Sunday, December 22, 2024

माय

काय सांगू माय माझी
आज ओटिवरी नाही
पान कुटण्याचा तो नाद
आज कानावर नाही

गाय वासरू पाजेना
बैल चारा तो खाईंना
गोजीरवाणे रुप तुझे
डोळ्या पुढून जाईना

भरलेले घर माझे
आज सूनेसूने वाटे
आठवाने आज तुझ्या
उरी महापुर दाटे

भरलेले घर माझे
आज वाटते उदास
चुलीवरच्या भाकरीचा
मज होतो आहे भास

थंड पडलेल्या जात्याला
येतो डांगराचा वास
शेतामंदि राबलेले
तुझे कष्टकरी हात
पाठीवरुन फिरताना
करीत मायेची बरसात

तुझा करारी तो बाणा
व्हता गावात दरारा
येताजाता साद देती
वाटेच्या त्या वाटेला

आंगण तुझे फुललेले
नातवंडांचा किलबिलाट
सुट्टी मध्ये येतो म्हणती
आई बघशील ना तु वाट?

गेली मायेची सावली
उभे आम्ही निंबरात
याद तुझी सदा राहील
आमुच्या या ह्रुदयात.

– रचना : स्मिता लोखंडे.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. आज पर्यंत आई वडील भाऊ बहीण इत्यादी नात्याला कवितेनं गुंफणारे अनेक झाले किंबहुना असतात परंतु आपल्या सासूबाई न वर कविता करणारी एखादीच गुणी सुनबाई असते या कवितेचे कवयित्री स्मिता लोखंडे यांनी अतिशय सोप्या शब्दात त्यांचं सासुशी असणार नात व्यक्त केलं आहे अभिनंदन स्मिता आणि अभिनंदन प्रसिद्धी देणाऱ्या Mr&Mrs भुजबळ यांना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on अंदमानची सफर : ९
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” १७