Saturday, March 15, 2025
Homeसाहित्यप्रिय आई......

प्रिय आई……

स्त्रीच्या गर्भातील बालिका आपल्या आईशी बोलतेय, अशी कल्पना करून पुढील लेखन केले आहे….

प्रिय आई, आई हा शब्द किती सुंदर आहे गं. अगदी तुझ्यासारखा गोड ज्यात प्रेमवात्सल्याचा झरा आहे. आपलेपणा आहे. तू जेव्हा आनंदी असते, हसते तेव्हा मला ही खूप छान वाटते . ते मी शब्दात देखील वर्णन नाही करू शकत.

तुझ्या गर्भात रहाण्याचा हा अनुभव माझ्यासाठी लाखमोलाचा आहे, असे वाटते की मी खूप सुरक्षित आहे.

पण ………हल्ली काय झाले आहे तुला ? सतत रडत असते, नाराज असते. मला हे जाणवते. तुझ्या ह्या रडण्याचा मला खूप त्रास होतो. खूप यातना होतात . मग मी पण एकटीच रडत असते. तुला ते कसे जाणवत नाही ? तुझे अश्रू पुसायला निदान तुझी आई , तुझी ही सर्व प्रेमळ माणसे जवळ आहेत. पण माझे अश्रू तुझ्याशिवाय कोण बरे पुसणार ? ते कोणाला दिसणार? एका आईलाच प्रथम आपल्या मुलांचे दुःख कळते ना ?

हल्ली घरात वातावरण खूप नकोसे वाटणारे आहे. अगदी दूषित का ग ? बाबा सतत चिडचिड करतात, राग राग करतात. मला आता सर्व समजत आहे. तू व बाबा जेव्हा म्हणतात ना, गर्भपात करू या, नको ती मुलगी तेव्हा मला खूप दुःख होते, खूप भीती वाटते, वेदना होतात. ते तुला कसे कळत नाही ? मी तर तुझाच अंश आहे आणि तू मला जिवंतपणी मारण्याचा कसा विचार करू शकते ?

एवढे दिवस तुम्ही दोघे खूप खुश होता. पण मुलगी होणार हे समजल्यापासून दुःखी झाला. का बरं असे ? जर मुलगा असता तर तुम्हाला खूप आनंद झाला असता. हो ना ? तुम्ही कधीही गर्भपात करण्याचा विचार देखील केला नसता. का तर म्हणे तो वंशाचा दिवा आहे ! तुम्ही ठामपणे सांगू शकता का की तो तुमची आयुष्यभर काळजी घेईल? नाही ना ?

मग….. तुमच्या सारखे उच्च शिक्षित लोक जर असे विचार करत असतील तर बाकीच्यांना काय म्हणावे ? आई, एक गोष्ट सांगते तुला…. लहान आहे, पण खूप मोठा अर्थ आहे…. जेव्हा कोणाचे बाबा गावाहून घरी येतात तेव्हा मुलगा पहिला प्रश्न विचारतो मला काय आणले ? बायको आनंदाने स्वागत करून पाणी देऊन विचारपूस करते. पण घरात मुलगी असली ना तर ती पळत जाऊन बाबांना मिठी मारते.

इतक्या दिवसांनी भेटल्याचा आनंद दोघांनाही जाणवत असतो. तेव्हा नकळत दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू येतात व ती मिठी सोडवण्याची अजिबात इच्छा नसते. ती घट्ट मिठी हवीहवीशी वाटते. अशी ही मुलगी असते. सर्वांवर प्रेम करणारी, माया लावणारी, नाती जपणारी, सर्वांशी जोडून रहाणारी.

आई ऐक ना…… मला ही आत छोटे छोटे हात व पाय आहेत. मला छोटेसे हृदय आहे. मला ही मन आहे. तुम्ही बोललेले सगळे ऐकू पण येते आणि समजते देखील. मला ही जन्म घ्यायचा आहे. ही परमेश्वराने बनवलेली सुंदर सृष्टी पहायची ओढ आहे. मला जगायचे आहे. तुमचे प्रेम व सोबत हवी आहे.मी तुम्हाला वचन देते माझ्यामुळे तुम्हाला कधीही कोणताही त्रास होणार नाही.मी खूप शिकून तुमचे नाव मोठे करणार. तुम्हाला माझा अभिमान वाटेल असे कार्य करणार. मी तुम्हाला कधीही दुखावणार नाही, तुम्ही सांगाल ते करेल, सर्व ऐकेन, मात्र मला जगण्याची संधी द्या.

आई व बाबा नका हो मला मारू. मी तुमची मुलगी आहे. मी तुमची परी आहे. मला फुलाप्रमाणे उमलू द्या, बहरु द्या. हे जग पाहू द्या. एक कळी असताना तोडू नका मोडू नका.

तुमची मुलगी
मुलीला जन्म घेऊ द्या. ती आहे म्हणून हे जग एवढे सुंदर आहे. ती परमेश्वराचीच एक निर्मिती आहे. ती आहे म्हणून घराला घरपण आहे. ती भावी आई, बहीण, पत्नी, मुलगी, सून, एक सक्षम महिला, एक आदर्श स्त्री आहे.

पृथ्वीचा समतोल राखा, मुलीची हत्या करणे हे पाप आहे अशी चूक कदापिही करू नका. जिवंतपणी मरण यातना देऊ नका. मुलीचे आनंदाने स्वागत करा.मुलगा व मुलीमध्ये
नका करू भेदभाव
मुलीचा स्वीकार करून
करा स्त्रीत्वाचा सन्मान
स्त्रीभुण हत्येसारखा
नका करू अपराध
लेक वाचवा, लेक घडवा
बाळगा लेकीचा ही अभिमान.

रश्मी हेडे., सातारा

लेखन : रश्मी हेडे.
संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. रश्मी हेडे यांनी आईच्या गर्भाशयातील मुलगी आपल्या आई शी काल्पनिक बोलतानाचे रंगाविलेले चित्र मनाला खूपच भावले. स्त्री भ्रूणहत्या करणे खरच चूक आहे.
    🙏 धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments