जी सर्वांसाठी जेवण करते, प्रेमाने वाढते मग तिची खुर्ची रिकामी का? हे वाक्य एका जाहिरातीत वाचले आणि क्षणात अनेक विचारांचे काहूर मनात दाटले. हे तर अगदी खरे आहे पण आजपर्यंत कधीही ह्याचा विचार केला नाही. हो ना?
एकत्रित कुटुंब पध्दती असो अथवा विभक्त, गाव असो अथवा शहर हे चित्र तर रोज सगळ्या घरात दिसते. घरातील कार्यक्रम असो, एखादी पंगत असो अथवा आजच्या आधुनिक पद्धतीचे डायनिंग टेबल असो मात्र त्या घरातील तिची खुर्ची नेहमीच रिकामी असते.
प्रत्येक घराची ही कहाणी. प्रथम घरातील जेष्ठ व्यक्ती व मुलं जेवतात मग पुरूष मंडळी आणि शेवटी ती. मात्र तिला त्याचे जराही वाईट वाटत नाही अथवा मनात कोणतीच खंत नसते .सर्व पोटभर जेवल्यावर तिचे पोट भरते. अशी ती अगदी निरागस. आपले कुटुंब हेच तर तिचे विश्व असते.

सर्वांना प्रेमाने वाढण्यात आग्रहाने चार घास जास्त जेवल्यावर ती खूप खुश असते. एखादा पदार्थ मस्त बनवल्यावर सर्व जण अगदी मनापासून जेवतात, ताव मारतात व तिचे कौतुक करतात तेव्हा तर तिच्या भावना ती शब्दातही सांगू शकत नाही. जरी तो पदार्थ तिच्या वाटेला नाही आला, तिचा अंदाज चुकला तरी तिला त्याचे फारसे वाटत नाही. तिचे कुटुंब जेवले म्हणजे झाले तर अशी ती कोणाला समजूही देणार नाही. गोड हसून सर्व निभावते. गुपचूप दूध पिऊन झोपी जाते.
असेही होते ना कधीतरी तेव्हा मात्र ती शांत रहाते. सहनशीलता हा गुण तर तिच्यात जन्मताच असतो. म्हणून तर आज अनेक उपास स्त्री सहज करू शकते. सर्वांना वेळेवर चहा, दूध, नाष्टा, जेवण करून देणे, सर्वांची काळजी घेणे हे तिला मनापासून आवडते. आपले कुटुंब अपल्यावर अवलंबून आहे हे तिला जास्त आवडते.
अशी ती गृहिणी, ती स्त्री, या सामान्य स्त्रीमध्ये असामान्य शक्ती असते. ती दिवसभर न दमता, न थकता कार्यरत असते. तिची लहान सहान कामं कधी दिसत नाही व कोणाला कळतही नाही. आणि ते ती कधीही जाणवूनही देत नाही इतका साधेपणा तिच्या स्वभावात असतो.
पण जर एक दिवस जरी ती नसली की अनेक अडचणी येतात. स्त्रीचे अस्तित्व हे ती नसताना जास्त जाणवतं. म्हणून तर ती नसली की घर खायला उठतं. करमत नाही. एक नोकोशी शांतता वाटते.
तिच असणं किती महत्वाचे आहे ह्याची प्रचिती येते. ती सर्वांच्या आवडीनिवडीचा नेहमी विचार करते. रोज स्वयंपाक करताना देखील एक भाजी आपल्या पतीला आवडणारी तर एक भाजी मुलांना आवडणारी असते. कोणीही रुसू नये, उपाशी राहू नये हाच तिचा एकमेव प्रामाणिक हेतू असतो.
काही पदार्थ तर गरमच असावे लागतात. जसे की भजी, वडे, पुरी, पराठे, थालीपीठ, डोसा, पुरण पोळी इ. ह्या विशिष्ट पदार्थांची चव तर गरमच चांगली लागते. त्यामुळे ती सर्वांना वाढून मग जेवायला बसते. आजही काही घरात अगदी रोज गरम तव्यावरील पोळीच लागते
हे ती न कंटाळता रोज करते.
‘अतिथी देवो भव’ ही म्हण बहुदा त्या महिलेकडे बघूनच सुचली असेल. त्यामुळे आपल्या घरात आलेल्या पाहुणे मंडळींना, नातेवाईकांना ती जेवल्याशिवाय कधीही पाठवत नाही. कारण हीच तर आपली परंपरा आहे जी अजूनही ह्या स्त्रीने जपली आहे. तिच्या हाताचे काही विशिष्ट पदार्थ खाण्यासाठी तर आवर्जून आग्रह केला जातो व ती ही प्रेमाने आवडीने करते व खाऊ घालते.
अशी ही स्त्री सर्वांना जोडून ठेवणारी आपले नाती जपणारी. म्हणूनच तर म्हणतात ना प्रेमाचा मार्ग हा पोटातून जातो. त्यामुळेच तर ती सर्वांची लाडकी असते. ती सर्वांचे मन जपते. घरातील सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे कुटुंबाचे आरोग्य. हे ती सहज पार पाडते. सकस, स्वच्छ व पौष्टीक पदार्थ जुन्या व नवीन ह्याचा समतोल साधून सर्वांना खुश ठेवते.
घरातील जेष्ठ व्यक्तींना आवडणारे काही विशिष्ठ पदार्थ तसेच आजच्या आधुनिक मुलांना ही भावणारे ह्याचा जणू ती सुवर्णमध्य साधते. त्यामुळे दोघे ही खुश व ती ही. अशी ती नवीन शिकते व जुनेदेखील सांभाळते. हे केवळ स्त्रीलाच जमू शकते. जेव्हा ती सर्वांना वाढते, काय हवंय नको पहाते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर चे भाव असतात, त्याचे निरीक्षण करा.ती अतिशय प्रसन्न व हसतमुख असते.
अनादी स्त्री हीच तर सुखी संसाराचे रहस्य आहे. तिच्यामुळे घराला खऱ्या अर्थाने घरपण असते व ज्या घरात ह्या अन्नपूर्णेचा मान राखला जातो, तिचा आदर केला जातो ते घर नेहमी आनंदी असते. ती घराचा आधारस्तंभ आहे. प्रत्येक घरातील स्त्रीचे योगदान फार मोठे आहे. अशा समस्त अन्नपूर्णे ला मनाचा मुजरा.
-लेखन : रश्मी हेडे.
-संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
