यापूर्वीच्या भागात आपण एक विज्ञाननिष्ठ लेखक आणि अनुवादक असलेले महान धर्मगुरू ऍम्ब्रॉसिअस ज्यांनी मॉस्कोच्या गरिबी निर्मूलनासाठी मोलाचे योगदान दिले होते त्यांची समाजाने अंधभक्तीतून केलेली हत्या, त्यानंतर मॉस्कोवर पडलेले मृत्यूचे काळे सावट आणि या सर्व परिस्थितीचा तत्कालिन रशियन सम्राज्ञी कॅथरीन द्वितीय हिने धिटाइने केलेला सामना यावर प्रकाश टाकला.
एकोणविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजेच १८८९-१८९५ या पाच सहा वर्षाच्या काळात एशियाटिक फ्लू किंवा रशियन फ्लू या जीवघेण्या विषमज्वरामुळे जगभरातील जवळपास १० लाख लोक मृत्यू पावले होते. अभ्यासकांच्या मते ही महामारी एकोणविसाव्या शतकाच्या अंताची एक भयंकर महामारी समजली जाते जिचा सर्वाधिक प्रभाव आढळला तो ऑक्टोबर १९८९ ते डिसेंबर १८९० या काळात आणि या महामारीने पुन्हा डोके वर काढले ते सन १८९१ च्या मार्च ते जून, नोव्हेंबर १८९१ ते जून १८९२, सन १८९३- १८९४ मधील हिवाळा आणि १८९५ चा पूर्वाध अशा आलटून पालटून येणाऱ्या मौसमाने.
सदर साथीच्या रोगामुळे पसरलेल्या महामारीस नेमका कोणता घटक जबाबदार आहे याबद्दल बराच काळ विश्वासार्ह माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
सन १९५० पर्यंत या आजारास ‘एच टू एन टू’ नामक विषाणूमुळे होणारा ज्वर असे संबोधले गेले. सन १९९९ मधील एका अभ्यासाने हा विषाणू ‘एच थ्री एन एट’ चा एक उपप्रकार असल्याची पुष्टी दिली. इसवी सन २००५ च्या एका जैववैद्यकीय अभ्यासाने असाही अनुमान लावला की हा विषमज्वर नसून मानवी कोरोना व्हायरस ‘ओ सी फोर थ्री’ असावा.
मित्रांनो, विज्ञान तंत्रज्ञानाने मोठमोठी संशोधने, शोध आपल्या नावे नोंदविले आहेत. माणसाने चंद्रावर पाय ठेवला आहे. अणुबॉम्ब, क्षेपणास्त्रे बनवून राष्ट्रांनी परकीय शक्तींवर दबाव प्रस्थापित करण्याची जोरदार तयारी देखील केली आहेच. परंतु हेच सर्वस्व राष्ट्रांनी मानवी आरोग्याला धोका ठरलेल्या रोगराईच्या अभ्यासावर लावले असते तर आज चित्र फार वेगळे असते, नाही का?
शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचा शिष्य असलेल्या अलेक्झांडर येरसिन याने हाँगकाँगमधील बुबॉनिक प्लेग साथीच्या प्रादुर्भावादरम्यान इसवीसन १८९४ मधे वाय.पेस्टीजचा शोध लावला. येरसिनने हे देखील सिद्ध केले होते की, बॅकील्लस हा घटक उंदीर वर्गी प्राण्यांमधे आढळत असून उंदीर हा या विषाणूचा मुख्य वाहक आहे. ज्या यंत्रणेव्दारे वाय.पेस्टीजचा प्रसार होतो तिचा सिद्धांत पॉल लुईस सायमंडने १८९८ साली मांडला होता आणि त्यास असे आढळून आले होते की संक्रमितास चावल्यानंतर कित्येक दिवसांनी वाय.पेस्टिसची प्रतिकृती बनवून पिसांच्या चाव्याव्दारे अडकलेली आढळते. हा अडथळा पिसांना रोकतो आणि त्यांना आक्रमक आहार वर्गाकडे वळवतो आणि नूतनीकरण करून अडथळा दूर करण्याचा प्रयत्न करतो, परिणामी हजारो प्लेग विषाणू आपल्या अस्तित्वासाठी शरीरात वाहू लागतात आणि यजमान उंदीरमामास संक्रमित करतात.
ब्युबोनिक प्लेग तंत्र दोन प्रकारच्या उंदरांच्या प्रजातीवर आधारीत आहे. एक प्रजात जी विषाणूला आपल्यात सामावून घेत रोगाचा प्रतिकार करते आणि दुसरी अशी प्रजात जिच्यात प्रतिकाराचा अभाव असतो.
ज्यावेळी दुसऱ्या प्रजातीची उंदरे मरतात त्यावेळी त्याची पिसं इतर वाहकास बाधित करतात ज्यात बरेचदा मानववर्गाचा देखील समावेश असतो. याच कारणाने मानवी संस्कृतीच्या इतिहासात स्वच्छतेला फार महत्त्व प्राप्त झाले असावे. जिथे स्वच्छता असते तिथे इश्वरी शक्ती वास करते असे म्हणतात. संसर्गजन्य रोग आणि त्यातून होणारा प्रादूर्भाव टाळायचा असेल तर आपले घर, आपला परिसर, आपले विचार आणि आपले मन स्वच्छ ठेवू यात !
पुढल्या भागात मानवी इतिहासातील आतंक ठरलेल्या अशाच एका महामारीवर आणि तत्सम संशोधनावर चर्चा करु या.

क्रमश :………
– लेखन : तृप्ती काळे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.