एमटीएनएल :
सोमवार दि.07 ऑगस्ट 2000 रोजी सकाळी 9.30 वा साकीनाका ट्रेनिंग सेंटरला जॉईन केले. 4 आठवडे प्री बेसिक, 16 आठवडे बेसिक ट्रेनिंग दि. 23 डिसेंबर 2000 रोजी यशस्वी पूर्ण केले. ट्रेनिंग चालू असताना मला नोट्स काढण्याची सवय होती. 200/250 पेजचे बुक मधून माझे 7/8 पानाच्या नोट्स तयार व्हायच्या. तेव्हढे वाचले तरी कशीही प्रश्न पत्रिका आली तरी कोणीही पास होणारच.
त्यावेळेस साधारण 7/8, JTO च्या बॅचचे ट्रेनिंग चालू होते. सर्व परीक्षार्थीकडे, एका बॅच कडून दुसऱ्या बॅच कडे माझ्या नोट्सच्या झेरॉक्स पोहचायच्या. तेव्हढा अभ्यास केला तरी सर्व पास व्हायचे. बरेच जण मला बघायला चौकशी करत माझ्या क्लास मध्ये यायचे. नोट्स बद्दल धन्यवाद द्यायचे. वरळीचे पी.आय. श्री मंजुरे साहेब यांच्या बॅचने मला सुंदर गणेशाची मूर्ती भेट दिली होती. आज ही तो बप्पा माझ्याकडे आहे.
बेसिक ट्रेनिंग नंतर 4 आठवड्याचे फिल्ड ट्रेनिंग मुलुंड (पी सी एम ) ला झाले. त्यानंतर 16 आठवडे स्पेशलायझेशनचे ( Transmission ) ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केले. माझ्या बॅच मध्ये 95% मार्क्स मिळवून मी प्रथम आलो.
ट्रेनिंगच्या शेवटच्या दिवशी दुपारी सहज म्हणून नंदज्योत इंडस्ट्रियल इस्टेट मधील जुन्या कंपनीतील मित्रांना भेटण्यास गेलो असता बघतो तर कंपनी बंद होण्याच्या मार्गांवर होती. फक्त दोनच स्टाफ काम करत होते. बाकी सर्व स्टाफ व कंपनी पार्टनर श्री त्रिवेदी साहेब कंपनी सोडून गेले होते. 15 वर्षा नंतरही माझ्या जुन्या मित्रांचा पगार तीन/साडेतीन हजार होता. कंपनी कधीही बंद होईल याची भीती त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. मी बीटा केमिकल्स सोडते वेळी क्षणिक 4000/- रुपये पगाराचा विचार न करता योग्य निर्णय घेतल्याचे मला समाधान वाटत होते. नंतर सहा महिन्यात बीटा केमिकल्स कंपनी बंद झाल्याचे समजले.
JTO चे 10 महिन्याचे ट्रेनिंग पूर्ण करून दि. 21 मे 2000 रोजी, माझी वरळी एक्सटर्नल (AWL-I) मध्ये JTO म्हणून नेमणुक झाली. कंट्रोलिंग ऑफिसर होते श्री दिलीप कुमार दास साहेब. माझा एरिया होता, ब्लॉक 8 व 25. डॉ. ए बी रोड ते वरळी सी फेस., आर जी. थडानी मार्ग ते सासमीरा. सर्व VVIP कस्टमर होते. वरळी (एमडीएफ/टेस्ट रूम) तसेच AWL-1 चा स्टाफ पूर्वीचे ओळखीचे असल्यामुळे डिव्हिजनला काम करायला काही अडचण आली नाही.
ऑपरेटर ओळखीच्या आहेत म्हणून कधी बोगस क्लिअरन्स काढले नाही. मी माझ्याकडील स्टाफचे( टी एम.) दोन ग्रुप केले होते .एक ग्रुप फॉल्ट बघायचा, एक ग्रुप, वर्क ऑर्डर पूर्ण करायचा. एखाद्या ग्रुपला काम नसेल तर त्यांनी दुसऱ्या ग्रुपला मदत करायची हे ठरलेलं असायचे. त्यामुळे माझ्या सेक्शनमध्ये संध्याकाळी झिरो फॉल्ट असायचे तर, वर्क ऑर्डर प्रलंबित नसायच्या. वर्क ऑर्डर कॅन्सलेशन 0% असायचे. कधीतरी ED ऑफिस मधून एखादी VVIP ची तक्रार असेल तरच मी एरियात जात असे. अन्यथा एरियात जात नसे.
