Saturday, March 15, 2025
Homeसाहित्यकर्मवीर भाऊराव पाटील आणि माझी शाळा

कर्मवीर भाऊराव पाटील आणि माझी शाळा

कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज, ९ मे रोजी पुण्यतिथी आहे. शिक्षणाचा वटवृक्ष लावलेल्या भाऊरावांच्या शाळेत शिकलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती सुनीता नाशिककर यांनी वाहिलेली ही आगळीवेगळी आदरांजली…..

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या शाळेत माझं शिक्षण झालं. कर्मवीरांनी ती शाळाच सुरू केली नसती तर, आज मी जिथे आहे, तिथे असू शकते का? तर नक्कीच नाही. महान कर्मवीरांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या शाळेत मी शिकत असतानाच्या काही आठवणी….

जीवनात माणूस कितीही मोठा झाला तरी तो आपलं बालपण, आपली शाळा विसरत नाही, असं मला वाटतं. आज जरी मी पोलिस अधिकारी झाली असली तरी माझ्या जडणघडणीत माझ्या शाळेचा खूप मोठा वाटा आहे. शैक्षणिक क्षेत्रातील महर्षी डाॅ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या हुपरी येथील लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कुल या शाळेत मी शिकत असतांनाचा एक प्रसंग सांगत आहे.

डाॅ.कर्मवीर भाऊराव पाटील, त्यांना अण्णा असे संबोधिले जाई, तर अण्णांच्या संस्थेत मी शिकत होते. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल मला नितांत आदर होता. पुढे तो दिवसेंदिवस वाढत गेला. त्यातूनच अण्णांचे शिष्य बॅरिस्टर पी.जी.पाटील यांनी अण्णांवर लिहिलेला शालेय पुस्तकातील संपूर्ण पाठ मी मुखोद्गगत केला होता. २२ सप्टेंबर या अण्णांच्या जयंतीनिमित्त आमच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सर्व सहभागी स्पर्धकांची भाषणे झाली. आणखी कोणास बोलायचं आहे काय? म्हणून विचारले असता मी मनाचा हिय्या करून उठले व सर्व पाठ धडाधड बोलून दाखवला. या पाठामध्ये बॅरिस्टर पी.जी.पाटील सरांनी लिहिले होते कि, “एके दिवशी अण्णांच्या वसतिगृहात मी गेलो होतो. रात्री जेवणाची वेळ झाली होती. अण्णांनी मला जेवणाचा आग्रह केला असता वसतिगृहातील जेवण ते कसले असणार? म्हणून मी भूक नसल्याने सांगितले. उपाशी असल्याने मध्यरात्रीपर्यंत झोप येत नव्हती. अण्णांनी ते ओळखले व वसतिगृहात माझ्यासाठी जेवण मागविले. भाकरी, पिठलं व कांदा हे जेवण मी खाल्ले असता मला ते पंचपक्वानापेक्षा चांगले वाटले. मी अण्णांना कडकडून मिठी मारली” निरागसपणे मी सर्व पाठ म्हणत होते. कौतुक मिश्रित हास्याने सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अर्थातच मला प्रथम क्रमांक मिळाला. त्या दिवशी आमच्या गावच्या आठवडे बाजारात आमच्या आवडत्या साळुंखेबाई भेटल्या. माझ्यासोबत असलेल्या माझ्या आईजवळ येऊन त्यांनी माझ्या भाषणाबद्द्ल खूप कौतुक केले.

थोड्याच दिवसात बॅरिस्टर पी.जी.पाटील सर व आदरणीय सुमती पाटील मॅडम रयत शिक्षण संस्थेच्या मुलांच्या शाळेत येणार होते. माझ्या शिक्षकांनी मला सदर पाठ हा बॅरिस्टर पी .जी.पाटील यांनी लिहिलेला असुन मी तो त्यांच्यापुढे तसाच सादर करावा असे सांगुन म्हणून पुन्हा तेथे मला भाषण करण्यास सांगितले. माझ्या त्या भाषणास बॅरिस्टर पी.जी.सरांनी व आदरणीय सुमती पाटील मॅडमनीसुध्दा मनापासून दाद दिली. कर्मवीरांची शाळा, ध्येयवादी – मुलांच्या कला गुणांना प्रोत्साहन देणारे शिक्षक यांच्यामुळेच मी घडत गेले. कर्मवीर डॉ भाऊराव पाटील यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.

लेखिका – सुनिता नाशिककर

– लेखन : सुनिता नाशिककर.
(पोलिस उपअधीक्षक, कोल्हापूर)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments