भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने या काही कविता.
सावित्रीबाई फुले यांना आपल्या पोर्टल तर्फे विनम्र अभिवादन.
संपादक
१. वंदन सावित्रीमातेला
अज्ञानाच्या काळोखाला भेदून
शिक्षणसूर्य उजळला; परंपरेच्या बेड्या तोडून
नवसमाज तू निर्मिला…१
“उठा बंधुंनो, अतिशूद्रांनो”,
हाक घुमली खेडोपाडी
सनातनी किल्ल्यांचा बुरूज कोसळला
क्रांतिसूर्य उगवला…२
समतेची, मानवतेची
धैर्याची तू माऊली
लोकसेवेचे कंकण हाती
भारतवर्षाची तू सावली

– प्रा डॉ सतीश शिरसाठ.. पुणे
२. माय
ज्ञानाची आस दिलीस
जगण्याची जिद्द दिलीस
माय सावित्री तू मला
पंखांची जाणीव दिलीस
पाठीवरची अक्षरं माझी
नशिबाची रेषा लिहितात
स्वाभिमान फुलवत ही
जगण्याच बळ देतात
शिकवलस दगड धोंडे खाऊन
तरीही तू हरली नाहीस
घेतला वसा साक्षरतेचा
टाकून कधीच दिला नाहीस
लेकीबाळी तुझ्या आता
गगनभरारी घेत आहेत
तुझी ज्योत ज्ञान, क्रांतीची
मनोमनी तेवती ठेवत आहेत..
– रचना : सौ.मानसी जोशी. ठाणे
३. सवित्रिमाता…
आपली सावित्री माता
आपली गायत्री माता
केले सहन नी घेतली मेहनत
पण शिक्षणाची क्रांती केली
अशी आपली क्रांती ज्योती सावित्री माता ||१||
जिने शेंणांचा, दगड धोंड्यांचा
टिका टोमणांचा मार खाल्ला
पण सहन केले नी घेतली मेहनत
आणि पहिली महिला शिक्षिका झाली
अशी आपली क्रांती ज्योती सावित्रीमाता ||२||
पुण्याच्या भिडे वाड्यात
भरविली पहिली मुलींची शाळा
आल्या, घेतल्या सर्व जातीच्या मुली
नाही केला भेदभाव
तरीही करणाऱ्यांनी केला विरोध
पण सहन केले नी घेतली मेहनत
आणि स्काॅलरशिप देणारी पहिली अध्यापिका झाली
अशी आपली क्रांती ज्योती सावित्रीमाता ||३||
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री माताने
केला पन, नव्हते धन पण होती जिद्द
आत्मविश्वासाने सोडले घर
पण केले सहन नी घेतली मेहनत
आणि १८ शाळेच्या पहिल्या संचालिका झाली
अशी आपली क्रांती ज्योती सावित्रीमाता ||४||
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाते मुळे
आज सर्व धर्म जाती च्या शिकल्या मुली
नाही आता चुल नी मुल
आहेत सर्व क्षेत्रात मानाच्या पदाधिकारी
नाही आता महिला कुठे कमी
त्यावेळी सावित्री मातेने भोगले नी त्यागले
पण सहन केले नी घेतली मेहनत
आणि ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेतले
अशी आपली क्रांती ज्योती सावित्रीमाता ||५||
सावित्री माताने नाही शिकविले
वडाला फेऱ्या माराया
नाही शिकविले
गडावर फिराया
शिकविले त्यांनी
सज्ञानाने मानवतेचा धर्म राबवया
अंधश्रद्धेचा मुकाबला करायला
पण सहन केले नी घेतली मेहनत
आणि प्रोढ रात्रशाळा काढल्या
अशी आपली क्रांती ज्योती सावित्रीमाता ||६||
आपण सर्वांनी डोळसपणे हातात
पेन घेऊ – वाचन करू
सावित्री मातेचे स्वप्न साकार करु
कोणाला हात दाखवण्यासाठी नव्हे तर
एकमेकांना हात देऊन सहकार्य करु
आणि सावित्री मातेचे स्वप्न साकार करु
अशी आपली क्रांती ज्योती सावित्रीमाता ||७||
दिली ज्योतीबांना शेवट पर्यंत साथ
आली १८९७ प्लेग रोगराईची वाढू लागली साथ
करीत होती माता त्यावर मात
पण वयाच्या ६६व्या वर्षी प्लेगने केला घात
आणि समाजसुधारक व कवयित्रीला मुकला महाराष्ट्र
अशी आपली क्रांती ज्योती सावित्री माता ||८||
जिने शिक्षणात
घेतली गती
तिची निश्चित
होते प्रगती
जी शिकेल ती समाजात टिकेल !!

– रचना : विलास देवळेकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800