गणेशोत्सव काळात ऑगस्ट 2001 मध्ये माझी आजी, जिने आम्हाला लहानाचे मोठे केले, आई समजून तिच्या अंगा खांद्यावर आम्ही खेळलो, काही चुका झाल्या तर तिच्या पदरा आड लपलो, तिच्या मुळे आम्ही जिवंत होतो, तिच्या मुळे आम्ही दुनिया पाहू शकलो, जिने आम्हा बहीण भावांना सांभाळले तिला आम्ही शेवटपर्यंत सांभाळले कारण तिलाही आमच्या शिवाय कोणीच नव्हते. आमचा सांभाळ व्हावा म्हणून मोह नको म्हणून तिने तिची सर्व इस्टेट तिच्या दिरांना देऊन टाकली होती. त्या माऊलीचे 104 वर्षे वय असताना माझ्या कल्याणच्या घरी दुःखद निधन झाले. निधन होण्या चार दिवस अगोदर ती घरात पाय घसरून पडली व खुब्या मध्ये मल्टीपल फ्रॅक्चर झाले. वय जास्त असल्याने डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास असमर्थता दर्शविली. काहीच उपचार करू शकलो नाही. फक्त ह्या एकाच गोष्टीची मनामध्ये खंत राहून गेली.

वरळी डिव्हिजनमध्ये माझे काम मी इमाने इतबारे करत होतो. पण काही अपरिहार्य कारणास्तव मी दि. 31 जुलै 2003 रोजी, वरळी सोडून स्पेशलायझेशनचे (Transmission) ट्रेनिंग घेतलेल्या फिल्ड मध्ये ED ऑफिस तर्फे प्रभादेवी (पी सी एम) ला पोस्टिंग करून घेतली. सन 2003 ते सप्टेंबर 2005 पर्यंत JTO प्रभादेवी (पी सी एम) तर, ऑक्टोबर 2005 ते जुलै 2014 पर्यंत SDE प्रभादेवी (पी सी एम/MLDN) म्हणून कार्यरत होतो. प्रभादेवी (पी सी एम) मध्ये लोअर ऑर्डर (पी सी एम) टेक्नॉलॉजी सिस्टीम तसेच हायर ऑर्डर (पी सी एम) टेक्नॉलॉजी सिस्टिम मध्ये काम केले. MLDN नॉक सिस्टिम माझे आवडते सेक्शन होते. त्याच बरोबरीने पी सी एम स्टाफ ऍडमिन म्हणून काम पाहिले.
MTNL मध्ये एक वर्षासाठी अँपरेंटीस म्हणून रूजू होणाऱ्या इंजिनिअर मुलांना टेलिकॉम मधील ट्रान्समिशन आणि न्यू टेक्नॉलॉजी (MLDN) बाबत शिकवायचो. विशेषत: श्री एस.व्ही. झोपे साहेब (DE) व श्री पी.व्ही. चव्हाण साहेब (संपूर्ण MTNL मधील PCM मास्टर) यांच्या बरोबर काम करताना खुप मजा आली. ते दोघेही टेक्निकल तसेच प्रशासकीय कामांमध्ये माहीर होते. त्यांच्याकडून बरेच काही शिकलो. झोपे साहेब व मी, आम्ही दोघांनी संपूर्ण नॉर्थ एरियाचे, जुने PCM सिस्टीम चे स्क्रॅपिंग करून अंदाजे 35/40 लाख रुपयाचे MTNL ला उत्पन्न मिळाले.
दि. 08 मार्च 2014 रोजी माझ्या वडिलांचे तीव्र हृदय विकाराने कल्याण येथे निधन झाले. आईचे निधन पूर्वीच दि. 06 डिसेंबर 1969 रोजी झाले होते. मातृ पितृ छत्र हरपले.
11 जुलै 2014 रोजी माझी बदली कूपरेज (पी सी एम) मध्ये झाली. त्या वेळेस अधिकारी संघटनेचे पदाधिकारी श्री. श्रीशंकर साहेब GM (Trans ) [ VRS – 2019 नंतर 2020 मधेच ते प्रोमोशन मिळून ED MTNL Mumbai झाले होते ] यांच्याकडे गेले व श्री आरोटे यांना ट्रान्समिशन मधून GM (Admin ) प्रभादेवी ऑफिस मध्ये बदली करण्याची विनंती केली. श्री श्रीशंकर साहेबांनी ‘इंटरेस्ट ऑफ सर्व्हिस’ म्हणून त्यांची विनंती फेटाळून मला कूपरेजला, विशेष कामासाठी पोस्टिंग केले. काम होते पहिल्या मजल्यावरून नवव्या मजल्यावर लाईव्ह पी सी. एम सिस्टिम शिफ्ट करणे. श्री बिडगर,श्री वर्मा, श्री सावंत व मी स्वतः आम्ही सात/आठ महिन्यात सर्व पी सी एम शिफ्ट केले. आऊट डेटेड सिस्टीम स्क्रॅप केल्या.
नरीमन पॉईंट म्हणजे CIP व VIP एरिया. मंत्रालय, विधानभवन, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, आर्मी, नेव्ही, वानखेडे स्टेडियम, हायकोर्ट, सिव्हील कोर्ट, सर्व कॉर्पोरेट ऑफिसेस, यांचे नेटवर्क विना व्यत्यय चालू ठेवणे ही आमची जबाबदारी होती. आणि ती आम्ही यशस्वी पार पाडली. वरळी टेस्टरूम ला ऑपरेटर म्हणून, प्रभादेवी (पी सी एम) ला SDE म्हणून श्री गाडे साहेब यांच्या बरोबर काम केले. पुढे श्री गाडे साहेब GM Trans) म्हणून प्रोमोशन मिळाल्यावर त्यांचा स्टाफ म्हणून त्यांच्या बरोबर काम केल्याचा सार्थ अभिमान आहे.
