कौतुक हा केवळ तीन अक्षरी शब्द असला तरी त्यात दहा हत्तीचे बळ असते.
कौतुक म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या कार्याची दखल घेऊन त्याबद्दल त्याची प्रशंसा करणे, त्याला प्रोत्साहन देणे, प्रेरणा देणे त्यामुळे त्याच्यातील अत्मविश्वास वाढतो व तो करत असलेले काम अजून चांगल्या पद्धतीने करतो व सर्वस्व पणाला लावून यशस्वी होतो.
बरं, कौतुक करणे ही तर किती सोपी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या हातात आहे. ह्याला काही पैसे पडत नाही. फारसे कष्ट करावे लागत नाही अथवा फार वेळही द्यावा लागत नाही. तरी सुद्धा हा अतिशय दुर्लभ गुण आहे जो फारसा पहायला मिळत नाही.
हो मात्र हे त्यांनाच शक्य आहे, जे अतिशय दिलदार असतात व ज्यांचे दिलखुलास व्यक्तिमत्त्व असते. कौतुक करणे हा गुण माणसातील स्वभावाचे दर्शन घडवतो. तो म्हणजे स्वभावातील चांगुलपणा व मोठेपणा.
दुसऱ्याचे कौतुक करायला फार मोठे मन असावे लागते. काही व्यक्तींना हे अगदी सहज जमते.
तुम्ही केलेल्या प्रशंसेमुळे त्या व्यक्तीला एक सकारात्मक ऊर्जा मिळते ज्यामुळे अशक्य गोष्टी देखील शक्य करण्याचे सामर्थ्य मिळते.
आज अनेक लोक उल्लेखनीय कामगिरी करतात व स्वतःचा ठसा उमटवतात. हे शक्य होते केवळ तुमच्या कौतुकामुळे. तुम्ही वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे. म्हणजे तुम्हीच पहा किती अफाट ताकद आहे तुम्ही केलेल्या कौतुकामध्ये. ती जणू एक जादूची कांडी आहे जी माणसातील आत्मविश्वास जागृत करू शकते व यशाच्या शिखरावर आपले नाव उमटवू शकते. ज्यामुळे केवळ त्याच व्यक्तीचे नव्हे तर त्याच्या गावचे व देशाचे नाव उंचावते. ही अतिशय गर्वाची व अभिमानाची गोष्ट आहे.
त्या व्यक्तीने दाखवलेल्या धाडसामुळे त्याच्या गावचे नाव इतिहासात कोरले जाते व सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाते. एवढे सर्व माहीत असून सुद्धा अनेक व्यक्ती दुसऱ्याचे कौतुक करताना फार कंजूसपणा करतात.
असे म्हणतात ना की दुसऱ्याबद्दल चांगल्या गुणांचा उल्लेख मोठयाने करावा मात्र वाईट गुणांचा उल्लेख नेहमी हळू आवाजात करावा कारण कोणीही सर्व गुण संपन्न नसतो. अगदी लहान मुलांपासून ते मोठया पर्यंत कौतुकाची थाप खूप महत्त्वाची असते.
कौतुकाची अपेक्षा आपल्या जवळच्या नातेवाईकांकडून व घरातून जास्त असते. मात्र,अपेक्षा भंग होऊन अपरिचित व्यक्ती व आपले मित्र मैत्रिणी अगदी सहज कौतुक करतात. हीच कौतुकाची थाप आशेची नवीन ज्योत निर्माण करते. तू हे करू शकतो, तुला हे नक्की जमणार, तू करून दाखवले, तुझ्या कार्याला सलाम असे शब्द तुम्हाला नवनवीन गोष्टी करायला प्रेरित करतात व संजीवनी सारखे काम करतात.
ती व्यक्ती पहिल्या पेक्षा अधिक जिद्दीने, चिकाटीने व प्रामाणिकपणे आपले काम करते. जेव्हा आपण एखादया मुलाला म्हणतो तू खूप छान खेळतो, गातो, चित्र काढतो, नाचतो इ. म्हणजे त्याच्यातील कलेला प्रोत्साहन देतो. अथवा एखादे मुलं अभ्यासात खुप हुशार आहे, तू उद्या नक्की मोठा अधिकारी होणार असे शब्द कानावर पडताच त्याच्यातील आत्मविश्वास दुपटीने वाढतो. हे केवळ तुम्ही केलेल्या कौतुकामुळे शक्य होते. कारण मुलं अतिशय निरागस असतात व लगेच खुश होतात.
केवळ लहानांनाच नव्हे तर मोठया ना देखील हा नैतिक पाठींबा खूप महत्वाचा असतो. तो दिसत नसतील तरी जाणवतो. त्यामुळे कितीही संकट आली तरी ती व्यक्ती खचत नाही तर अधिक जोमाने व जिद्दीने आपले स्वप्न पूर्ण करते.
असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात असतो. लहानपणी आई त्याला शिस्त लावते स्वावलंबी बनवते व पुढे बायको त्याला साथ देते. घरातील जबाबदारी निभावते. त्यामुळे तो त्याचे स्वप्न साकारू शकतो. हे शक्य होते कारण त्या महिलेने घरातील एक बाजू भक्कमपणे संभाळलेली असते. केवळ त्यामुळे तो आपल्या कामात पूर्ण लक्ष केंद्रित करू शकतो.
ती अर्धांगिनी वेळोवेळी त्याला साथ देते, प्रोत्साहन देते, त्याच्या कामाचे कौतुक करते व आम्हा सर्वांना तुझा अभिमान आहे असे आवर्जून सांगते. चांगल्या वाईट वेळेत त्याच्या कायम सोबत असते आर्थिक संकट आले तर स्वतःच्या बचतीचे पैसे अथवा स्त्री धन म्हणजे तिचे दागदागिने देखील मोडू शकते.
ही वेळेला मिळालेली साथ त्याला अत्यंत महत्वाची असते कारण वाईट दिवस देखील निघून जातात मात्र ते क्षण कायम स्मरणात असतात. आज स्त्रिया देखील अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत ती कोठेही कमी नाही हे तिने सिद्ध केले आहे. मात्र…..हे तेव्हाच शक्य होते जेव्हा तिला तिच्या पतीचे व संपूर्ण कुटुंबाची साथ मिळते.
ती तिच्या कुटुंबाची जबाबदारी चोख निभावून स्वतःचे काम ही करू शकते. तो समतोल ती राखू शकते जेव्हा तिच्याही कामाची दखल घेऊन तिचे मनापासून कौतुक केले जाते. फक्त चूल व मुल ह्याही पलीकडे तिने स्वतःचे एक वेगळे विश्व निर्माण केले आहे. दहा अंगांनी काम करणारी ती स्त्री तिचे कणखर व्यक्तिमत्व व धाडसी वृत्ती मुळे ती यशाचे गोड फळ चाखू शकते व ती आत्मनिर्भर होऊन स्वतःचे वेगळे अस्तिव निर्माण करू शकते.
प्रत्येकाची संघर्षमय कहाणी वेगळी असली तरी तुमच्या कौतुकाच्या शब्दात अफाट अदृश्य शक्ती आहे जी लढण्याचे व जिंकण्याचे बळ देते. त्यामुळे अगदी मनापासून एखाद्याच्या कलेचे अथवा केलेल्या कार्याचे कौतुक जरूर करावे ज्यामुळे त्या व्यक्तीच्या यशात तुमचा देखील खारीचा वाटा असेल, व ती व्यक्ती आजन्म तुम्हाला विसरू शकणार नाही.
कलाकाराला तुमचे प्रेरणादायी शब्द, त्या टाळ्या लाखमोलाच्या असतात. आज अनेक लहान मोठी मंडळे, सामाजिक संस्था बक्षिस समारंभाचे आयोजन करतात. प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातात. त्यामागे प्रोत्साहन देणे, मनापासून कौतुक करणे हाच हेतू असतो. त्या व्यक्तीला प्राप्त झालेले पारितोषिक म्हणजे त्याच्या अफाट कष्टांची जणू पोच पावती असते जी त्याला उंच भरारी घेण्याचे बळ देते.
मान सन्मान, गौरव पुरस्कार यांचे महत्व तर आहेच पण त्यातून मिळणाऱ्या प्रोत्साहन व प्रेरणेचे अधिक महत्व आहे. कारण पुरस्कार प्रेरणा देतात व गुणवंतांची कदर होते. कला गुणांचा आदर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पुरस्कार म्हणजे आंतरिक कला गुणांना प्रेरणा देऊन सर्वांची प्रगती साधने हाच आहे. म्हणूनच कुणी केलेल्या चांगल्या कामाचे नेहमी, दिलखुलासपणे कौतुक करा.
– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
