जागतिक परिचारिका दिन नुकताच होऊन गेला. या निमित्ताने दुर्दैवी ठरलेल्या परिचारिका अरुणा शानभाग यांना मुख्याध्यापक कचरू चांभारे यांनी संवदेशीलतेने पत्ररुपाने वाहिलेली आदरांजली…..
प्रिय अरूणा,
तुला आमच्यातून जाऊन सहा वर्षे झालीत, तसं तर एकूण आठ्ठेचाळीस वर्षे झालीत पण या आठ्ठेचाळीसमधली बेचाळीस वर्षे तू बेडवर झोपूनच होतीस.
ही बेचाळीस वर्षे म्हणजे फक्त तुझ्या असण्याची ग्वाही होतं यापलीकडे तुझ्या असण्याला दुसरं जीवीत्व नव्हतं. चेतन व अचेतन अवस्थेच्या सीमारेषेवर तुझं नांदणं अचेतनावस्थेत घडलं.
माझ्या समवयस्क लोकांसाठी तू आईच्या वयाची, आईपेक्षाही चार दोन वर्षांनी वडीलच असशील. कुणासाठी आई असशील, कुणासाठी बहीण असशील, कुणाच्या तू ओळखीचीही नसशील पण सहा वर्षापूर्वी तू गेलीस तेव्हा उभ्या राज्याला घरातलं कोणीतरी गेल्यासारखं वाटलं.
आज तुझी आठवण येण्याचं कारण म्हणजे नुकताच तुझा स्मृतिदिन होऊन गेला. तुझ्याबद्दल लिहिलेलं एक छोटंसं पन्नास पानी पुस्तक वाचण्यात आलं. तसं ते एकोणसाठ पानाचं आहे पण शेवटची नऊ पाने परिशिष्ट व संदर्भाची आहेत. परिशिष्ट व संदर्भ लेखिकेचे कष्ट सांगतात अन् पुस्तकाची मूळ पन्नास पानं तुझी हृदयद्रावक कहाणी व तुझ्या अनुषंगाने परिचारिका व्यवसायातील निष्ठेची, सेवेची व समस्यांची माहिती देतात.
प्रिय अरूणा, अरूणाच्या निमित्ताने या पुस्तकाच्या लेखिका दोन स्त्रीयाच आहेत. सुनीता कुलकर्णी व सीमा केतकर असं या दोघींचं नाव. या दोघीही व्यावसायिक लेखिका नाहीत. आधीही त्यांची पुस्तकं निघाली नाहीत व पुढंही निघतील की नाही, सांगता येत नाही. फक्त तुझी कथा सांगण्यासाठीच त्यांनी हे पुस्तक लिहिले असावे.
प्रस्तावनेतच मला डॉ.अविनाश सुपे भेटले. डॉ.सुपेंचे वैद्यकीय शिक्षण व तीस वर्षाची वैद्यकीय सेवा केईएममध्येच झाली. ते विद्यार्थी दशेतले डॉक्टर होते, तेव्हापासून त्यांनी तुझी सेवा केली त्यांनी. तुझ्या अंत्यविधीस ते पालक म्हणून उपस्थित होते. डॉ.सुपे तुला केईएमची फ्लोरेंस नाइटिंगेल म्हणतात.
कर्नाटकातल्या शिमोगा जिल्ह्यातलं हल्दीपूर हे छोटंसं खेडेगाव म्हणजे तुझं जन्मगाव. नर्सिंगच्या शिक्षणाच्या निमित्तानं मुंबईत आलीस, अन् देहातलं संपूर्ण चैतन्य निर्जीव होईपर्यंत मुंबईतच होतीस.
मुंबई ही खूप मोठी मायानगरी आहे. इथं खूप लोकांनी नाव कमावलं पण तुला मात्र आयुष्यातून उठवलं. झालं ते खूपच वाईट होतं पण तरीही बेचाळीस वर्षे केईएमच्या परिचारिकांनी, व्यवस्थापनाने तुला जगवलं हा ही सेवाधर्माचा खूप मोठा अध्याय आहे. ओळख सोडून दिलेल्या नातलगांचा विचार न करता, संपूर्ण जीवनक्रम बेडवर असलेल्या एका परिचारिकेसाठी पोटच्या मुलीप्रमाणे सगळं करणं, तेही तब्बल बेचाळीस वर्षे. जगाच्या पाठीवर असं उदाहरण तुझ्या एकटीचंच आहे. परिचारिका व्यवसाय हे सतीचं वाण असतं, याचं प्रात्यक्षिक म्हणजे सेवा.
झालेला प्रकार सगळ्यांना माहीत झालाय. तुझी काहीच चूक नव्हती. तू ठरली एक कर्तव्य कठोर स्त्री. हसमुखानं कर्तव्य बजावत असताना तू सर्वांची लाडकी होतीस. फ्लोरेंस नाइटिंगेल तुझ्या रूपात केईएममध्ये वावरत होती. तो सोहनलाल .. हं बरोबर ओळखलंस, तोच नराधम ज्यानं तुझं आयुष्य कागदी फूल चुरगाळून फेकावं तसं चोळामोळा करून टाकलं.
काय विचारतेस बाई त्या काळतोंड्याचं? आता तो दिल्लीत राहतोय. मजुरी करून खातोय. दोन पोरं अन् दोन पोरी आहेत त्याला. सुना नातू पण आलेत त्याच्या घरात. केईएममध्ये कुत्र्याला मांस देण्याची त्याची ड्युटी होती. काय खावं अन् कुठं खावं याची अक्कल नसलेला हा सोहनलाल कुत्र्याला दिलेले मांसही चोरत असे.

तू त्याला दोन, तीनदा ताकीद दिली. तू वरिष्ठ असल्यामुळे बोलण्याचा तुला अधिकार होताच व तुझे ते कर्तव्यही होते. पण इथल्या व्यवस्थेत पुरूषी अहंकार हे अजब तेजाब आहे. अहंकार दुखावला की पुरूषी नसानसाचा तीळपापड होतो, त्यातही स्त्रीकडून अहंकार ठेचाळला गेला तर, पुरूषाला ती स्त्रीच या भूतलावर नको वाटते. सोहनलालच्या चुकीच्या वागण्यामुळे तू त्याला खडसावलेस पण तो आतल्या आत धुमसतो आहे. हे तुला माहीतच नव्हते.
तो दुर्दैवी दिन होता २७ नोव्हेंबर १९७३. तू कपडे बदलत असताना तो मागून आला व त्याने तुझ्या नरड्याभोवती कुत्र्याला बांधायच्या काटेरी साखळीने तुझा गळा आवळला. खरं तर तुझा मृत्यूच निश्चित होता पण नियतीच्या मनात परिचारिकेच्या सेवेचा अध्याय लिहायचा असावे म्हणून वाचली असावीस.
नेहमीप्रमाणे खटला चालला, सात वर्षाची नाममात्र सजा भोगून सोहनलाल मुंबई सोडून गेला. तुझ्या आयुष्याचा मात्र चेंदामेंदा झाला. बेडवर पडल्या पडल्या तुझं आयुष्य जात होतं, हे बेडवरचं आयुष्य २००९ साली भलतंच गाजलं.
पत्रकार व लेखिका असलेल्या पिंकी विराणीने तुझ्या दया मरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. या देशाचं दुर्दैव हे आहे की, जी लोकं दुस-यांना जेऊ घालीत नाहीत, तीच लोकं अन्नदानाच्या महायज्ञावर बोलत असतात. केईएमच्या सर्व नर्सेस तुला जिवंत ठेवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत होत्या अन् जी तुला जगवित नव्हती, तिला तुझ्या जगण्याची भ्रांत पडली होती. तुझ्या दयामरणाच्या विरोधात सर्व केईएम एकजुटीनं उभं राहिल्याचं सा-या जगानं पाहिलं.

तुला आठवत नसेल पण सांगतो, केईएममधून तुला सर्वोदयमध्ये हलविण्याचा प्रयत्न झाला होता, त्यावेळी तुला केईएममध्येच राहू द्या म्हणून सर्व नर्सनी मोर्चा, उपोषणणाचा मार्ग पत्करला होता. सुट्टीवाढ, पगारवाढ, सोयी-सुविधावाढ असल्या प्रचलित व कर्मचारी धार्जिण्या मागण्या नसलेला, केवळ सेवेच्या व्रतासाठी नर्सनी केलेला हा एकमेव मोर्चा आहे.
बेचाळीस वर्ष एकाच जागी पडून असूनही तुला कधी बेड सोअर्स झाला नाही की इतर आजारानेही त्रासलं नाही. याचं कारण केईएमच्या परिचारिकांच्या सेवेत आहे.
सेवानिवृत्तीनंतरही अनेक नर्स तुला भेटायला येत होत्या. सेवा करत होत्या. तुला आमरस व मासा आवडतो म्हणून तुझ्यासाठी खास करून आणत होत्या. तुला भरवणं, बसवणं, केस धुणं, कुशीवर वळवणं, स्वच्छ ठेवणं हे सारं नर्सनी आईच्या ममतेने केलं आहे. केईएममध्ये एकही अशी परिचारिका नाही की जिनं तुला स्पर्श केलेला नाही.
आपल्याच घरातल्या आपल्याच व्यक्तीचं आपल्याला सारखं सारखं दुखणं सावरावं लागत असेल तर लोक कंटाळतात. पण बेचाळीस वर्ष न कुरकुरता तुझी सेवा केईएमनं केली आहे. डीन डॉ. प्रज्ञा पै व डॉ. संजय ओक यांनीही तुला लेकीसारखं जपलं.
लेखिकेनं तुझ्याबाबत लिहिलेल्या पुस्तकात परिचारक सेवेबद्दलही लिहिलं आहे. हे एक खरंच खूप कष्टाचे व खडतर काम आहे. परिचारिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आजही चिंतेचा विषय आहे.
तुटपुंज्या पगारावर त्या अहोरात्र झटत असतात. रूग्णांची औषधी शिवाय लेखी टिपणं यासोबतच रूग्णांच्या नातेवाईकांना तोंड देण्याचे कामही नर्सला करावे लागते. स्त्री जन्म आहे म्हणून घरातलं काम सरत नाही व नोकरी आहे म्हणून दवाखान्यातलं काम चुकत नाही. कितीही मरमर केली तरी रोषाच्या तोफेला पून्हा नर्सचंच मुंडकं बांधलेलं. क्षमतेपेक्षा जास्त काम करूनही वाढती रूग्णसंख्या व अपुऱ्या सोयी यांमुळे परिचारिकेवर कमालीचा ताण आहे.
परिचारिका सेवेबद्दलची माहिती देताना लेखिकांनी सेवेचा वसा व अडचणी व्यवस्थित मांडल्या आहेत.
खरंच अरूणा, तू बेचाळीस वर्ष खिळलेल्या अंथरूणावर जगलीस. या जिद्दी जगण्याला सलामच आहे पण त्यासोबतच परिचारिकेंच्या सेवाभावाला शतशः वंदन आहे.

– लेखन : कचरू चांभारे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
आपल्या सहकर्मचारी अरुणाची जीवापाड काळजी घेणार्या KEM STAFF ला सलाम
मनस्वी आभार सर जी