यापूर्वीच्या भागात आपण एकोणविसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील एशियाटिक फ्लू किंवा रशियन फ्लू हा जीवघेणा विषमज्वर तसेच बुबॉनिक प्लेगचा प्रादुर्भाव आणि त्यामागील शास्त्रीय कारणांचा अभ्यास केला.
दोस्तांनो, पहिले महायुध्द काहीसे ओसरत असतानाच म्हणजेच १९१८ साली ज्या महामारीने विश्वाला हेलावून सोडले होते ती म्हणजे स्पॅनिश फ्लू. या रोगाला नाव जरी स्पॅनिश फ्लू दिले गेले असले तरी त्याची व्युत्पत्ती किंवा संसर्ग स्पेनमधे झालेला होता असे नाही, तर त्यामागे काही राजकीय कारणे आहेत.
इतर राष्ट्र जी युध्दात सक्रिय होती त्यांनी या महामारीस लपविण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. मात्र महायुद्धात स्पेनची भूमिका तटस्थ होती आणि त्यामुळेच स्पेन महायुध्द, त्याचे परिणाम आणि युद्धातून उदयास आलेली महामारी या संदर्भातील बातम्या प्रसार माध्यमांद्वारे कोणत्याही दबावाविना प्रसारित करू लागले. परिणास्वरूप सुरवातीस हा फ्लू स्पेन मधूनच आला असावा असा वाचकांचा समज झाला आणि अशाप्रकारे या भयानक रोगास स्पॅनिश फ्लू असे नाव पडले.
स्पॅनिश फ्लूला अनेकदा ‘मदर ऑफ ऑल पँडेमिक्स’ म्हणजे सगळ्यात मोठा साथीचा रोग असं म्हटलं जातं. स्पॅनिश फ्लूमुळे जगभरातील जवळपास पन्नास करोड लोकसंख्या म्हणजेच जवळपास विश्वाच्या लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकसंख्या या रोगामुळे ग्रस्त झाली होती.
अभ्यासक असेही सांगतात की फक्त दोन वर्षांच्या काळात (१९१८-१९२०) २ ते ५ कोटी लोकांचा मृत्यू झाला होता तो याच आजाराने ज्यात सहा ते सात लाख अमेरिकन जनसंख्येचा समावेश होता. या रोगाचा सर्वप्रथम प्रादुर्भाव आढळून आला तो १९१८ साली युरोप, संयुक्त राष्ट्रसंघ आणि आशिया खंडातील काही देशांमधे, जो हळूहळू पूर्ण जगभर पसरला होता.
या जीवघेण्या संसर्गाचा नायनाट करणारी प्रभावी औषधे अथवा लस त्याकाळी उपलब्ध नव्हती. अगदी श्रीमंत देशांमध्येही ‘पब्लिक सॅनिटेशन’ ही चैनीची गोष्ट होती.
विज्ञान लेखिका आणि ‘पेल रायडर : द स्पॅनिश फ्लू ऑफ 1918 अँड हाऊ इट चेंज्ड द वर्ल्ड’च्या लेखिका लॉरा स्पिनी सांगतात, “औद्योगिक देशांमध्ये बहुतेक डॉक्टर्स एकतर स्वतःसाठी काम करत किंवा मग त्यांना चॅरिटी वा धार्मिक संस्थानांकडून पैसा मिळत असे. बहुतेक लोकांना उपचार घेणं परवडत नसे.”
राष्ट्रांनी युध्दातून स्वतःला सिद्ध तर केले होते, पण मानवी जीवन समृद्ध करणारी औषधे मात्र कोणतेही राष्ट्र तात्काळ उपलब्ध करू शकले नव्हते. त्या तुलनेत हळूहळू का होईना पण आरोग्य क्षेत्रात अभ्यासकांनी आज बरीच प्रगती केलेली आढळते. त्याकाळी देखील नागरिकांना मुखपट्टी वापरणे बंधनकारक होते. शाळा, महाविद्यालये, नाटयगृह आणि औद्योगिक केंद्र रोगाचा प्रभाव ओसरेस्तोवर पूर्णतः बंद ठेवण्यात आलेली होती. शवांवर योग्य अत्यंसंस्कार करणे तर शक्य नव्हतेच परंतु शवांच्या ढिगाचा बंदोबस्त करणे प्रशासनाच्या आवाक्यात राहिलेले नव्हते.
संशोधक असेही सांगतात की, पहिल्या महायुद्धादरम्यान झालेली सैन्याची हेळसांड, खाणपाण, रहाणीमान याबाबतीत झालेले दुर्लक्ष आणि रोग लपविण्याचा त्या त्या राष्ट्रांकडून झालेला प्रयत्न यातून ह्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत गेला होता आणि पुढे समस्त विश्वाला तो जीवघेणा ठरला होता.
स्पॅनिश फ्लू या महामारीचा भारतावर देखील दूरगामी परिणाम झालेला होता. भारतामध्ये तेव्हाच्या लोकसंख्येच्या ५.२ % म्हणजेच सुमारे १.७ कोटी लोकांचा बळी गेला. ‘पँडेमिक १९१८’ या पुस्तकाच्या लेखिका कॅथरीन आर्नल्ड सांगतात, “पहिलं महायुद्ध आणि स्पॅनिश फ्लूमुळे आर्थिक संकट निर्माण झालं होतं. अनेक देशांमध्ये घराची जबाबदारी पेलणारा, शेती करणारा, व्यापार करणारा कोणी तरूणच उरला नव्हता. लाखो तरूण मारले गेले होते.”
सुप्रसिद्ध इतिहासकार सिडनी जे. हॅरिस म्हणतात, “इतिहासाची पुनरावृत्ती होत असते आणि तिच्या दूरगामी भयावह परिणामांची प्रचिती येईस्तोवर फार मोठे नुकसान झालेले असते!” ही घातक पुनरावृत्तीच आज
मानवी जीवनाला महागडी ठरली आहे. असे असले तरीही ज्याअर्थी त्या महामारीतून विश्व नव्याने उभे राहिले होते तसेच आजच्या काळोखातून उद्याचा उषःकाल आहे हे मात्र निश्चित.
पुढल्या भागात मानवी इतिहासातील अशाच एका महामारीवर आणि तत्सम संशोधनावर चर्चा करु.
तोवर मात्र स्वतःची आणि आप्तांची काळजी घ्या

– लेखन : तृप्ती काळे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.