दिल्लीत प्रथम ग्रासे…
प्रफुल दिल्लीत येऊन सहा महिने झाले होते. आम्ही नागपूरलाच होतो. ते वर्ष, लेकाचं बारावी, म्हणून आम्ही नागपूरला काढायचं असं ठरवलं होतं. त्याचं बारावी झाल्यावर आम्ही दिल्लीला शिफ्ट होणार होतो.
दिवाळीचे चार दिवस सुट्ट्या होत्या. म्हणून प्रफुल म्हणाले,’ चार दिवस तुम्हीच इकडे या. थोडा चेंज होईल आणि तुम्हालाही थोडी आयडिया येईल. पुढे इथेच आपल्याला राहायचं आहे ना.’ आम्हालाही ही गोष्ट पटली आणि दिवाळीचे चार दिवस लेकाच्या क्लासेस ना आणि कॉलेज ला सुट्टी असल्यामुळे, आम्ही चार दिवस, दिल्लीला आलो.
सतत बाहेरचं खाणं खाऊन प्रफुल कंटाळले होते. त्यात दिवाळी पण होती. म्हणून मी म्हटलं, मीच जेवण बनवते. चार दिवस जुजबी स्वयंपाक बनवण्याचे सामान, म्हणजे छोटासा कूकर, एक छोटी कढई, एक तवा, पोळपाट लाटणं, एक दोन पातेली आणली आणि किराणा व तेल आणायला गेलो.
दुकानदाराला तेल मागितलं. “भैया एक धारा पॅक देना”.
नागपूरला तेल म्हटलं की धारा पॅक आणि धारा पॅक म्हटलं की मूंगफली तेल. हे समीकरणच होतं. कारण जनरली आपण मराठी माणसं शेंगदाण्याच्या तेलात स्वयंपाक बनवतो आणि ‘धारा द्या’ म्हटलं दुकानदाराला की, तो बरोबर धारा मूंगफली तेल समोर ठेवतो. पूर्वी आपण घाणीतून ताजं तेल (कोल्ड प्रेस वाला आधुनिक शब्द घेऊन यायाचो). त्याची ऑथेंटीसिटी सांगावीच लागत नव्हती. पण आता ते बंद झाल्यामुळे धारा डबल फिल्टर तेल घ्यायला लागलो. कारण रिफाइंड तेलात एक तर केमिकल्स आणि टेस्टलेस आणि ओडरलेस. त्यामुळे त्याचा काहीच फायदा होत नसल्यामुळे ते तेल वापरत नव्हतो.
व्हेजिटेबल ऑइल, सोयाबीन ऑइल शरीराला चांगले नाही आणि खूप स्ट्रॉंग वास. त्यामुळे त्याचा प्रश्न येत नव्हता. त्यामुळे धारा पॅक मागितल्यावर दिल्लीच्या दुकानदारानी धारा पॅक समोर ठेवलं. मी पण ते चेक न करता सरळ घरी घेऊन आले.
घरी गॅसवर कढई ठेवली. कढईत तेल टाकलं आणि स्ट्रॉंग वास नाकात शिरला. अरे बापरे, हे कुठल तेल दुकानदारांनी आपल्याला दिलं ? मला प्रश्न पडला ? जेव्हा पॅक चेक केला, तेव्हा लक्षात आलं की आपण सरसो तेल आणलं आहे! इथे रोजच्या स्वयंपाकात सरसो तेल वापरलं जातं सर्रासपणे.
पॅकेट फोडलं होतं. त्यामुळे परत करण्याचा प्रश्नच नव्हता. जसं होतं तसं बनवलं आणि कसं बस पोटात ढकलले.
त्या सरसोच्या तेलाचा स्ट्राँग वास खूप दिवस नाकात बसला होता.
पहिला सबक हा की कुठल्याही गोष्टींना गृहीत नाही धरायचं.
आपल्याकडे धारा पॅक म्हणजे शेंगदाण्याचे तेल आणि दिल्लीत धारा पॅक म्हणजे शेंगदाण्याचे सोडून कुठलेही म्हणजे, वेजेटेबल ऑइल, सोयाबीन तेल, सरसो तेल.
अशाप्रकारे नवीन शब्द शिकण्याला सुरुवात झाली.
नंतर सहा महिन्यांनी, म्हणजे प्रफुल शिफ्ट झाले दिल्लीला, त्यांच्या वर्षभराने आम्ही दिल्लीत आलो.