सन 2014 ते 31जानेवारी 2020 पर्यंत SDE कूपरेज (पी. सी. एम.) म्हणून काम पाहिले. 1 ऑक्टोबर 2015 ला E5 स्केल (Sr. Manager/DE) फायनान्शिअल अपग्रेडेशन मिळाले. 1 ऑक्टोबर 2020 ला E6 स्केल (DGM ) फायनान्शिअल अपग्रेडेशन मिळणार होते पण त्या पूर्वीच VRS -2019 स्कीम आली आणि पुढचा विचार करून VRS घेतली. एकुण फेब्रुवारी 1986 ते जानेवारी 2020 या 34 वर्षाच्या सेवेत वेगवेगळी आव्हाने स्वीकारली.
ग्रुप डी मधील 10/12 दांडी बहादूर व ऑन ड्युटी ड्रिंक करणाऱ्या स्टाफला ताळ्यावर आणल्याने त्यांची सुपर ऍन्युअशन रिटायर्मेंट झाली. त्यांची फायनान्शिअल अपग्रेडेशन झाली. तर न ऐकल्यामुळे दिर्घ अनुपस्थिती बाबत, डिपार्टमेंट रुल नुसार एकाने नाईलाजाने VR घेतली तर एकाला CR घ्यावी लागली.
कूपरेजला बदली झाली तेव्हा सायंकाळी ऑफिस मधून घरी जाताना चिंचपोखळी स्टेशनला उतरून श्री मेनन यांना भेटण्यास गेलो असता कळले कि त्यांनी त्यांची रूम विकून ते डोंबिवलीला कुठेतरी शिफ्ट झाले आहेत. त्यानंतर ऑफिसला जाताना प्रत्येक दिवशी चिंचपोखळी स्टेशन आले कि माझी नजर माझ्या जन्म वास्तूवर जात असे. जाण्या येण्याच्या रस्त्यावर जर एखादे मंदिर असेल तर जाताना येताना दररोज आपले हात आपोआप जोडले जातात त्या प्रमाणेच मला दररोज माझ्या जन्म वास्तूचे दर्शन घेतल्या शिवाय चैन पडत नसे.
नोकरी कामधंदा या निमित्त पुन्हा मायानगरी मुंबईत येताना विचार केला होता कि आपल्याला नोकरी मिळेल का? मुंबई आपल्याला सामावून घेईल का? मुंबईत येताना जे इच्छिले होते त्यापेक्षा कितीतरी पटीने या मायानगरी मुंबईने मला दिले.
मुंबई शहरांची तीन दैवत, मुंबा देवी, महालक्ष्मी, आणि सिद्धिविनायक यावर माझी अपार श्रद्धा आहे. त्यांच्या कृपेनें मुंबई शहरात माझ्यावर कधीही संकट आले नाही.
MTNL कर्मचाऱ्यांचे वेतनमान चांगले असल्याने आपले जीवनमान सुधारले. फ्लॅट घेऊ शकलो. एक मुलगी B.Pharm, एक मुलगी BE (IT), तर मुलाला MA पर्यंत उत्तम शिक्षण देऊ शकलो. CRY (Child Rights and You) संस्थेतर्फे पाच वर्ष एक एक निराधार अथवा गरीब मुलांचा वर्षाच्या खर्चाचा भार उचलला.
नोकरी करत असतानाच आपण जिथे राहतो त्या हौसिंग सोसायटीत (कल्याण, ओतूर) अध्यक्ष, सचिव पदावर काम करून संस्था रजिस्टर करण्यापासून ते कन्व्हेअंस डिड करणे पर्यंत योगदान दिले. सेवानिवृत्ती पश्चात जमेल तेव्हढी समाजसेवा करण्याचा प्रयत्न करीन.
विशेष आभार
माझ्या आयुष्यातील जडण घडण मधील लहानचा मोठा करण्यामागे माझ्या आजीचे मोठे योगदान आहे. मुलांना आयुष्यात आपल्या पायावर उभे करण्यासाठी जमेल तितके शिक्षण देण्यासाठी उभे आयुष्य कष्ट करणारे माझे वडील. मुंबई शहरामध्ये आपले स्वतःचे डोक्यावर छप्पर नसताना राहायला जागा व दोन वेळचे जेवण देणारे बहीण, भावोजी व इतर सर्व नातेवाईक, लग्न झाल्यापासून घरच्या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळणारी माझी पत्नी, यांचे आभार. आजी, वडील, पत्नी, बहीण यांचे फक्त आभार मानून माझ्यावरचे ऋण फिटू शकत नाही. तसेच श्री हसन साहेब, श्री त्रिवेदी साहेब, बॉम्बे टेलिफोन्स/MTNL मधील ज्यांच्या ज्यांच्या सोबत काम करण्याचा योग आला ते सर्व अधिकारी, सहकारी मित्र मैत्रिणी, इतर स्टाफ व समाज यांचे मन:पूर्वक हार्दिक आभार.

– लेखन : मोहन आरोटे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.