सखी असते सोबती असते म्हणतात
सारे कविता
दररोज उगवणारी ती वाटते मला “सविता”
तिच्या ही तेजाने दिपून जातोच आपण
विरघळून जाते
तिच्यात आपले सारे “मी” पण….
सुगंधित होते जीवन सहवासाने तिच्या
“कळाच” कमी होऊन जातात पहा आयुष्याच्या
दरवळतोच परिमळ गंधित होतात दिशा
कविता सखीत दिसतात पहा आयुष्याच्या आशा..
दु:खापार घेऊन जाते क्षणभर मिळतो ठाव
म्हणून हवा सभोवती कवितेचा गांव
त्या गावात असतात पहा आनंदाची झाडे
आणि मोठमोठे असतात कवितेचेच वाडे…
स्वप्ने असतात, आशा असतात
असतात मनोरथे
रस्त्यावरती विखुरलेली असतात इथे तिथे
हाती लागतील तेवढी आपण वेचित वेचित जावी
जीवात जीव आहे तोवर झोळी भरून घ्यावी…
सुकून आहे सार आहे कविता जीवनात
सोडू नका पहा हो कधीच तिचा हात
भवसागर पार करून तारून नेईल जीवा
म्हणून नेहमी कवितेचा हातात हात हवा…

– रचना : प्रा.सौ.सुमती पवार
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800