||वंदे मातरम्||

इंग्रजीत म्हणतात तसा हा Independence Day. Independence म्हणजे कोणावरही अवलंबून नसणारा. मात्र या शब्दाचा स्वातंत्र्य दिन असे भाषांतर करणारा भारत हा एकमेव देश आहे. स्वातंत्र्य या शब्दांत स्वतःचे तंत्र असा अर्थ अध्याहृत आहे. त्या सोबतच स्वतःचे नियंत्रण असणारे तंत्र, अर्थात नियम हे देखील अध्याहृत आहेत. गेल्या काही वर्षात माजेलेले राजकीय, सामाजिक असमंजस पाहता, आपण किती स्वतःवर नियंत्रित वागणूक करण्याची गरज आहे, हे जाणवते.

पैसा आहे म्हणून अन्न वाया घालवणे, पैसा आहे म्हणून माणसाला तुच्छतेने वागवणे, गरिबाला अधिक शोषून घेणे, स्त्रियांचा आदर करण्याऐवजी बलात्कार करणे, एखादा नवीन कायदा समजून न घेताच अराजक माजवून जाळपोळ, लुटालूट, दगडफेक करणे, मालमत्ता उध्वस्त करणे, सारखे मोर्चे, संप करणे, पंतप्रधानांचा अनादर करणे, बिनबुडाचे आरोप करून वातावरण खराब करणे, जातीय दंगली माजवणे, आपले नियोजित काम आणि कर्तव्य करण्यासाठी भ्रष्टाचार करणे, आपल्याच देशाचे नाव बदनाम करणे, यात कुठेही स्व-नियंत्रण, स्व-तंत्रता दिसत नाही. यासाठी का आपले स्वातंत्र्य सेनानी शहीद झाले होते ? हे सगळे पाहून त्यांचे आत्मे किती विदीर्ण होत असतील याचा पुसटसा विचार तरी शिवतो का असली कृत्ये करताना आजच्या भारतीयाला ? किंबहुना अशी कृत्ये करणाऱ्या लोकांनी भारतीय म्हणवून घ्यावे का ?

पण अजूनही काही बिघडले नाही. हा आपला देश आहे. आपणच त्याला सावरायचे आहे. आज आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त म्हणूनच “मला भावलेली गाणी” या लेखमालेच्या आजच्या भागात मी मला भावलेले असे एक गाणे निवडले आहे, ज्याच्या शिवाय स्वातंत्र्याचा कोणताही उत्सव अपूर्ण आहे. हे गाणे ऐकून प्रत्येकाच्या मनात ही भावना नक्की उचंबळून येईल की आपला सुवर्ण काळ पुन्हा वर्तमानात येऊ घातला आहे आणि तो आणण्यासाठी आपण प्रतिज्ञा घ्यायलाच हवी.

या गाण्यात आपल्या राष्ट्राचे सौंदर्य आणि हिंदू धर्माची वैशिष्ट्ये अतिशय सोप्या शब्दात, शांत आणि पवित्र भावनांनी, भावपूर्ण संगीताने, उत्तम शब्दालंकरांनी आणि मोहम्मद रफी यांच्या उत्कृष्ट गायनाने स्पष्ट केली आहेत. राग शुद्ध कल्याण मधले हे गीत आहे, “जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा.”

मूळ चित्रपट सिकंदर (१९४१) याचा सिकंदर-ए-आज़म (१९६५) हा रिमेक

चित्रपट आहे, सिकंदर-ए-आज़म (१९६५). १९४१ च्या सोहराब मोदी दिग्दर्शित, सिकंदर या चित्रपटाचा केदार कपूर दिग्दर्शित रिमेक आहे. आधी पृथ्वीराज कपूर (सिकंदर- Alexander) सोहराब मोदी (पुरू राजा) हे कलाकार होते.

सिकंदर-ए-आज़म (१९६५) यात दारा सिंघ (सिकंदर- Alexander), मुमताज़ (Cynthia), पृथ्वीराज कपूर (पुरू राजा), हेलेन (रुखसाना) वीणा, प्रेम चोपड़ा, प्रेम नाथ हे कलाकार आहेत. गीतकार राजिंदर किशन, संगीतकार हंसराज बहल, आणि गायक मोहम्मद रफी. रफी साहेब प्रत्येक गाणे जीव तोडून गायचे, पण या गाण्यात असे वाटते की त्यांनी आपल्या आत्म्याला साद घातली आहे आणि त्या सुवर्ण काळात ते आपल्याला घेऊन गेले आहेत.

हा चित्रपट ख्रिस्तपूर्व ३२६ (326 B.C.) मध्ये बेतलेला आहे. जेव्हा अलेक्झांडर द ग्रेट उर्फ ​​सिकंदर (दारा सिंग) पर्शिया जिंकून काबूल खोरे झेलम येथे भारतीय सीमेवर उतरतो. राजा पोरस (पृथ्वीराज कपूर) त्याच्या सैन्यासह त्याला शह देतो. सिकंदरने त्याच्या शिक्षक ॲरिस्टॉटलच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतो आणि रुख्साना (हेलन) या पर्शियन स्त्रीला बळी पडतो. सिकंदरच्या जीवाच्या भीतीने सिंथिया, जिला पुरु राजा युनानी कन्या म्हणून म्हणून आपल्या कन्येचा दर्जा देतो, ती पोरसकडून वचन घेते की तो सिकंदरला इजा पोचवणार नाही. मात्र मॅसेडोनियन सैन्याबरोबरच्या लढाईत पोरस आपला मुलगा गमावतो आणि पकडला जातो. पोरसला सिकंदरसमोर आणल्यावर कोर्टात जेव्हा सिकंदर पोरसला विचारतो, “तुला कसे वागवले जावे ?” यावर पुरू राजा म्हणतो, “राजासारखे वागवले जावे.” पोरसच्या पराक्रमाने आणि या उत्तराने प्रभावित होऊन दोन्ही राजे मित्र बनतात. सिकंदर पोरसला जाऊ देतो आणि झेलममधून माघार घेतो.

सिकंदर इराण, तुर्की काबीज केल्यावर जेव्हा पेशावरकडे आपला मोर्चा वळवतो, तेव्हा सुस्थितीतील भारत देशाचा गौरव सांगणारे हे गीत चित्रपटात येते. अर्घ्य देण्यासाठी पुरू राजा राजमहालातील तळ्यावर येतो, तिथे हा मंत्र म्हटला आहे. राजवाडे, सगळीकडे हिरवळ, समृद्धी, राजांची संपत्ती असे भव्य दर्शन घडते.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥

या गाण्याच्या सुरुवातीपासूनच आपली संस्कृती पडद्यावर झळकते. सुरुवातीलाच गुरुवंदना येते. गुरुजनांना नमन करून देवी भारतीचे हे स्तुतीपर गीत आरंभ होते. गुरू हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर आहेत, गुरू हे साक्षात परब्रम्ह आहेत, त्या गुरुंना नमन असो. इथे पहिली गोष्ट सुचवायची आहे ती म्हणजे जे कोणी ज्ञानी व्यक्ती आहेत, ते समाजाला पुढे नेण्यासाठी झटत आहेत. त्यांचा आदर करावा. आज भारत देशात शिक्षकांच्या प्रती जो अनादर बळावत आहे, त्यांना शिकवण्याच्या व्यतिरिक्त जी कारकुनी कामे करावी लागत आहेत, जो अपमान सहन करावा लागत आहे, तो आपणच थांबवून त्यांना पूर्वी सारखा आदर दिला पाहिजे. यात आध्यात्मिक गुरु असावेच असे नाही, तर देशाच्या प्रगतीत जे कोणी वाट दाखवून दुसऱ्यांना प्रेरणा देत आहेत, मग ते कोणत्याही क्षेत्रातले असू दे, त्या सर्वांना आदराने वागवले पाहिजे, हा संदेश आहे.

जहाँ डाल डाल पर सोने की
चिड़िया करती है बसेरा
वो भारत देश है मेरा
वो भारत देश है मेरा

असे म्हणतात की आपला देश इतका श्रीमंत आणि समृद्ध होता, की जणू प्रत्येक झाडाच्या फांदीवर सोन्याच्या पक्ष्यांचा अधिवास होता. तो भारत देश माझा आहे आणि तो मला पुन्हा तसाच समृद्ध झालेला बघायचा आहे.

जहाँ सत्य अहिंसा और धर्म का
पग पग लगता डेरा
वो भारत देश है मेरा
वो भारत देश है मेरा

जिथे पावलो पावली सत्य, अहिंसा आणि धर्म यांचे दृढतेने पालन केले जायचे, त्यांचा वास प्रत्येक घर, गाव, शहर सगळीकडे असायचा तो माझा खरा भारत देश आणि ती माझी खरी संस्कृती आहे. करतोय का आपण याचे पालन ? कुठे, किती चुकतोय याचा आपणच शांतपणे विचार करायला हवा.

जय भारती, जय भारती
जय भारती, जय भारती

त्या भारत मातेचा सदैव विजय असो. खरं सांगते तिच्याकडे आपली आई म्हणून बघा. आपल्या प्रत्येक कृत्याचा तिला किती त्रास होत आहे याचा विचार करा. मग ते प्लास्टिक वापरणे असो, किंवा एखाद्या छोट्या मुलाला कामाला लावणे, एखाद्या स्त्रीचा अनादर असो किंवा एखाद्या गरीब कामगाराला कमी पैसे देणे, याने आपल्या भारत देशाची, या धरतीची प्रगती होणार आहे का, याचा जरूर विचार करावा.

यह धरती वो जहाँ ऋषि मुनि
जपते हरी नाम की माला
हरी ओम, हरो ओम
हरो ओम, हरी ओम
जहाँ हर बालक इक मोहन है
और राधा इक इक बाला
जहा सूरज सब से पहले आकर
डाले अपना डेरा
वो भारत देश है मेरा
वो भारत देश है मेरा

ही ती पावन भूमी आहे, जिथे ऋषी – मुनी जगत्पालंकर्ता शक्तीला आवाहन करून त्या हरीचा जप करतात जेणेकरून त्याने आपल्या भारत भूमीचे पालन पोषण करावे, ती सुजलाम सुफलाम व्हावी.

ही ती भारत भूमी आहे जिथे प्रत्येक लहान मुलाचे कृष्णसारखे लाड केले जातात आणि प्रत्येक लहान मुलीवर राधासारखे प्रेम केले जाते. इथे अजून एक अर्थ अध्याहृत असावा. गोप गोपींमध्ये आनंदाचे, प्रेमाचे, खेळीमेळीचे वातावरण होते. त्याचप्रमाणे स्त्री पुरुष हा भेद मानला तरी त्या नात्याचे पावित्र्य राखले जात होते. ती मर्यादा, ती जाणीव, ती सामाजिक बांधिलकी, असणारा आपला देश होता. तसाच पुन्हा आपल्याला उभा करायचा आहे.

या गीतात भरपूर सकारात्मकता दर्शवली आहे. गीतकार सांगतोय की या भूमीवर सगळ्यात आधी सूर्योदय होतो आणि मग सूर्य इथेच बस्तान मांडून बसतो! म्हणजेच आपली संस्कृती खूप लवकर उदयाला आली आणि समृद्धीच्या शिखरावर पोचली होती. संशोधनात असे आढळून आले की जगभर पूर्वी वैदिक संस्कृती होती. युरोप, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, आशिया, मध्य आशिया, दक्षिण आशिया या सर्व खंडात शंकराची मंदिरे, संस्कृत शब्दांवरून येणारी शहरांची नावे आणि इतर बारीक सारीक संदर्भ हे दर्शवतात की ख्रिश्चन आणि इस्लाम धर्म येण्याच्या खूप आधी जगभर वैदिक धर्मसंस्कृती पसरली होती. म्हणूनच पूर्वेपासून पश्चीमेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत कदाचित भारतीय संस्कृतीचा ठसा पुराण काळात सर्वत्र उमटला होता. त्याचाच संदर्भ कदाचित या गीतात कवी देत असावा.

जहाँ गंगा यमुना कृष्णा
और कावेरी बहती जाये
जहां उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम को अमृत पिलवाये
ये अमृत पिलवाये
कहीं यह जल फल और फूल उगाये
केसर कहीं बिखेरा
वो भारत देश है मेरा
वो भारत देश है मेरा

ज्या देशात गंगा, यमुना, कृष्णा, कावेरी अशा पवित्र नद्यांचा वास आहे, ज्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या सर्व दिशांना आपल्या अमृतासमान जलाने सर्वांचे पोषण करीत आहेत, तो हा भारत देश आहे. या देशातील नद्या केवळ सामान्य फळे, फुलेच नव्हे तर किमती केशर सुद्धा उगवायला मदत करीत आहेत. थोडक्यात सांगायचे तर या नद्यांमुळे इथली जमीन सुपीक झाली असून, त्यातून सोन्याचे उत्पन्न घेण्याची क्षमता आपल्यात आहे, असा आपला वैभवशाली भारत देश आहे.

अलबेलों की इस धरती के
त्यौहार भी हैं अलबेले
कहीं दिवाली की जगमग है
होली के कहीं मेले
जहाँ राग रंग और हँसी खुशी का
चारो और है घेरा
वो भारत देश है मेरा
वो भारत देश है मेरा

हा भारत देश अनोखा आहे कारण इथले लोक अनोखे आहेत, सुंदर आहेत. ते सौंदर्य इथल्या प्रत्येक सणात दिसून येते. कुठे दिवाळीची झगमग तर कुठे होळीच्या रंगांच्या जणू भरलेल्या जत्रा! सर्वत्र संचार आहे सुंदर सुरांचा, रंगांचा, हास्य आणि आनंदाच्या तरांगांचा! तो आनंदाचा खजिना आहे माझा भारत देश !

जहां आसमान से बाते करते
मंदिर और शिवालये
किसी नगर में किसी द्वार पर
कोई ना ताला डाले
और प्रेम की बंसी जहाँ बजाता
आए श्याम सवेरा
वो भारत देश है मेरा
वो भारत देश है मेरा

काय सुंदर उपमा दिली आहे कवी आणि गीतकार, राजिंदर किशन यांनी! मंदिर आणि शिवालय यांच्यावर असलेले शिखर थेट आकाशात पोचते की काय असे वाटावे इतके उंच. पण कशासाठी इतके उंच? तर त्या आकाशाशी जणू संवाद साधण्यासाठी. आपला असा समज आहे की स्वर्ग वर आकाशात आहे, जिथे देव राहतात. मग हे मंदिरांचे कळस जणू काही स्वर्गातून येणाऱ्या लहरींना पकडणारे अँटेना आहेत, जे स्वर्गातील सुखे पृथ्वीवर आणतील. काय रम्य कल्पना आहे ना!

पुरातन काळात या भारत देशात इतकी समृद्धी होती की गरिबीचा लवलेशही नव्हता. म्हणून तर चोरीची भीती नव्हती. त्यामुळे कोणत्याही नगराला किंवा घराला प्रवेशद्वार नव्हते, ना ही कोणी आपली घरे कडी-कुलुपात बंदिस्त ठेवत. अशा या देशात सकाळ संध्याकाळ बस कृष्णसारखी प्रेमाची रुंजी घालणारे बासरीचे स्वर ऐकू येतात. या भूमीला खुल्या हातांनी सर्वांना प्रेम देण्याची सवय आहे. प्रेम आणि शांतीचा संदेश देणारी माझी ही प्रेमळ मायभूमी, माझी भारत भूमी!

जहाँ सत्य अहिंसा और धर्म का
पग पग लगता डेरा
वो भारत देश है मेरा
वो भारत देश है मेरा

जय भारती, जय भारती
जय भारती, जय भारती..

या गाण्याच्या शेवटी दिसते ती भारत मातेची मूर्ती. एका हातात समृद्धीचा भगवा झेंडा आणि दुसऱ्या हातात रक्षणकर्ते त्रिशूळ! आज खरेच भारती देवीच्या मूर्तीची स्थापना करून तिचे मंदिर उभारण्याची गरज आहे. त्या मंदिराच्या गाभाऱ्यात निरव शांती असावी. भारताची अखंडज्योत तेवत रहावी. केवळ आरतीचा पवित्र सूर किंवा घंटा नाद काय तो वेळोवेळी असावा. बाकी तिथे आल्यावर भारत मातेसमोर नतमस्तक होऊन तिची आभा आपल्याला देशभक्तीच्या मार्गावर नेणारी असावी.

यज्ञ, वैदिक मंत्र, यांच्या आवाजाने तिच्या भोवतालची भूमी पवित्र पुण्यभूमी व्हावी.

त्या मंदिरात कोणत्याही जात, धर्म, पैसा, लिंग, हा भेद नसावा. एकच अट. तिथे पाऊल टाकणाऱ्याने देशप्रेम सोबत घेऊन यावे. देश सेवेचे व्रत अंगिकरण्याची इच्छा असणारी व्यक्ती असावी.

त्या भारती देवीच्या मंदिरात देशभक्तीपर गीते गायली जावीत. देशभक्तीपर ओव्या, अभंग, पोवाडे, लोकगीते गायली जावीत. देशभक्तीपर नाटिका, नाटके बसवली जावीत. देशाला कसे सर्व बाजूंनी सशक्त आणि अग्रेसर करता येईल याची त्या मंदिराच्या भव्य आवारात चर्चासत्र आयोजित केली जावीत.

शांती निकेतन सारखे झाडांच्या सावलीत हे सगळे व्हावे. तक्षशीला विद्यापीठासारखे तिच्या बाजूला एक भव्य विद्यापीठ उभारावे. त्याच्या जवळच जगातील सगळ्यात आधुनिक प्रयोगशाळा उभारली जावी. सर्व बाजूंनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारी भारती देवीची ही पुण्यभूमी पुन्हा तिच्या सुवर्ण काळाला घेऊन उदयाला यावी !

माझ्या मनीचे स्वप्न हे प्रत्येक भारतीयाच्या मनी रुजावे, अंकुरावे, फुलावे, फळावे हीच त्या परमेश्वर चरणी प्रार्थना! जय हिंद ! वंदे मातरम् ! भारत माता की जय !

तनुजा प्रधान

– लेखन : तनुजा प्रधान, अमेरिका.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. नमस्कार तनुजा ताई…! अतिशय सुंदर आणि वैचारिक असा लेख आहे. गाण्याच्या रसग्रहणासोबत आपल्या हिंदुस्थानचं एकेकाळचं खरंखुरं चित्र, जे आता पुन्हा उदयाला येण्याची नितांत आवश्यकता आहे… ते डोळ्यांसमोर उभं रहातं… वंदे मातरम्… !!
    … प्रशान्त थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
    +91 9921447007

    • इतक्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभार!
      वंदे मातरम्!!🙏🇮🇳🪴

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं