आज राम नवमी आहे. त्या निमित्ताने काही कविता पुढे सादर करीत आहे. आजचे विशेष म्हणजे नागपूर येथील श्री श्रीराम द. ढवळे यांच्या गीताची व्हिडिओ क्लिप आपण देत आहोत.
७१ वर्षीय, श्री श्रीराम ढवळे यांचे शिक्षण एम. एस्सी (कृषी) डी.बी.एम., सीए आय.आय.बी. इतके झाले असून ते निवृत्त बैंक कार्यपालक आहेत. त्यांच्या आध्यात्मिक रचना मुख्यतः भजने, आरत्या व संक्षिप्त चारोळीसम रचना ई. सध्या शतकाहून अधिक भजने व असंख्य चारोळ्या (सदगुरू गजानन महाराज यांना समर्पित) उपलब्ध आहेत.
आज रामनवमी विशेष :
रामनवमी २०२१ ला प्रसारित “स्मरता हो श्रीराम जयराम जय जयराम” हे त्यांचे स्वरचित भजन पुढे देत आहे. हे भजन नाशिकचे सुप्रसिद्ध गायक डाॅ. आशिष रानडे यांनी गायले व स्वरबद्ध केले आहे. त्रिवर्षिय पत्राद्वारे दासबोध अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे भाग्य त्यांना लाभले असून, त्यातून हि रचना लिहिण्याची प्रेरणा राम रायांनी दिली असावी, असे ते म्हणतात.
‘न्यूज स्टोरी टुडे’ परिवारात ढवळे साहेबांचे हार्दिक स्वागत आहे.
राम नवमीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
– संपादक

1. श्री श्रीराम ढवळे यांची रचना पाहू या….
2. “श्रीरामा दयाघना”
श्रीराम दयाघनां धावून या लवकर
निसर्ग सृष्टी मध्ये माजला हाहा:कार ।।ध्रु।।
महामारीने प्रजा झाली भीत भयंकर
एकमेका जवळ जाणें बंद राखी अंतर
माणूस माणसाला टाळू पाहे ठेवी दूर ।।1।।
सत्संग करितो राखून सुरक्षित अंतर
मुख कान नाक झाकायांचे संरक्षणार्थ
औषधं अपुरी जगतो नशीबावर ।।2।।
मानविय वैद्यकीय अपुरे उपचार
सर्व झटती सदा जगण्यासाठी अपार
रामा रक्षावे मानव, पर्यावरण सुधार ।।3।।
अयोध्या दर्शनां आता झाले मुक्त द्वार
झाले स्थापन विश्वातील अपूर्व मंदिर
घ्यावया गोजिरं दर्शन आम्ही आतुर ।।4।।

– रचना : अरुण गांगल कर्जत – रायगड
3. राम
चार अक्षरी
कौसल्येचा
पुत्र राम
व्हावे माझे
नीज धाम. १
राम नेत्री
राम गात्री
आत्माराम
माझे गोत्री. २
एक पत्नी
एक बाणी
राम नाम
भजे वाणी. ३
राम नाम
जळे पाप
इडा पिडा
आपोआप. ४
राम नामे
उद्धरती
नित्य हवी
रामभक्ती. ५
कौसल्येचा
बाळ राम
वाल्मिकींचा
योद्धा राम. ६

– रचना : सौ.अर्चना मायदेव. पुणे
नमस्कार आज रामनवमी.
श्रीराम यांच्यासह रामायणातील काही पात्रांवर सगळीकडे वेगवेगळ्या पध्दतीचं लिखाण होत आहे.अनेकजण विविध पोस्ट, व्हिडिओ पाठवतात. रामायणातील एक पात्र- माता कैकेयी. तिचं मनोगत एका कवितेतून मी मांडण्याचा प्रयत्न केलाय.
एका आईचं मनोगत…
राज्याभिषेकाचा डाव मोडून,
श्रीरामांनी वनाचा रस्ता धरला
तेव्हा ;
लोकप्रेम आणि लोकक्षोभाच्या वणव्यात
मी होरपळले होते.
महाराजांची तडफड पाहून
मी कळवळले होते.
पण क्षणभरच.
हे आठवले होते,
एका घनघोर युध्दात
महाराजांची मी ढाल झाले होते,
रामलक्ष्मणांच्या बाळलिलांनी
मी सुखावत होते.
आकाशातले तारे वेचून
त्यांना खेळायला मी देत होते.
उर्मिला आणि सीतेला
मी माहेर आणून दिले होते.
कसं सांगू ?
वासरासाठी गायही शिंगं उगारते;
आईपण जगताना,
राजधर्म मी विसरले होते.
श्रीरामाच्या वनगमनानं,
नियतीनं मला खलनायिका केलं;
रामप्रसादात कुणाच्याही
डोळ्याला डोळा
मी भिडवू शकले नाही,
अगदी मंथरेच्याही.
तरीही,
नव्हता खेद त्याचा मला;
तू आलास.
तुझ्या बंधुप्रेमाच्या तेजाने-
दिपून गेले मी;
बाळा,
गुन्हेगार मी आयोध्येची,
महाराजांची आणि
इतिहासाची;
पण हे भविष्या,
तू तरी मला समजून घेशील का ?

– रचना : प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ
5 …… श्रीराम …..
वदावे वदावे सदा श्रीराम
करावे करावे सदा श्रीराम
भजा हो भजा सदा श्रीराम
श्रीराम श्रीराम श्रीराम राम …
मनात राहो श्रीराम श्रीराम
वदावे वाचे श्रीराम श्रीराम
सुखाचे निधान श्रीराम राम
श्रीराम श्रीराम श्रीराम राम…
नेई तो पैल श्रीराम श्रीराम
देई तो सुख श्रीराम श्रीराम
जगतास तारी श्रीराम राम
श्रीराम श्रीराम श्रीराम राम …
वैभव आहे सखा तो श्रीराम
कुटूंब कल्याण श्रीराम राम
नि:संग संग श्रीराम श्रीराम
श्रीराम श्रीराम श्रीराम राम…
कैवल्यधाम श्रीराम श्रीराम
पतित पावन श्रीराम राम
सत्संग साधू श्रीराम राम
श्रीराम श्रीराम श्रीराम राम…
पुण्याच्या राशी श्रीराम राम
गंगा नि काशी श्रीराम राम
अवघेच विश्व श्रीराम राम
श्रीराम श्रीराम श्रीराम राम …

– रचना : प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक
6. येणार रघुनाथ
येणार रघुनाथ
अयोध्या नगरी,
येणार रामराज्य
आता देशात
सखे ग राम जन्म झाला
ऊत्सव उसळा आता नगरात. १
आता येणार रघुनाथ
शबरी थकली
पाहुनी वाट
येणार रघुवीर
आता लौकर
केला बघ किती थाट २
बासरी वाजवितो
वारा मंजुळ
अंधरली ही
हिरवी मखमल
रामराया
आता येणार
किती उधळली
सुमने परिमल ३
भोळ्या भक्ताचा
भोळा भाव
शबरीची बोरे
बघशी खाऊन
रघुराजारे जाशील हरखून
शबरीची बोरे
बघ रे चाखून ४
समजून घे रे
मनीचा भाव
द्रोण भरला
चाखून चाखून
म्हणून उमटले दात
चाखली बोरे खाऊन पावशी समाधान

– रचना : सुरेखा तिवाटणे. पुणे
7. राम आत्मरूप
राम जन्म राम तत्त्व
राम धर्म राम कर्म
राम आण राम प्राण
राम आत्म राम शब्द
राम बाण राम गण
राम शंख राम रण
राम सत्य राम युद्ध
राम जय राम घोष
राम आद्य राम सूर्य
राम चंद्र राम श्याम
राम भक्त राम दास
राम मीत राम प्रीत
राम नाम राम जप
राम ध्यान राम वेग
राम काव्य राम श्लोक
राम गीत राम ग्रंथ
राम वीर राम धैर्य
राम साद राम ध्यास
राम श्वास राम आस
राम अंश राम सुख
राम राम राम राम

– रचना : रुपेश पवार
८. एक राम
राम संघर्षाची मू्र्ती
राम चित्ताची या स्फूर्ती
कर्मधर्म परिपूर्ती
एक राम
राम जीवाचे जीवन
राम चंदनाचे वन
नाम परम पावन
एक राम
राम चैतन्याची खूण
राम आदर्शाची खाण
परि गुणातीत जाण
एक राम
राम निश्चयाचे फळ
गंगेहून हो निर्मळ
देई जगण्याला बळ
एक राम
राम अनंताचा शोध
राम अंतरंग बोध
नादब्रह्माचाही नाद
एक राम
राम रामासी मिळाला
भेद सहज गळाला
आत्मरंगी प्रकटला
तोची राम

– रचना : दीपाली दातार
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800