बॉम्बे टेलिफोन्स :
सोमवार दि 25 नोव्हेंबर 1985 ला सकाळी ठिक 10.00 वा. फिनिक्स मिल, ट्रेनिंग सेंटरला पोहचलो. नवीन मित्र मिळाले. टेलिफोन ऑपरेटरच्या तीन महिन्याचे ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केले .
कुलाबा ऑफिसमधून काही मित्रांना साऊथ एरिया, काही मित्रांना नॉर्थ एरियासाठी पोस्टिंग मिळाले. माझी पोस्टिंग नॉर्थ एरिया साठी होती. त्या वेळेस नॉर्थ एरिया चे एरिया ऑफिस म्हात्रे पेन बिल्डिंग, दादर येथे होते. तेथून पुन्हा काही मित्र प्रभादेवी, काही मित्र वडाळा, काही मित्र वरळी एक्सेंजला पोस्टिंग झाली. दि. 25 फेब्रुवारी 1986 रोजी आमच्या सहा जणांची (मी, बेडेकर, शिर्के, संसारे, तोडकर, व राणे) वरळी (एम डी एफ / टेस्ट रूम) मध्ये पोस्टिंग झाली.

मला सरकारी नोकरी लागल्यानंतर प्रथम मी माझ्या वडिलांना सांगितले, आता तुम्हांला नाक्यावर काम करण्याची आवश्यकता नाही तुम्ही गावी जाऊन आराम करा. मी त्यांना गावी पाठवून दिले. भाऊ शाळा शिकत नव्हता त्याला मुंबईला बोलावून घेतले. त्याने कोहिनुर टेक्निकल इन्स्टिटयूटमधून कोर्स करून स्वतःचं कामकाज चालू केले. त्याच्या राहण्याची व जेवणाची सोय एका नातेवाईकाकडे केली.
त्यावेळी बॉम्बे टेलिफोन मध्ये मॅन्युअल काम असल्याने वरळी (एम डी एफ / टेस्ट रूम) मध्ये सर्व मिळून अंदाजे किमान 100 पेक्षा जास्त स्टाफ होता. निश्चित आकडा वरळीचे सदाबहार हसतमुख क्लार्क श्री अभिजित कर्णिक सांगू शकतील किंवा श्री संजय अंबुर्ले सांगू शकतील. 80/90 सुपरवायझर + ऑपरेटर स्टाफ होता. त्यात 60 च्या आसपास लेडीज व 24/25 जेन्टस होता. बाकी वायरमन होते.
वरळी टेस्टरूम म्हणजे एक कुटुंब होतं. वरळी मध्ये नवीन मित्र, मैत्रिणी भेटल्या. एक वेगळेच ऋणानुबंध होते. मल्ल्या मॅडमच्या हाताखाली आम्ही (492/494) टेस्टिंग शिकलो. विश्वकर्मा, फुलारा यांनी E10B (493) टेस्टिंग शिकविले. त्यात मी माझे अनुभव, माझा अभ्यासानुसार जेव्हा जेव्हा नवीन स्टाफ ट्रान्सफर होऊन येई तेव्हा त्यांना टेस्टिंग शिकवायचो.
टेस्ट रूममध्ये मॉर्निग, जनरल, इव्हिनिंग अशा ड्युट्या असायच्या. मी नेहमी इव्हिनिंग ड्युटी करायचो. आमचा इव्हिनिंगचा पर्मनंट ग्रुप झाला होता. संध्याकाळी भेळ अथवा वडापावची पार्टी व्हायची. कोणी घरून स्पेशल काही तरी आणायचे. दिवाळीचा फराळ आणि संक्रातीला तिळाचे लाडू भरपूर खाल्ले. दर सुटीच्या दिवशी, रविवारी ओव्हर टाईम असायचा.
ओतूरला कॉलेजला असताना मनोमन इच्छिलेल्या मुलीशी दि.25 फेब्रुवारी 1987 रोजी माझे लग्न झाले. त्यावेळी वरळी टेस्टरूम मधील स्टाफने मला स्टील टाकी आहेर म्हूणन भेट दिली होती. आजही ती स्टील टाकी आम्ही वापरतो.

वडील व आजी वयस्कर झाल्यामुळे त्यांच्या खाण्या पिण्याची अडचण होती, म्हणून लग्नानंतर माझी बायको गावी असायची. बायको गावी असल्याने दर दिड / दोन महिन्यानंतर मी ओव्हर टाईमचे पैसे न घेता त्या ऐवजी आठ / दहा दिवस बदली सुट्टया घेऊन गावी जायचो. तेव्हा श्री कर्णिक नेहमी म्हणायचे तुमच बरं आहे बुआ. ऑन ड्युटी गावाला जाऊन येता!

कंट्रोलिंग ऑफीसर म्हणून श्री गोरे साहेब, श्री बेलापूरकर साहेब, श्री मिस्त्री साहेब, श्री साखरे साहेब, श्री गाडे साहेब तसेच एम डी एफ जेई गुरुराज साहेब यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली.
01 ऑगस्ट 1988 ला आम्ही रेग्युलर झालो. त्याच वेळी ठाम निश्चय केला होता की ज्या डिपार्टमेंट मध्ये आपण कॅज्युअल लेबर म्हूणन काम केले, झाडू मारला, लादी साफ केली त्याच डिपार्टमेंट मध्ये अधिकारी पदापर्यंत जायचेच. कारण 1986 ते 1988 पर्यंत सर्व माहिती मिळाली होती की, अधिकारी बनण्या साठी 35% डिपार्टमेंटल कोटा असतो. शिक्षण कमीत कमी दहावी पास असायला हवे. आणि पाच वर्ष रेग्युलर सर्व्हिस हवी. आपणही परीक्षा देऊन अधिकारी होऊ शकतो अशी खूणगाठ मनाशी बांधली होती. आम्ही 1994 रिक्रूटमेंट वर्षासाठीच्या परीक्षा साठी एलीजीबल होणार होतो.
भावोजी टेलिफोन डिपार्टमेंटलाच असल्याने माहिती मिळत होती. ते स्वतः जे ई साठी प्रयत्न करत होते. तिसऱ्या प्रयत्नात ते जे ई झालेच.
1994 जेटीओ रिक्रूटमेंटची परीक्षा 1996 पर्यंत झालीच नाही. दरम्यानच्या काळात 1986 ते 1999 पर्यंत वरळी टेस्ट रूममध्ये भरपूर कामे केली. मी प्रायव्हेट वायर सेक्शन सोडलं तर बाकी सर्व सेक्शनमध्ये कामे केली. वर्क ऑर्डर सेक्शनमध्ये नवीन लाईन्स, नॉन पेमेंट, शिफ्टिंग, रेड एन्ट्री, मिसलिअन्स वर्क, इत्यादी कामे केली. टेस्ट रूममध्ये टेस्टिंग, डायव्हर्शन, केबल फॉल्ट, कट ओव्हर, एरिया ट्रान्सफर, कॉम्प्युटर एन्ट्री, रेकॉर्ड्स, इत्यादि कामे केली. रिसेप्शनला सुध्दा ड्युटी केली.
वरळीमध्ये प्रत्येक दिवस गमती जमती करत, दुसऱ्यांना हसवत पार पाडला. ए.ई. कॅबिन व वर्क ऑर्डर सेक्शन बाजू बाजूला असायचे. एकदा वर्क ऑर्डर मध्ये दोन जणींमध्ये कशावरून तरी भांडण झाले. दिवसभर सन्नाटा. न राहून मिस्त्री साहेबांनी पनीकर मॅडमना विचारले आज आरोटे आया नही क्या? बहुत शांत शांत है! आणि एकच हशा झाला.
बरेच जुने मित्र / मैत्रिणी ट्रांसफर होऊन गेले. नवीन ट्रांसफर होऊन आले. काम करीत असताना काही समज, गैरसमज झाले. त्यातून वाद विवाद झाले.पण त्यातून ही ताऊन सुलाखून निघालो. श्री गाडे साहेब व डी.ई.श्री.डे साहेब यांना मी विशेष धन्यवाद देतो. कारण त्यांनी त्यावेळेस समंजस भूमिका घेतली व प्रकरण मिटले. कारवाई झाली असती तर कदाचीत माझे रेकॉर्ड खराब होऊन जेटीओची परीक्षा देता आली नसती. माझे अधिकारी बनण्याचे स्वप्न धुळीला मिळाले असते. वरळीच्या वार्षिक पूजा, स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम यातून निखळ आनंद मिळाला.
पहिलं कन्यारत्न प्राप्त झाले तेव्हा संपूर्ण टेस्टरूम मध्ये दादरच्या सामंत ब्रदर्सची 7 किलो बर्फी वाटली. भावाचे लग्न करण्याचे ठरले तेव्हा मी सन 1991 मध्ये एलआयसी हौसिंग मधून 45,000/- रुपये हौसिंग लोन घेऊन कल्याणला बैठ्या चाळीमध्ये 50,000/- रुपयाला रूम विकत घेतली. भावाचे लग्न झाले. भावाने गावी सेटल होऊन बिझिनेस चालू केला. मी बायकोला घेऊन कल्याणला आलो. आमचा तिघांचा (मी, बायको, आणि मुलगी) संसार सुरु झाला. दुसरं कन्यारत्न व पुत्ररत्न प्राप्त झाले. तेव्हाही टेस्ट रूममध्ये सामंत ब्रदर्सचीच बर्फी व पेढे वाटले होते.
अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याच्या इच्छेमुळे मी सन 1993 ला टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथून बीए करण्यासाठी ऍडमिशन घेतली. सन मे 1994 ला प्रथम वर्ष पास झालो. नोव्हेंबर 1994 मध्ये आजारपणामुळे भावाचे निधन झाले. त्याच्या निधनापूर्वी त्याच्या उपचारासाठी कल्याणचे उपासणी हॉस्पिटल, घाटकोपरचे हिंदु महासभा हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, फिरत होतो. विश्वास विचारे याच्या बरोबर कुर्ल्याला एका मठात ही गेलो. यामध्ये तब्बल सहा महिने गेले. ड्युटी करून अभ्यास केला. मे 1995 ला द्वितीय वर्ष पास झालो. मे 1996 ला तृतीय वर्षाच्या पदवी परीक्षेचं हॉल तिकिट आले आणि तेव्हाच सन 1994 रिक्रूटमेंट जेटीओ पदासाठी परीक्षा जाहीर झाली.
प्रथम लग्न कोंडाण्याचे म्हणून जेटीओच्या परीक्षेची तयारी चालू केली. 1996 ला JTO परीक्षा दिली पण त्यामध्ये यश मिळाले नाही.
1 ऑक्टोबर 1998 पासून सर्वजण एमटीएनेलमध्ये अँबसॉरब झाले. कर्मचाऱ्यांचा पगार वाढला. तशातच आता एमटीएनेलमध्ये डिपार्टमेंटल जेटीओची परीक्षा होणार नाही अशा अफवा निघाल्या. मन खट्टू झाले. आपले अधिकारी बनण्याचे स्वप्न, स्वप्नच राहते असे वाटू लागले.
जेटीओची परीक्षा होवो अथवा न होवो याचा विचार न करता डोंबिवलीला अग्रेसरांचा वर्षभर क्लास केला.
वर्ष अखेर अचानक 1995 रिक्रूटमेंट जेटीओ पदासाठी परीक्षा जाहीर झाली. ही परीक्षा जाहीर झाल्यावर इतर स्टाफने क्लास चालू केले तो पर्यंत आमचा 90% ते 95% सिल्याबस शिकून पूर्ण झाला होता. या वेळेस चान्स सोडायचा नाही म्हणून झपाटल्यासारखे चार महिने रजा घेऊन कंबर कसून अभ्यास केला. मे 1999 मध्ये परीक्षा दिली. तेव्हा साधारण 5/6 किलो वजन कमी झाले होते. फेब्रुवारी 2000 मध्ये वरळी मधून फॉउंटंन टेलिफोन एक्सेंजमध्ये ट्रान्सफर झाली.
जुन 2000 मध्ये जेटीओ परीक्षेचा निकाल लागला. मी दुसऱ्या प्रयत्नात ही परीक्षा पास झालो होतो. माझा तिसरा क्रमांक आला होता. माझे अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले होते. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस होता. वरळी टेस्ट रूम मधील मित्र मैत्रिणी कडून खुप प्रेम, आपुलकी व सहकार्य मिळाले. वरळीच्या स्टाफशी घट्ट नाते जोडले गेले होते. त्यामुळे जरी त्यावेळी मी फाउंटनला होतो तरी वरळीमधील सर्व मित्र मैत्रिणी व स्टाफ साठी जंगी पार्टी दिली होती.
क्रमश …
– लेखन : मोहन आरोटे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
माझी जीवनगाथा खुप छान लेखन आहे.
आई कविता छान .
स्त्रील लेख छान आहे.
तिन्ही लेखकांचे अभिनंदन