वडील बँकेत सर्विस ला होते. त्यामुळे लग्नाच्या आधी पर्यंत ट्रान्सफर ची सवय होती. पण लग्न झाल्यानंतर अठरा वर्षात नागपूर सोडायची पहिलीच वेळ होती.मात्र महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात फिरायची सवय होती. पण आता पूर्णच अनोळखी राज्यात प्रवेश झाला होता.
दिल्लीला शिफ्ट झाल्यावर किराणा सामान आणायला निघालो. धारा पॅक चा अनुभव पाठीशी होताच. त्यामुळे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वकच करत होतो. एकदा असेच झाले.दुकानात गेल्यावर मी म्हणाले, भैय्या शक्कर देना. त्याने पिठीसाखर समोर ठेवली. मी म्हटलं ‘भैया पिठी शक्कर नही चाहिये. नॉर्मल शक्कर चाहिये’. तो म्हणाला ‘आपको शक्कर चाहिये ना ?’ मी म्हटलं ‘हा’. “तो बरोबर दि है ! इसको शक्कर ही बोलते है.” मग मी विचारलं. ‘चाय मे डालते, वो क्या उसे क्या बोलते है.’ तो म्हणाला “वो तो चिनी है.” मनातल्या मनात डोक्याला हात मारला. साखर इज इक्वल टू चिनी. याची डायरीमध्ये नोंद झाली.
प्रफुल नी सुचवल्याप्रमाणे मी छोटी डायरी बरोबर ठेवायचे. जो शब्द नवीन असायचा, तो लिहायला सुरुवात केली. तो लिहून ठेवायचे. एकूणच माझं हिंदी शब्दसंग्रह वाढवायला सुरुवात झाली. नागपूरला हिंदीत साखरेला शक्कर म्हणतात. आमच्याकडे मराठी शब्द हिंदीतून बोलायचो आणि ती भाषा हिंदी माणसाला कळायची.
म्हणजे भाजीवल्या भैयाला “काकडी कितने की दीं ?” असं विचारलं. त्याला माहिती असायचं. मी काकडीबद्दल विचारते आहे. पण इथे खीरा च म्हणायचं, काकडी नाही समजत.
आपला अडाणी पणा दिसायला नको म्हणून मी त्या वस्तूंना हात लावून विचारायचे “कितने का ?”.
लाल भोपळ्याला सीताफळ आणि सीताफळाला शरिफा म्हणतात. हे मैत्रिणीकडून कळलं.
राजगिरा च्या लाडवाला सिल के लड्डू म्हणतात. पण राजगिरीला सिल नाही म्हणत. राजगिरा लाडू ला सिल के लड्डू म्हणतात. म्हटल्यावर मी लॉजिक लावलं. “भैया सिल देना” ! दुकानदार भैया म्हणतो ” वो क्या होता है?” मीच गोधळून गेले.
एकदा आम्हाला प्रसादाच्या खीरेसाठी चारोळी हवी होती. मी आणि माझी लहान जाऊ, खूप दुकानात फिरलो. पण चारोळी काही आम्हला मिळेना. भैया, छोटी गोल गोल होती है. पण त्या भैया च्या काही पल्ले पडेना आणि आमच्या चारोळी च्या वर्णना नंतर समोर जो पदार्थ दाखवला जाई, त्यावरून आमची हसून् हसून मुरकुंडी वळायची.
मग आम्ही बिग बझार ला गेलो. तिथे फूड बाजार ला माझी जाऊ एका काउंटर वर जाऊन त्या attendent ला म्हणाली “मी जाऊन घेऊ का मला जो पदार्थ हवा आहे तो ?”. त्याने परमिशन दिली आणि चारोळीचं पॅकेट तिने हातात घेऊन त्याला सांगितलं हे हवं आहे. तो म्हणाला “हा तो चिरौंजी बोलो ना”. आम्ही दोघींनी त्याच्यासमोर च डोक्यावर हात मारला. आता चिरौंजी आपल्या कडे प्रसादाच्या साखर फुटाण्याला म्हणतात. आता दोघींना प्रश्न पडला की त्याला काय म्हणत असतील. तर त्याला म्हणे “प्रसाद की चिराउंजी म्हणतात”!
अशी सर्व वाटचाल सुरू असताना प्रत्येक ठिकाणी डोकं चक्रावुन जायचं. आता अशी अवस्था महाराष्ट्रात होते. नेमक्या वेळेला इकडचा शब्द तोंडात येतो. कधी महाराष्ट्रातला भैया हसतो, तर कधी सुखावतो, आपला गावाकडचा शब्द आमच्या तोंडी ऐकुन !

– लेखन : क्षमा प्रफुल. नवी दिल्ली
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800