आज, अक्षय तृतीयेच्या
निमित्ताने काही कविता प्रसिध्द करीत आहे.
अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
– संपादक
१.
अक्षय तृतीया तिथी सुदिन सुमुहूर्त
देई अक्षय सुयश सदा सर्व कार्यात ।।ध्रु।।
झाले सत्ययुग त्रेतायुग आज आरंभ
प्रगटले हय नरनारायण परशुराम
करिती व्यास लेखनारंभ महाभारत।।1।।
येती मिश्रलहरी ब्रह्मा-विष्णूच्या पृथ्वीवर
भगीरथ प्रयत्ने गंगा येत अवनीवर
बद्रीनारायणाचे द्वार खुले दर्शनार्थ।।2।।
अन्नपूर्णा देवीचा आहे आज जन्मदिन
युधिष्ठिराला दिले अक्षयपात्र श्रीकृष्णानं
सुदिनी कृषीवल बियांची पेरणी करीत।।3।।
पितृ पुजन स्मरण करावे पुण्यप्रद
करावे विष्णू-लक्ष्मी पूजन होती कृपावंत
सुखावे जीवन आज साडेतीन मुहूर्त।।4।।

– रचना : अरुण गांगल. कर्जत – रायगड
२. उनी आखाजी …
उनी आखाजी आखाजी हाऊ सन मोठा गोड
घरोघर झाडेसले देखा लागनात पाड
कैऱ्या हालती झुलती वारा हालावस झुला
वारावर नाचतीस हाऊ आनंद से खुला…
आते गौराई भी जाई येती शंकर लेवाले
माहेरनं गनगोत सोडी जाई सासरल
घरघरम्हा तो सन गौरी शंकर जेवाडा
खिर पुरननी पोई लेक जवाईले वाढा…
गौराईना दागिना त्या खारीक खोबरान्या वाट्या
काया धवया त्या बिया मझार वाजतीस घंट्या
फुलहार घाला तिले तिले नवरी सजाडा
तिले वाजत गाजत सासरले धाडा…
टिपऱ्या खेतीस नदीम्हां गावोगावन्या त्या पोरी
गांव दखस गंमत कशा लढतीस पोरी
वाटे लावाले गवराई बठ्ठा गाव तो लोटस
वाटे लाईन सासरे हिरमुसला येतस…
मंग भरतंस डेरग पितरेसले जेवाले
निवतं दारले कुकुनं त्यासले मान नि पानले
आंबा रसनी आगारी मंग चुलाम्हा पडस
बठ्ठ घरबार मंग निवद दायीनी जेवस …
माय माहेर ऱ्हातीस पोरी झोका बांधतीस
आमराईम्हां झोकावर सुखदुःख चावयतीस
येस मुराई नवरा गाडी जुपी लई जास
आमराई ती मनम्हा पोरी सासरे नांदतीस …

– रचना : प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक
३ नाते चराचराशी
(वृत्त~पादाकुलक~८+८)
जन्म घेतला वसुंधरेवर
धारण केले शरीर सुंदर
अखंड जडले या देहाचे
समस्त नाते चराचरावर
सूर्य उगवतो पूर्व दिशेला
ऊर्जा देतो या कायेला
कुटुंबवत्सल भार वाहण्या
कष्टासाठी सज्ज जाहला
आई बाबा ताई दादा
रक्ताची ही नाती असली
प्रियकरासवे विहार करता
रोमरोमात वीज थरकली
आजी~आजो हट्ट पुरविती
साय दुधाची नातवंड हे
सुरकुतलेल्या देहावर त्या
माया अखंड बरसत राहे
नाते माझे या सृष्टीशी
गजरा माळू शुभ्र फुलांचा
सडा वेचते प्राजक्ताचा
शिरी वाहते सदाशिवाच्या
जगण्यासाठी प्राणीमात्रा
श्वास घेऊन उभे तरूवर
निर्मात्याची किमया न्यारी
उपकृत आम्ही या सृजनावर
मेघ बरसती नद्या वाहती
देती मजला सुंदर जीवन
समुंदराची गाज शिकविते
संगीत तथा मधूर गायन
पक्षी येती किलबिल करती
काकरूपात पितर भेटती
दाणापाणी पिऊन चिमण्या
तृप्त होऊन उडून जाती
श्वान बोलतो नयनामधुनी
इमान राखी धन्याप्रती तो
खाल्ल्या अन्ना सतत जागतो
घरदाराचे रक्षण करतो
सृष्टीमधल्या सजीवाप्रती
भगवंताची आहे वसती
प्रेम करूया चराचरावर
जोडुनिया ही अभंग नाती

– रचना : अरूणा मुल्हेरकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800