तीळ-गुळ (मकर संक्रांत विशेष)
मागच्या लेखात आपण पाहिले की शीत आणि रुक्ष गुणांनी वात वाढतो आणि त्याच्या जोडीला येतो तो म्हणजे शिशिर ऋतु ज्यात रुक्षता अधिक प्रमाणात वाढते. आणि म्हणूनच ह्या ऋतुकाळात अधिक स्निग्ध आणि मधुर पदार्थांचे सेवन सांगितले आहे. त्याच अनुषंगाने ह्या ऋतूत येते ती मकरसंक्रांती.
मकरसंक्रांती ते रथसप्तमी हा काळ शिशिर ऋतुत येतो. ह्याच काळात आपण तिळगुळाचे लाडू, गुळपोळी, वांग्याचे भरीत, भोगीची भाजी असे पदार्थ खातो ज्यामध्ये अधिक स्निग्धता असते मधुर रस अधिक असतो.
ह्या काळात आपण काळे कपडे देखील घालतो. सूर्याची किरणे कमी तीव्र असल्यामुळे त्याची ऊब जास्त खेचली जाऊन ती टिकून राहावी हेच ह्या मागचं शास्त्र.
तीळ ह्या शब्दतूनच तेल ह्या शब्दाची निर्मिती झाली आहे. ह्यावरून तुम्ही तिळाच्या स्निग्धतेचा विचार करू शकता.
आज ह्याच तीळ आणि गुळाबद्दल थोडी माहिती पाहूया.
– भारतात सर्वत्र तिळाची शेती होते. काळे आणि पांढरे असे तिळाचे दोन प्रकार पडतात ज्यात काळे तीळ हे अधिक औषधी गुणधर्म युक्त असतात.
– तिळात ४३ ते ५६ टक्के एवढे फॅट चे प्रमाण असते. आयुर्वेदानुसार तीळ मधुर प्रधान रस व तुरट, कडू अश्या अनुरसाचे असतात आणि त्यात उष्ण, गुरु, स्निग्ध हे गुण असतात.
– ते वात दोषाचे शमन करतात आणि अधिक सेवन केल्यास कफ आणि पित्त दोष वाढवतात.
– वात कमी करत असल्याने अंगाला मालिश करण्यासाठी ह्याच्या (कोमट) तेलाचा उपयोग होतो. दातांच्या दुर्बलतेवर देखील तीळ चावून खाणे अथवा तिळाच्या कोमट तेलाने गुळण्या हा हि एक उपाय आहे.
– अर्श रोगात, प्रमेह रोगात मूत्र प्रवृत्ती कमी करण्यासाठी, स्त्री रोगांमध्ये देखील तिळाचे महत्व आहे.
– केसांच्या पोषणामध्ये सुद्धा काळे तीळ अत्यंत महत्त्वाचे आहेत.
गुळ –
– आयुर्वेदाला साखर आणि गुळ ह्या दोन्ही गोष्टी ठाऊक आहेत आणि दोघांचे गुणधर्म देखील. चवीला दोन्ही जरी गोड असले तरी त्यांचे गुणधर्म मात्र वेगळे आहेत. म्हणूनच ह्या काळात तीळ गुळ आवश्यक आहेत ना कि तीळ आणि साखर.
– गुळ हा कफकर आहे. तसेच तो मूत्र प्रवृत्ती करतो आणि मलाला बाहेर टाकण्यास मदत करतो. त्याच्या अधिक सेवनाने पोटात जंत अथवा शरीरात अधिक चिकट पणा तयार होतो.
– पुराण म्हणजे एक वर्ष जुना गुळ हा पथ्यकर सांगितला आहे. त्यामुळे कृमी, कफ वाढणे, भूक मंदावणे हे त्रास होत नाहीत. पण त्याचा अतिरेक करू नये.
ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मगच तीळ गुळ खाण्याची प्रथा अस्तित्वात आली. परंतु आपण ह्याच बरोबर वातावरण आणि आजार ह्या दोघांचाही विचार करणे आवश्यक आहे. ज्या प्रदेशात थंडी आणि कोरडे वातावरण अधिक आहे तेथे तिळगुळ योग्य प्रमाणात सेवन करावे. परंतु जेथे थंडीची कमतरता आहे अशा ठिकाणी अल्प प्रमाणात ह्याचे सेवन करावे. तसेच सतत बसूनच काम करणारे, आहारात सतत स्निग्ध पदार्थ खाणारे, स्थूल मेदस्वी व्यक्ती हे आधीच कफग्रस्थ असतात, अशा व्यक्तीनी देखील ह्याचे सेवन कमी करावे.
रोगी लोकांनी वैद्याच्या सल्ल्याने ह्याचे सेवन करावे.सण हे आनंद आणि आरोग्य देणारे असतात फक्त ते आपल्याला कळले पाहिजेत.माझं बोलणं मी इथेच थांबवतो.
तुम्ही तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.
भेटूया पुढल्या लेखात नवीन विषय घेऊन. तोपर्यंत
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे ।।

– लेखन : प्रा वैद्य शार्दुल चव्हाण
एम.डी. आयुर्वेद. मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800