२८ मे : स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती विशेष
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतीचे धुरीण, विज्ञानाचे पुरस्कर्ते, हिंदुत्व तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, नामवंत कवी,प्रतिभावंत साहित्यिक, थोर समाजसेवक, जातीभेद- अंधश्रद्धेचे कट्टर विरोधक, कडवे देशभक्त असं धैर्यशाली व्यक्तिमत्त्व असलेल्या विनायक दामोदर सावरकर उर्फ स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगुर येथे २८ मे १८८३ रोजी देशभक्त घराण्यात झाला अन् जणू क्रांतीकारकांचा मुकूटमणीच उदयास आला.
सावरकर यांचे घराणे म्हणजे जणू क्रांतिकारकांची खाणच. विनायकसह थोरले बंधू बाबाराव आणि धाकटे बंधू नारायणराव यांनीही आपलं सारं आयुष्य मातृभूमीला ब्रिटिश राजवटीतून मुक्त करण्यासाठी पणाला लावलं.
सावरकरांचं माध्यमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयात तर, उच्च शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून झालं.याशिवाय त्यांनी लंडन येथे बॅरिस्टर पदवीही संपादन केली.
सावरकरांचे घराणे देशभक्तांचे असल्याने विनायकच्या हृदयात शालेय जीवनापासूनच स्वातंत्र्याची ज्योत धगधगत होती.खरं तर, सावरकरांवर जोसेफ मॅझिनी यांच्या ग्रंथाचा मोठा पगडा होता. त्यांनी या पुस्तकातील आत्मचरित्र मराठीत शब्दबद्ध केलं. अन् त्याच पुस्तकातून पुढे त्यांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा मिळाली. पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र्याची उत्कंठ इच्छा निर्माण करण्यास हे पुस्तक खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरले.
वीर सावरकरांच्या मनावर छ्त्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांचाही मोठ्या प्रमाणात प्रभाव होता. सावरकरांनी “१८५७ चे स्वातंत्र्य समर” हा ग्रंथ लिहून त्यात नमूद केले की, “१८५७ चा उठाव हे केवळ बंड नसून एक स्वातंत्र्य संग्राम आहे”.
दरम्यान क्रांतिवीर चाफेकर बंधूंना ब्रिटिश सरकारने फाशीची शिक्षा दिल्याचे वृत्त कानी पडल्यावर कुलदेवता अष्टभुजादेवीला साकडे घालत त्यांनी “मारिता.. मारिता.. मरेतो झुंजेन” अशी प्रतिज्ञा घेतली. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षीच त्यांनी “स्वदेशीचा फटका” अन् “स्वतंत्रतेचे स्तोत्र ” या काव्य रचना लिहून आपल्या बुद्धिमत्तेची ओळख जगाला करून दिली.
वीर सावरकरांनी सशस्त्र क्रांतीची मुहूर्तमेढ रोवण्याच्या उद्देशाने १ जानेवारी १९०० रोजी नाशिक येथे “मित्रमेळा” ही संघटना स्थापन केली. त्यातील काही निवडक जहालवादी युवकांची निवड करून १९०४ मध्ये “अभिनव भारत” ही संघटना उभारून सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली ह्या सदस्यांना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी पॅरिसला पाठविण्यात आले.
स्वातंत्र्य लढ्यात जनतेचा सहभाग वाढावा, या दृष्टिकोनातून त्यांनी “समर, मॅझिनी, माझी जन्मठेप” ही पुस्तके लिहिली. या देशभक्तीपर लिहिलेल्या ग्रंथांचा भगतसिंग व त्यांच्या क्रांतिकारी अनुयायांनी तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेला बळ देण्यासाठी वापर केला. त्यामुळेच सावरकरांना क्रांतिकारकांचे “मुकुटमणी” म्हणून भूषविले गेले.
ब्रिटिशांच्या जुलुमी सत्तेला कडाडून विरोध करण्यासाठी चाफेकर बंधूंनी पुण्यात आयुक्त रँड अन् आयसर्ट यांचा वध केल, तर नाशिक येथे कलेक्टर जॅक्सन याचा वध क्रांतिकारक कान्हेरे, कर्वे व देशपांडे या विशीतील तरुणांनी केला. दुसरीकडे अँड्रयु फ्रेझर या जुलुमी अधिकाऱ्याला क्रांतिकारक मदनलाल धिंग्राने गोळ्या झाडून ठार केले.
बंगालमध्ये खुदीराम बोस अन् प्रफुल्ल चाकी या क्रांतिकारकांनी बंगालच्या फाळणीविरुध्द उठाव करून फोर्टवर बॉम्बहल्ला केला. अशाप्रकारे एका पाठोपाठ एक सशस्त्र हल्ल्यांमुळे ब्रिटिश सरकार पार हादरून गेलं.
देशांतर्गत अराजकता पसरविणे, ब्रिटिश अधिकाऱ्यांचा वध करणे, बॉम्बस्फोट घडविणे या गंभीर आरोपांखाली वीर सावरकर यांना अटक होऊन त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. त्यांना इंग्लंडहून सागरी मार्गे मुंबईत नेताना १ जुलै १९१० रोजी मोरिया बोटीतून मोठ्या शिताफीने फ्रान्सच्या मोर्सेल्स बंदरावर उडी घेऊन ते पसार झाले. सावरकरांची ही उडी त्रिखंडात प्रचंड गाजली.
तथापि, दरम्यानच्या काळात ब्रिटिश व फ्रान्सच्या पोलिसांनी सावरकरांना अटक केल्यावर त्यांना विविध गुन्ह्याखाली ५० वर्षांची जन्मठेपेची शिक्षा सुनविण्यात आली. त्यातील १० वर्षे त्यांनी अंदमान येथे काळया पाण्याची शिक्षा भोगली. परंतु सावरकरांना सुनावलेल्या अन्यायी व जुलुमी शिक्षेविरुद्ध प्रचंड जनक्षोभ उठल्याने, ब्रिटिश सरकारने भयभीत होऊन २ मे १९२१ रोजी सावरकरांची सुटका केली.
शिक्षेच्या सुनावणीदरम्यान सावरकरांना काही काळ ठाणे कारागृहात ठेवण्यात आले होते. ठाण्याहून प्रस्थान करते प्रसंगी सावरकरांच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा ठाणेकरांची मोठी गर्दी झाली होती. खरं तर, १९२१ पर्यंतचा कालखंड हा सावरकर पर्वच म्हटला गेला. त्याला भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास साक्षीदार आहे.
मध्यंतरीच्या काळात क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांना फाशी देण्यात आली, त्याचं अतीव दुःख सावरकरांना झालं. इतकेच नव्हे तर, सावरकरांसह अनेक क्रांतिवीरांना राजद्रोहाखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यात नारायण दामोदर सावरकर, गणेश दामोदर, बाबाराव सावरकर, क्रांतिवीर कान्हेरे, कृष्णाजी कर्वे, सखाराम काशीकर, पुरुषोत्तम दांडेकर, केशव चांडवडकर, गोपाळ पाटणकर, श्रीधर शिंदे, विनायक देशपांडे, वि.म.भट, विष्णू केळकर, बळवंत बर्वे अशा असंख्य देशभक्तांचा समावेश होता.

सावरकरांच्या माझी जन्मठेप, अथांग, तेजस्वी तारे, हिंदुत्व, काळेपाणी, कमला, गोमंतक, सप्तर्षी, हिंदू पदपादशाही, भारतीय इतिहासातील सहा सुवर्ण पाने आदी कादंबऱ्या व काव्य साहित्य त्या कालखंडात खूप गाजून त्यातून स्वातंत्र्य लढ्याला धार आली.
वीर सावरकर यांच्या कार्यकर्तुत्वावर आचार्य अत्रे, विद्याधर करंदीकर, नीलकंठ खाडिलकर, विद्याधर गोखले, य.दि.फडके, पंडित बखले, मुकुंदराव किर्लोस्कर, पु.भा.भावे, व्यं.गो.अंदुरकर आदी ख्यातनाम लेखकांनी कादंबऱ्या लिहिल्या.
जाज्वल्य राष्ट्रप्रेम अन् निस्सीम देशाभिमानाचं प्रतिक असलेल्या सावरकर लिखित “सागरा प्राण तळमळला….” आणि “जयो स्तुते श्रीमहनमंगले शिवास्पदे शुभदे ! स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे!” हे स्वातंत्र्याचे स्तोत्र आजही भारतीयांना प्रेरणादायी आहे.
भारतीय स्वातंत्र्याकरिता सावरकरांनी दिलेल्या महान योगदानाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने त्यांना यथाशीघ्र “भारतरत्न” हा सर्वोच्च नागरी पुरस्कार बहाल करावा, असे मला निश्चितच वाटते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली. जय हिंद, जय महाराष्ट्र!

– लेखन : रणवीर राजपूत.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.