Sunday, September 14, 2025
Homeसाहित्यकुटुंब रंगलंय काव्यात ( ४० )

कुटुंब रंगलंय काव्यात ( ४० )

‘सिरोंचा’ चंद्रपूर जिल्ह्यातील (आजचा गडचिरोली) शेवटचे गाव ! निसर्गाने दोन्ही हातांनी भरभरून दिलेल्या सौंदर्याने नटलेले गाव ! श्री. शेख साहेब तिथल्या पोलिस स्टेशनचे मुख्य पोलिस अधिकारी होते. त्यांच्या बरोबर अहेरी पोलिस स्टेशनच्या विनोद पडोळे साहेबांनी माझा परिचय करून दिला आणि मी शेख साहेबांच्या बरोबर सिरोंचा गावात पोहोचलो.

तेथील आदिवासी आश्रमशाळांमध्ये ‘ओंकार काव्य दर्शन’ शालेय कार्यक्रम सादर करायचे होते, अर्थात विनामूल्यच ! तेथील एका आश्रमशाळेत शेख साहेब मला घेऊन गेले, आणि तेथील मुख्याध्यापकांशी त्यांनी माझा परिचय करून दिला, “सर, हे माझे मित्र प्रा.विसुभाऊ बापट! इथल्या तीनही आदिवासी आश्रमशाळेत त्यांचा शालेय कार्यक्रम त्यांना सादर करायचा आहे. त्याचे सर्व नियोजन आज तुम्ही करायचे. रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था मी शासकीय रेस्ट हाऊसवर करतोय. उद्या रेस्ट हाऊस जवळचा त्रिवेणी संगम व आपला निसर्गरम्य सिरोंचा त्यांना दाखवून तुम्ही विसुभाऊंना उद्या अहेरीला पाठवायचे. ही जबाबदारी तुम्ही पार पाडावी.!” असे सांगून, मला मुख्याध्यापकांकडे सुपूर्त करून आणि ‘विसुभाऊ, उद्या आपण अहेरीत भेटूया !’ असे मला सांगून शेख साहेब आपल्या कामाला निघून गेले.

शेख साहेबांच्या सांगितल्या प्रमाणे त्या मुख्याध्यापकांनी सर्व आयोजन फारच छान केले. सिरोंचा परिसरातील तीनही आदिवासी आश्रमशाळांमधील माझ्या शालेय कार्यक्रमांचे आयोजन त्या सरांनी अप्रतीमच केले. “विसुभाऊ, हे असे चांगले कार्यक्रम आमच्या आदिवासी मुलांना ऐकायलाच मिळत नाहीत. पण तुमच्यामुळे आम्हाला तुमचा चांगला व उपयुक्त कार्यक्रम अनुभवायला मिळाला, आमची आदिवासी विद्यार्थी आमचे सर्व शिक्षक एकदम खूश झाले, तुम्हाला धन्यवाद !” अशा शब्दांत त्या मुख्याध्यापक सरांनी माझे आभार मानले. रात्रीचे जेवण त्यांच्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांबरोबर घेऊन सर व त्यांचे दोन सहकारी अध्यापक मला रेस्ट हाऊसवर सोडायला आले. ‘विसुभाऊ, तुम्हाला त्रिवेणी संगम दाखविण्यासाठी उद्या सकाळी आठ पर्यंत आम्ही सायकली घेऊन येतो, तुम्ही तयार राहा !’ असे सांगून सर्वजण निघून गेले.

ते शासकीय रेस्ट हाऊस मला भूत बंगल्या सारखेच वाटत होते. बरं तिथं मी एकटाच मुक्कामाला होतो, मनातून धास्तावलोही होतो. त्यामुळे बराचवेळ झोप लागली नाही, कधी एकदा उजाडते, असा विचार करीत खूप उशीरा थोडा डोळा लागला. सकाळी सर्व शिक्षक वेळेवर आले आणि आम्ही पाच एक कि.मी. सायकलींग करून वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर पोहोचलो. नदीचे पाण्याचे पात्र किनाऱ्यापासून बरेच लांब वाळूचे होते. वाळूत चालायची संवय नसल्याने पात्रात पोहोचलो तेंव्हा मी तर एकदम थकलो होतो. पण संगमावर आंघोळ केल्यावर एकदम फ्रेश झालो. तो संगम वैनगंगा, प्राणहिता या दोन दिसणाऱ्या नद्या व सरस्वती ही गुप्त नदी असा त्रिवेणी संगम होता. महाराष्ट्र राज्य, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेश या तीन राज्यांच्या सीमा त्या संगमावर आहेत. पैकी आंध्रच्या किनाऱ्यावरील ‘काळेश्वराच्या’ दर्शनासाठी आम्ही मंदिरात गेलो.

मंदिरात दोन पिंडी आहेत, त्यांची पूजा चालली होती. चौकशी केल्यावर तिथल्या गुरुजींनी माहिती दिली, “एक दिवस यमराजांनी शंकराला विचारले, पृथ्वीवरील ज्यामानवाचे दिवस भरले त्यांना मला आणायला सागता. मी त्यांना घेऊन येतो व त्याचा मृत्यू होतो.
असै असताना फक्त आपलीच पूजा केली जाते, तशी आमची पूजा सुद्धा झाली पाहिजे. शंकर तथास्तु म्हणाले. यातील एक पिंडी शंकराची व दुसरी काळ्या कातळाची पिंडी यमराजाची आहे. या यमाच्या‌ पिंडीवर मोठे भोक आहे. तिथले अभिषेकाचे पाणी सरस्वती नदीच्या रूपाने सरळ प्राणहिता व वैनगंगा नद्यांच्या संगमात जाते, आणि म्हणूनच हा त्रिवेणी संगम मानला जातो.” त्यानंतर मी त्या दोन्ही पिंडीवर अभिषेक केला, शोडशोपचारे पूजा केली, आणि मला प्रचंड मानसिक समाधान मिळाले. त्यानंतर सिरोंचाला परतलो आणि सर्व शिक्षकांचा निरोप घेऊन मी‌ अहेरीला पोहोचलो.

प्रा विसूभाऊ बापट

– लेखन : प्रा. विसुभाऊ बापट. मुंबई.
(सादरकर्ते – कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
Prashant Thorat GURUKRUPA on असे ही होऊ शकते !
CHANDRASHEKHAR PRABHAKAR KASAR on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
यश चंद्रकांत करकरे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा