Saturday, March 15, 2025
Homeकलासुलेखनाच्या माध्यमातून बुद्धं शरणं गच्छामी !

सुलेखनाच्या माध्यमातून बुद्धं शरणं गच्छामी !

मागील १० हजार वर्षामध्ये ज्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केली अशा जगातील टॉप शंभर विश्व मानवांची यादी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केली. त्या यादीत प्रथम स्थानी तथागत बुद्ध आहेत.

आचार्य रजनीश (ओशो) बुद्धांबद्दल म्हणतात की, बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव जगाने आजपर्यंत निर्माण केला नाही.
गौतम बुद्ध यांच्या माहितीचा मुख्य स्रोत म्हणजे बौद्ध वाङ्ममय होय.

भगवान गौतम बुद्ध यांचे अनुयायी बुद्धाची शिकवण जगभर पसरविण्यासाठी साहित्यासोबतच शिल्पकला, वास्तुकला आणि चित्रकलेचाही प्रभावीपणे अवलंब करत आले आहेत.

असाच एक अनुयायी कलावंत म्हणजे सुशिम कांबळे. राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात आर्टिस्ट म्हणून तो नोकरी करतो. शासनाच्या जाहिरातींचे आर्टवर्क आणि अन्य कलाविषयक बाबी तो हाताळतो .

सुशिमने औरंगाबाद येथुन कृषी विषयात शिक्षण घेतल्यावर आपल्या आवडत्या विषयात करियर करायचे ठरवले. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातून मास्टर ऑफ फाईन आर्ट्स या पदव्या त्याने संपादन केल्या.

मास्टर्स ऑफ फाईन आर्टचे शिक्षण घेत असतांना त्याने प्रोजेक्ट मध्ये तयार केलेल्या प्रॉडक्ट डिजाईनला ‘ऑल इंडिया पेटंट‘ मिळाले होते. मुंबईच्या कल्पार्ट इंटरनॅशनल इथे काम करत असतांना आय बाॅल कंपनीसारख्या नामांकित कंपन्यांसाठी काम केले. कामाचा अनुभव घेतल्यानंतर सन २०१३ पासून तो महाराष्ट्र शासनाच्या नौकरीत आहे.

अनेक शासकीय कॅम्पेन राबवतांना सुशिमने स्वत:चे वेगळेपण कायम जपण्याचा प्रयत्न केला. टाळेबंदी आणि कोरोनाकाळात मिळालेल्या ‘घरुन काम करण्याच्या’ सवलतीचे सुशिमने सोने केले. त्याने अभ्यासक्रमाचा भाग म्हणून सुलेखनाचे (कॅलिग्रॅफीचे) प्रशिक्षण घेतलेले होते. याच कॅलिग्रॅफीचा कल्पक वापर करून त्याने बुद्ध तत्वज्ञानावर आधारित चित्र रेखाटायला सुरूवात केली.

त्याच्या चित्रांमधले बुद्धांचे सचित्र संदेश बोलके होऊ लागले. तथागत बुद्ध यांच्या सिंह मुद्रा, ध्यानस्थ मुद्रा, पद्मपाणी मुद्रा, आशीर्वाद मुद्रा, भूमिस्पर्श मुद्रा, उभी मुद्रा, अभय मुद्रा इत्यादी मुद्रा प्रसिद्ध आहेत. यांचे केवळ चित्र न काढतां त्या सोबतच बुद्ध धम्माची शिकवण सुलेखनाच्या माध्यमातून सुशिम चितारतो.

भगवान बुद्धाने सांगितलेल्या दहा पारमिता, चार आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग, या सर्व विचारांना सुलेखनातून आकार देत बुद्ध प्रतिमेसह तो जीवंत करत जातो.

गेली अकरा वर्ष तो फेस ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट (फॅम) चा सभासद आहे. या माध्यमातून तो सामाजिक कार्य करतो. सुलेखन, चित्र काढणे हे त्याचे पॅशन आहे. बुद्ध समजून घेणे, बुद्ध आचरणात आणणे आणि बुद्धाची शिकवण याचा प्रचार प्रसार करणे, हे एका तपस्वी साधकाचे कार्य आहे. हे कार्य सुशिमच्या कुंचल्यातून होत आहे. कलेच्या माध्यमातून जणू तो वंदन करित आहे.

यावर्षी टाळेबंदीमुळे बौद्ध पौर्णिमेचे कार्यक्रम ऑनलाईन होत आहेत. आपल्या घरात सुरक्षीत राहून, विश्वशांतीसाठी, जगाच्या कल्याणासाठी, मन:शांतीसाठी बुद्धांचे विचार पोहचविण्याचा प्रयत्न होत आहे.

सुशिम कांबळे

या पार्श्वभूमीवर म्हणूनच बौद्ध पौर्णिमेला सुशिमने सुलेखनातून केलेले वंदन अधिक समर्पक ठरते.

अर्चना शंभरकर.

– लेखन : अर्चना शंभरकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. अप्रतिम कॅलिग्राफी चित्रकला बघताना मनाला एक वेगळाच आनंद, शांती व ऊर्जा देऊन जाते!

    • At the very out set, Hertiest Congratulations Sushim… Supurb… you are simply Great an Artist, u r inspirational IDOL for young generation …in fact so many people r following you. So keep it up this great work, we r really Proud of u…. Once again Congratulations… 💐🎼

      Regards:
      Dr. D.S.Mhaske
      Zone III Cultural Coordinator,University of Mumbai.

  2. व्वा सुशिम.. डोळ्यांचे पारणे फेडणारी आहेत सारी सुलेखन…नकळत त्यातील संदेश हदयाहदयात पोहचतिल व ती नतमस्तक होतील.. अभिवंदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments