Friday, March 14, 2025
Homeसाहित्यस्त्री

स्त्री

स्त्री ही क्षणाची प्रेयसी आणि अनंतकाळची माता आहे, असे म्हणतात. पण त्या क्षणभर प्रेमाकरिता ती काय काय करू शकते हे फक्त तिचे तीच जाणो.

खऱ्या प्रेमाची ती सदा आसुसलेली असते, मग ते प्रेम पतीवर केलेले असो अथवा भाऊ, बहीण, मैत्रीण, आई, वडील, अगदी स्वतःच्या मुलांवर केलेले असो. ज्या ओढीने ती समोरच्यावर प्रेमाचा वर्षाव करते, त्याच प्रकारचे प्रेम जेव्हा तिला अनुभवायला मिळते, तेव्हा ती कृतार्थ होते, धन्य होते.

स्त्रीचा स्वभाव म्हटले तर किती सरळ पण आत डोकावून पाहिले तर किती गुंतागुंत !!
कुणीतरी म्हटले आहे ना, स्त्री म्हणजे बुध्दीने विचार केला तर कधीही न समजणारं एक व्यक्तित्व आहे पण प्रेमाने विचार केला तर एक सरळ अस्तित्व आहे . हातचं काहीही राखून न ठेवता समोरच्यावर प्रेमाची उधळण करणे, हे तर ती मातेच्या गर्भात असतानाच शिकलेली असते. आपल्या प्रेमावर कुणीही अविश्वास दाखवलेला तिला जराही सहन होत नाही.

मैत्रिणींच्या घोळक्यात, कुटुंबाच्या छायेत, प्रेमाच्या वर्षावात न्हाऊन निघालेली ती जेव्हा सासरी प्रथम पाऊल टाकते, तेव्हा साशंकतेने दडपलेले तिचे मन समोरच्यांच्या प्रेमळ नजरांना सरावते, तेव्हा ती खऱ्या अर्थाने फुलते आणि संसारात रममाण होते. तेव्हा अंगावर पडलेल्या जबाबदारीचे ओझे वाटण्याऐवजी ती त्याचा हसतमुखाने स्वीकार करते आणि सासर माहेर यातील फरक तिच्या लेखी नाममात्र उरत नाही.
पण तीच स्त्री जेव्हा आपल्या प्रेमाला समोरून प्रतिसाद मिळत नाही म्हटल्यावर पूर्णपणे खचून जाते, तिच्या जगण्यातील उमेद सरून जाते.

मध्यंतरी एक चित्रपट पाहिला होता, त्यातील नायिका व नायक यांचे एकमेकांवर अपार प्रेम असते, त्यांचे लग्न होऊन संसाराला सुरुवात होते. पण नायिका असते अगदी आधुनिक आणि स्वतंत्र विचारसरणीची तर नायक असतो पुरातन विचारांचा, एकत्र कुटुंबपद्धतीला घट्ट धरून असलेला. थोड्याच दिवसांत त्यांचे पटेनासे होते आणि दोघेही वेगळे होण्याचा निर्णय घेतात. यथावकाश त्याचे दुसरे लग्न होते, पण ती मात्र पहिल्या प्रेमातच गुरफटलेली राहते. आजूबाजूचे सर्व तिला सांगत असतात की नव्याने जीवनाची सुरुवात कर, पण तिचे मन मात्र मानायलाच तयार होत नाही. सगळेजण सांगत असतात की त्याचे तुझ्यावर खरे प्रेम नव्हतेच, नाहीतर तो असा वागलाच नसता, पण ज्या उत्कंठतेने तिने त्याच्यावर प्रेम केले होते त्याच प्रेमाच्या आठवणीत ती सदैव बुडालेली असते, वेगळे होऊनही तिच्या त्याच्यावरच्या प्रेमात जराही कमी आलेली नसते. तिचे मन सदैव तिला एकच प्रश्न विचारत असते की त्या काळात तरी त्याचे माझ्यावरच प्रेम खरे होते का? आणि याच प्रश्नांच्या उत्तरात ती त्याचा मागोवा घेत असते आणि कालांतराने जेव्हा तिला त्याचे खरे रूप कळते, आणि तिला समजते की तिच्यावरच्या प्रेमापोटीच त्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतलेला असतो, तिच्या प्रगती आड येणारा आपला प्रत्येक मार्ग त्याने स्वतःहूनच बंद केलेला असतो, ज्याक्षणी तिला हे कळते तिचे मन थुई थुई नाचू लागते.

तिला फक्त हेच माहित करून घ्यायचे होते की ज्या काळात तिने त्याच्यावर अंतःकरणापासून प्रेम केले होते त्यावेळचे त्याचे प्रेम देखील अगदी हृदयाच्या गाभ्यापासून केलेले होते का ? हे सर्व माहित झाल्यावर मग मात्र तिच्या मनात त्याच्याबद्दल जराही आकस राहत नाही. पूर्वीच्याच निखळपणे ती त्याच्याशी संवाद साधते आणि त्याच्या नवीन संसाराला देखील शुभेच्छा देते.

या कथेतील नायिका काय किंवा वास्तव जीवनातील स्त्री, दोघींचे अंत:करण मात्र एकाच धाग्याने ओवलेले असते आणि तो धागा असतो एकमेकांवरील विश्वासाचा, शाश्वत प्रेमाचा.

लेखिका – मानसी लाड

– लेखन : मानसी लाड.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अतिशय सुंदर आणि समर्पक वर्णन स्त्री च्या अंगी असणाऱ्या विविध गुणांची परिपूर्ती थोडक्यात आणि अर्थपूर्ण मांडली गेली आहे. प्रसंगी मनाने हळुवार असणारी स्त्री आपल्या कुटुंबा सोबत इतर ठिकाणी पण आपला ठसा उमटवत असते मग ते नातेवाईक असोत की मित्र मैत्रिणी चा कंपू असो पूर्वी पासून स्त्री शक्तीचे गोडवे गायले गेलेत म्हणून तर प्रत्येक नात्याला स्त्री मुळे पतीपूर्णता येते मानसीने खूपच छान वर्णन आपल्या लेखात केले आहे. पुढील वाटचाली साठी मानसी तुला खूप खूप शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments