भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काही कविता पुढे सादर करीत आहे. आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
– टीम एनएसटी
१. अमृत महोत्सव
अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा आला अपुल्या दारी
भारतराष्ट्रध्वज तिरंगा उभवू या घरोघरी
नका विसरू परी नररत्नांना ज्यांनी रुधिर सांडले रणी
स्वातंत्र्याग्रणी समर्पित झाले तेजोनिधि समरांगणी
मरहट्टी रांगडा,वंगपुत्र,पंजाबी,गुर्जर लढले खंदे बंदे
देशाचा आत्मा ऐक्य पुजोनी गर्जति ‘मातरम् वंदे‘
अंधाराची यात्रा सरली,पहाट स्वातंत्र्याची फुलली
सुजलाम् सुफलाम् मातृभूमी ही सस्यश्यामला झाली
हरितक्रान्तीच्या परीसस्पर्शे कृषीउत्पादनी फळली
वीज, रसायन, विविध प्रकल्पे उद्यमवर्धित झाली
विज्ञानाच्या पंखाद्वारे गरुडझेप घेतली
आर्यभट्ट भास्करासवे मग ग्रहमाला शोभली
विकासलाटांरुढ तारु हे वारुसम दौडले
आत्मनिर्भर, विश्र्वगुरुभारत स्वप्न उराशी दडले
सैनिक लढती देशासाठी सीमेवरती सदा
अस्त्रे, शस्त्रे नवनवीन पुरवून वाढविली संपदा
देशभक्तीचा सुगंध घेऊनी देशप्रेम ते मनी जागवा
सद् धर्माचे करुनी आचरण न्यायनीतीची ज्योत जागवा
अमृतमहोत्सव स्वतंत्र्याचा एक दिलाने करु साजरा
जगी श्रेष्ठ हा अमुचा भारत अभिमानाने दावू या जगा

– रचना : स्वाती दामले. बदलापूर.
२. कविता स्वातंत्र्याच्या
भारत भूमीच्या कुशीत
कविता स्वातंत्र्याच्या गाऊ
सुजलाम सुफलाम देश
नक्कीच झालेला पाहू
अम्रुतमहोत्सवी जयगान
राष्ट्राचे कंठात येई
आशिया खंडात प्रसिद्ध
संस्कृती मूल्ये देई
प्रगतीपथावर चालत
माझा देश भारत आहे
नागरिक तयाचे आम्ही
अभिमान लढ्याचा पाहे
विकासगंगा ग्रामस्तरावर
कार्यरत आहे जोमाने
अणुबॉम्ब शस्त्रे साठे
वैज्ञानिक संशोधनाने
आर्थिक मंदीच्या बाबत
चिंता करणे सोडा
महासत्ता होण्याची
मानसिकता नक्की जोडा

– रचना : कविता भास्कर बिरारी. नाशिक
३. उत्सव स्वातंत्र्याचा
मातृभूमीच्या गद्दारांनी
पत्कारली होती गुलामी
देशाच्या दुष्मनांना ते
ठोकत होते सलामी
लोभाचे आमिष दाखवून
केले देशाचे शोषण
अपमानाचे विष प्राशुण
ते ऐकत होते भाषण
मंगल पांडेच्या त्यागाने
लोकांत उडाली खळबळ
स्वातंत्र्याच्या नावाखाली
सुरू ठेवली चळवळ
अगणित हुतात्म्यांनी तेव्हा
वाचा फोडली मनाला
देशाच्या स्वांत्र्यलढ्यात
प्राण लावले पणाला
रुद्र रूप पाहता शिवाचे
इंग्रज दूर पळाले
पराक्रमाने शुर वीरांच्या
मग स्वतंत्र मिळाले
त्यांचे उपकार म्हणून
स्वातंत्र्य दिवस होतो साजरा
तिरंगा आणि त्या शुर वीरांना
आमचा मानाचा मुजरा

– रचना : रामदास आण्णा. बुलढाणा
४. गाऊ स्वातंत्र्याचा गाणं
देश स्वतंत्र्यासाठी ,
महंतांनी दिले बलिदान .
घेऊन तिरंगा हाती ,
गाऊ स्वातंत्र्याचा गाणं .।।
घेऊन तिरंगा हाती ,
वाढवू तिरंग्याची शान .
श्वासात आहे देशभक्ती ,
गाऊ स्वतंत्र्याचा गाणं .l l
घरोघरी फडकून तिरंगा ,
वाढवू भारत मातेची शान.
एकनिष्ठ मी मराठा ,
तिरंग्याला माझा सलाम.
गाऊ स्वातंत्र्याचा गाणं l l
अभिवंदन भूमिपुत्रांना ,
सार्थ मला अभिमान.
जयघोष करू स्वातंत्र्याचा,
गाऊ स्वातंत्र्याचा गाणं. l l
मनामनात रुजून देशभक्ती ,
कार्य करू महान.
करून तिरंग्याला सलाम,
गाऊ स्वातंत्र्याचा गाणं .l l
घेऊन तिरंगा हाती ,
उंचवणार देशाची शान.
पाडून खाली झेंडा,
नाही करणार तिरंग्याचा अपमान.
गाऊ स्वातंत्र्याचा गाणं l l
गाऊ स्वातंत्र्याचा गाणं l l
– रचना : सौ भारती वसंत वाघमारे. मंचर, पुणे.
५. स्मरण-प्रभा
कळा पारतंत्र्याच्या हृदयी
सोसल्या ज्यांनी,
तिमिरल्या श्रुंखलांचे भय
तोडले ज्यांनी;
मौन स्मृति सावल्या त्यांच्या,
स्मरू या जरा,
अश्रूंच्या श्रावणी निदान,
भिजवू ही धरा ।

– रचना : श्रीकृष्ण बेडेकर. इंदूर
६. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून
झाली चक्क पंच्याहत्तर वर्ष
अमृत महोत्सव साजरा करतांना
होतोय आज खूप हर्ष
हा आनंद साजरा करतांना
होतेय सर्व हुतात्म्यांची आठवण
देशासाठी केलेल्या त्यांच्या बलिदानाचं
ठेवू आपण नित्य स्मरण
१८५७ ते १९४७ या कालखंडातला
इतिहास आहे अतिशय रोमहर्षक
त्या काळातल्या प्रत्येक नेत्याने
केलं कार्य देश विधायक
मंगल पांडे च्या पहिल्या गोळीने
रचला मोठा इतिहास
मोठ्या शौर्याने लढली झाशीची राणी
बांधून पाठीवरती इवल्याशा बाळास
सत्तावनची ही क्रांती गीता
अजरामर केली सावरकरांनी
भगतसिंग राजगुरू क्रांतीवीर घडले
हे प्रेरणादायी पुस्तक वाचूनी
स्वराज्याची पहिली डरकाळी
फोडली लोकमान्य टिळकांनी
इंग्रज सरकारची लक्तरं वेशीवर टांगली
केसरीमध्ये जहाल लेख लिहूनी
शिवजयंती गणेशोत्सव सुरू करून
मना मनात राष्ट्रभक्ती जागवली
राष्ट्रीय शिक्षण देणारी पहिली शाळा
पुण्यात सुरू केली
लाल बाल पाल या त्रिमूर्तीने
देशभर दौरे केले
गावोगावी भाषणे करून
गो-याच्या जुलमाचे पाढे वाचले
अशी भाषणे ऐकूनच
चाफेकरांसारखे तरुण पेटून उठले
स्वदेशीचे आंदोलन
अवघ्या भारतभर सुरू झाले
शेतकरी मजुर स्त्री पुरुष मुलं मुली
सर्वांमध्ये देशभक्ती संचारू लागली
टिळकांच्या दुर्दैवी मृत्यू नंतर
ही धुरा गांधीजींच्या खांद्यावर आली
मीठाचा सत्याग्रह करून गांधींनी
मोठे जन आंदोलन उभारले
चलेजावच्या चळवळीने तर
देशभर लाखो लोक रस्त्यावर उतरले
गांधीजींसारख्या मोठ्या नेत्यांना
इंग्रजांनी तुरुंगात डांबले
आंदोलनाच्या प्रखर ज्वाळांनी
चक्क आभाळ गाठले
नेताजींच्या चलो दिल्लीने
तरुण मने झपाटून गेली
आझाद हिंद फौजेने
पराक्रमाची शर्थ केली
नेताजींच्या भाषणांचा परिणाम
नाविक दलावरही झाला
राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावून
सैनिकांनी मोठा उठाव केला
दुष्ट गो-याची दम छाक झाली
त्याच्या पायाखालची वाळू सरकली
गुलामगिरीचे साखळदंड तोडून
प्रिय भारतमाता स्वतंत्र झाली
१५ आॅगस्ट १९४७ रोजी
स्वातंत्र्याचा सूर्य उगवला
सर्वात मोठ्या लोकशाहीचा तिरंगा
उंच अंबरी मोठ्या डौलात फडकू लागला
जय हिंद । वंदेमातरम् । भारतमाता की जय

– रचना : राजेंद्र वाणी. दहिसर, मुंबई
७. स्वातंत्र्याचे गीत
जय भारत जय भारत
करु वंदन राष्ट्र भक्तांना
जय भारत जय भारत ॥धृ॥
देह ठेवला ज्यांनी देशासाठी
स्मृती त्यांची नित आठवूया
करु वंदन राष्ट्र भक्तांना
जय भारत जय भारत ॥१॥
होळी केली ज्यांनी संसाराची
देशासाठी त्यागला प्राण
करु वंदन राष्ट्र भक्तांना
जय भारत जय भारत॥२॥
असहकार अन् सत्य
अहिंसाने केला पुकार
करु वंदन राष्ट्र भक्तांना
जय भारत जय भारत ॥३॥
ना लाठी काठी तलवार
पळवुन लावले ब्रिटिशांना
करु वंदन राष्ट्र भक्तांना
जय भारत जय भारत ॥४॥
रक्त सांडले ज्यांनी हो
भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी
करु वंदन राष्ट्रभक्तांना
जय भारत जय भारत ॥५॥
– रचना : पंकज काटकर. काटी, जि.उस्मानाबाद
८. आमुची भारतमाता
करितो भारतमाते तुजला नमन
अमृतमहोत्सवी मंगलमय सण
ध्वज तिरंग्याची औरच शान
भारतदेशा असे जगी सन्मान
आयताकृती लहरे हा ध्वज
रंग केशरी, धवल न् हरित
भारतमातेचा अलौकिक साज
ध्वज फडके हा घराघरात
देशाचा आम्हा सार्थ अभिमान
विसरु नका क्रांतिविरांचे बलिदान
स्मरणी ठेऊया भारतीय संविधान
एकात्मतेचे ह्या देशास वरदान
एकच संस्कृती जरी प्रांत अनेक
हिंदु मुस्लिम असती धर्म अनेक
आचरती ठेवूनी मनी विचार नेक
गाठुया चला यशाची शिखरे कैक
– रचना : नेहा हजारे. ठाणे
जय हिन्द…!