Friday, March 14, 2025
Homeसाहित्यसुधाकर करवंदं !

सुधाकर करवंदं !

नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार सुधाकरराव डोईफोडे यांना आधुनिक शेतीमध्ये खूप रस होता. ते नेहमीच नाविन्याचा शोध घेत असत. जिथे जातील तिथे नविन काही तरी शोधुन आपल्याकडे लागवड करण्याचा त्यांचा प्रयत्न असे.

मला त्यांच्या सोबतच्या दौऱ्यात नेहमी हे अनुभवायला मिळाले. वेगवेगळ्या साहित्य संमेलनाला जाताना नांदेडहुन पांढऱ्या सोनं चाफ्याच्या कलमा ते घेवून जात. पुणे, भिमाशंकर येथे सुद्धा त्यांनी ह्या कलमा नेऊन लावल्या. त्यांच्या सोबत आम्ही गेलो की आम्हाला ही हे सर्व करावं लागायचं. मग सोबत असलेले प्रभाकरराव कानखेडकर असो वा देविदास फुलारी, वसंत मैया, उमाकांत जोशी, सर्वच सहभागी होत असू. या संदर्भात ते सगळ्यांना कामाला लावत असत. त्यांचे चिरंजीव शंतनुही यातून सुटले नाही.

जेष्ठ पत्रकार सुधाकर डोईफोडे.

पुण्याहुन येताना सुधाकररावांनी शंतनू यांना काळ्याभोर रंगाच्या आंबटगोड अशा करवंदाची डाल महात्मा फुले मंडईतुन आणण्यासाठी सांगितले. तिच करवंद खाऊन खाऊन साठवलेल्या बियांची लागवड केली.

आज त्याच करवंदाची शेती फ़ुलली आहे. त्या करवंदाची चव चाखतांनाचा आनंद आणि चव शब्दात सांगणं कठीण आहे म्हणूनच की काय डॉ. शिवाजी शिंदे यांच्या माउली फळबागेत करवंदाचं नामकरण केलं ते सुधाकर करवंद म्हणून.

डोंगर कपारीत आपोआप उगवणारी करवंदाची काटेरी झुडपे अनेकदा पाहण्यात येतात. एप्रिल आणि मे हा हे फळ लागण्याचा काळ आहे. कच्ची करवंदे तोडल्यानंतर पांढऱ्या रंगाचा चीक येतो आणि तो हाताला चिकटतो.
ही फळे जूनच्या सुमारास पाऊस सुरू झाल्यावर गळून जातात. करवंदांची चटणी करतात आणि शिवाय त्यांच्यापासून सरबत, लोणचे, मोरंबा वगैरे करता येतो.

आज डोईफोडे यांच्या शेतात करवंदाने बहरलेल्या जाळीत काळीभोर, आंबट गोड, चिकट करवंद चवीने खाताना आणि मोठ्या काट्याची तमा न बाळगता तोडून घेताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. पण करवंदांविषयी केवळ वाचण्यात, बघण्यात आनंद नाही जो काळ्याभोर करवंदाच्या हाताला चिकटलेल्या पांढऱ्या चिकासह खातांना येतो.

त्याकाळी डोईफोडे साहेबांनी पेरलेल्या बियांना आज करवंद लागली, जी आजच्या पिढीला चाखायला मिळतायत. तर आपणही जमेल तिथे, जमेल तशी फळ झाडांच्या बिया पेरणार ना? जेणेकरून आपली पुढची पिढी त्याची फळं चाखू शकतील !

– लेखन, छायाचित्र : विजय होकर्णे.
-संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. छान करवंद प्रसार झाला पाहिजे, हा रानमेवा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments