आत्मा सामावूनी ईश्वरी रूप,
देव करवी निर्मिती पृथ्वीवर,
धाडीले तुज स्त्री रूपात,
वंश-वेल वाढवी गर्भात।
वात्सल्याचा पान्हा पाजूनी तान्ह्यास,
महान कर्ज मज जन्मावर,
ना हिशोब मांडूनी ठेवलास,
अविस्मरणीय ऋण तुझे मजवर |
उन्हात करपलीस सावली होवूनी,
पावसात भिजलीस आडोसा देवूनी,
थंडीत ऊबेची रजाई कवटाळूनी,
झालीस ममतेची शिदोरी बांधूनी।
दर्शन घडता मनी लोचनी,
दिवस उगवती तुझ्या स्मृतींनी,
मायेचा अथांग सागर पसरूनी,
पोटी घालशी आई म्हणूनी।
संस्कार रुपी शाळा तू,
माझ्या जगण्याची जीवनदायी तू,
आयुष्यि विसाव्याचा किनारा तू,
तिन्ही जगाची जननी तू।
रचना – वर्षा महेंद्र भाबळ.