नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत. संगीत दिग्दर्शक आणि एक उत्तम कवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या यशवंत देवांनी सदाबहार संगीताने नटलेली जेवढी म्हणून गाणी रसिकांना दिली, तशीच स्वतः लिहिलेली “कामापुरता मामा, ताकापुरती आजी”, कोटि कोटि रूपे तुझी”, “जीवनात ही घडी अशीच राहू दे”, “तू नजरेने हो म्हटले मग वाचेने वदणार कधी, “प्रिया आज माझी नसे साथ द्याया” अशी छान छान गाणी देखील दिली आहेत. आज पाहू या यशवंत देव यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं एक अतिशय गाजलेलं गाणं ज्याचे शब्द आहेत –
“अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात
कुणी एकत्र नांदती कुणी दूर दहा हात”
आपण जरी कितीही”हम सब भाई भाई” असा नारा दिला तरी या समाजातील विविध तऱ्हेची विषमता कधी डोकं वर काढेल ते सांगता येत नाही. यशवंत देवांच्या कवीमनाला हीच विषमता अस्वस्थ करते आहे आणि मनाच्या या अवस्थेतच त्यांनी परमेश्वराला हा प्रश्न विचारला असावा कारण “आम्ही सारी देवाची लेकरं” आहोत अशी शिकवण बालपणापासून जर प्रत्येकाला मिळते तर मग मोठं झाल्यावर अशी काय जादू होते कि हीच देवाची लेकरं आपापसात मारामारी करतात, भांडणाचं पर्यावसान कधी कधी एकमेकांचा खून करण्यापर्यंत मजल गाठतं. काही ठिकाणी असं दृश्य दिसतं कि दोन मित्र हे सख्ख्या भावाप्रमाणे एकमेकांवर प्रेम करतात तर कधीकधी असंही दिसतं कि जमिनीच्या वादातून अथवा संपत्तीच्या वाटणी वरून भाऊ भाऊ किंवा बहिण भाऊ एकमेकांचे हाडवैरी बनतात. म्हणूनच यशवंत देव यांनी परमेश्वरालाच प्रश्न विचारला आहे कि बाबा रे, एरवी स्वतःला तुझी लेकरं म्हणवणारी ही माणसं आपापसात का बरं भांडतात ?
जातपात पाहुनीया सारा व्यापार ठरतो
मोठेपणा माणसाला का रे जन्मासवे येतो ?
कुणी लोळे वैभवात, कुणी लोळतो चिंतेत
आजचं समाजात दिसणारं चित्र फार विदारक आहे.
रोटी बेटीचा व्यवहार असो, नोकरीचा प्रश्न असो किंवा प्रेमविवाह जरी कुणा प्रेमिकांनी ठरवला तरीही “आपल्या जातीची मिळाली नाही का ?” किंवा “आपल्या समाजातील मुलगा/मुलगी दिसली नाही वाटतं” असं खोचकपणे अजूनही काही ठिकाणी विचारलं जातं. कारण जातीच्या प्रश्नापुढे मोठेपणा हा जन्मजात येत नाही तर तो आपल्या कर्तृत्वाने माणसानं मिळवायचा असतो हा प्रश्न अशा वेळेस गौण ठरतो. परमेश्वरा, माणूस नावाचा प्राणी जर तू निर्माण करतोस तर काही माणसं काहीही न करता वैभवात राहून सर्व सुखोपभोग घेत असतात आणि प्रयत्न करूनही, अविश्रांत श्रम करून देखील काही जणांना दोन वेळच्या पोटाची सोय कशी करायची, उद्याची तजवीज कशी करायची याची चिंता भेडसावत असते….असा भेदभाव का ?
नाथाघरचे भोजन सारा गाव पंगतीला
दूधभात सर्वामुखी आग्रहाने भरविला
थोर संतांच्या या कथा आम्हा साऱ्यांच्या मुखात
एकनाथ महाराजांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं कि अन्न दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि तिथे जातपात पहायची नसते. शिवाय भुकेला माणूस जर आपण जेवायला बसल्यावर दारात येऊन उभा राहिला तर “अतिथी देवो भव” हे ब्रीद वाक्य स्मरून आपल्या ताटातला घास प्रथम त्याला द्यावा आणि एकनाथ महाराजांनी गावजेवण देताना कधीच जात पाहिली नाही. त्यांनी फक्त “प्रत्येकाच्या ह्रदयात परमेश्वर वास करत असतो” हा विचार कृतीत आणला आणि गावातील प्रत्येक माणसाला आपल्या घरी जेवण देण्याची व्यवस्था केली. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ महाराज या सर्वांच्या कथा तोंडपाठ असल्या तरी त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालणं मात्र कठीण जातं.
जरी पंढरीचा राणा विठू महार जाहला
गावाबाहेर टाकले आम्ही आमुच्या भावाला
भूतदयेचे अभंग आळवितो देऊळात
जात, उपजात, मी श्रेष्ठ, तू कनिष्ठ अशा वेगवेगळ्या चक्रामध्ये आम्ही पहिल्यापासूनच इतके गुरफटत गेलो की “सारे भारतीय माझे बांधव आहेत” हे पाठ्यपुस्तकातलं वाक्य पुस्तकातच राहिलं आणि प्रत्यक्ष पंढरपूरच्या विठ्ठलाने विठू महाराचं रूप घेऊन तो आमच्या बरोबर वावरला पण तो खरोखरच महार आहे असं समजून त्याच्या स्पर्शाने आपल्याला विटाळ व्हायला नको म्हणून आम्ही प्रत्यक्ष परमेश्वराला गावकुसाबाहेर हाकललं. भूतदया, माणूसकी या गोष्टींचे गोडवे अजूनही आचरणात न आणता फक्त देवळातून गाईले जातात, ते प्रत्यक्षात आचरणात आणले जात नाहीत हीच तर समाजाची खरी शोकांतिका आहे.
आता वागण्याची तऱ्हा जरा निराळी करावी
अभंगाची एक तरी ओवी अनुभवा यावी
वर्णभेद ज्याच्या मनी तोचि मलीन, पतित
इतकी वर्षं आम्ही आपापसात काही ना काही कारणांवरून एकमेकांना पाण्यात पहातो आहोत, कधी भाऊबंदकी आमच्यापेक्षा श्रेष्ठ ठरते तर कधी जातीचा वृथा अभिमान आम्हाला समोरासमोर उभं करून आमच्यामध्ये तेढ निर्माण करतो कधी आमच्या आत कुठेतरी दडून बसलेल्या दुष्ट प्रवृत्ती डोकं वर काढतात. वर्षानुवर्षे चालत आलेला हा पायंडा आता आपणच मोडीत काढायला हवा. संतांनी अभंगांमधून जी शिकवण दिली आणि ओव्यांमधून जे तत्वज्ञान सांगितलं ते आता थोड्याफार प्रमाणात तरी जाणीवपूर्वक अनुभवायला हवं. इथून पुढे असा नियम, असा दंडक आपण घालून घेऊ या कि जो कोणी वर्णभेद आणि जातीभेद यांचं अवडंबर माजवेल तोच या नव्या जमान्यात समाजाकडून बहिष्कृत केला जाईल, पापी समजला जाईल. तरच संतांनी आपल्याला दिलेली शिकवण खऱ्या अर्थाने अंगिकारली जाईल आणि या पृथ्वीतलावर नंदनवन अवतरेल.
यशवंत देव यांच्याच संगीत दिग्दर्शनाखाली जीवनाकडे बघण्याचा डोळस दृष्टीकोन देणारं हे अर्थपूर्ण गाणं सुधीर फडके यांनी आपल्या धीरगंभीर आवाजातून आपल्यापर्यंत पोचवलं आहे.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
यशवंत देवाने सांगितलेल्या अनेक सुरेल गाण्यांपैकी माझं हे एक आवडतं गीत. सुधीर फडके यांच्या आवाजात हे गीत पूर्वी सकाळच्या मंगल प्रभात या कार्यक्रमात नेहमी लागत असे. अलीकडच्या काळात आकाशवाणीवर अशी एक से एक सुंदर गाणी ऐकणं दुर्मिळ झाला आहे. रसग्रहणासाठी आपण या गाण्याची केलेले निवड योग्यच आहे. रसग्रहण करताना प्रत्येक कडव्याचा अर्थ आपण सुरेख रीतीने विशद केला आहे. ओठावरले गाणे या सदरात आजपर्यंत आपण निवड केलेली सर्वच गाणी उत्कृष्ट आहेत. त्याचबरोबर आपले रसग्रहणही वाचनीय असेच असते. हे सदर चालू करून श्रीयुत भुजबळ यांचे व आपले आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत.
धन्यवाद विराग 🙏
खूप सुंदर रसग्रहण👌👌👌
फारच सुंदर रसग्रहण.