Wednesday, February 25, 2026
Homeलेखदेवदूत …

देवदूत …

२०१८ च्या ऑगस्ट मध्ये, आमच्या मुलीला, समृद्धीला एकटे वाटू लागले. त्यामुळे तिने काही तरी पाळीव प्राणी आणू या अशी कल्पना आम्हाला सुचवली. ठरल्याप्रमाणे तिने स्वतःच केमन आयलंड हुमेन सोसायटी ला फोन केला आणि चौकशी केली. त्यानंतर तिथली एक बाई निरीक्षणा साठी आमच्या घरी आली, हे ठरवण्यासाठी की आमचे घर एक पाळीव प्राणी ठेवण्यासाठी योग्य आहे किंवा नाही ? तिचे अँप्रोवल आल्यानंतर आम्हाला एक मांजर फॉस्टर करण्यासाठी देण्याचे सोसायटी ने मान्य केले.

दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला एका बारा वर्ष्याच्या मांजराला म्हणजेच “सांता” ला फॉस्टर करण्याची परवानगी दिली.
समृद्धी ला खूप आंनद झाला. लगेच आम्ही सांता ला घरी घेऊन आलो.

पहिल्या दिवशी सांता पिंजऱ्याच्या बाहेर आल्यानंतर त्याने समृद्धी च्या हाताला चाटले आणि त्या क्षणीच त्यांच्या घट्ट मैत्रीची सुरुवात झाली.

तशी मांजर पाळण्याची आमची हि पहिलीच वेळ होती. आम्हाला फारसा अनुभव नव्हता. त्यामुळे आम्ही सांता ला पहिल्या दिवशी आमच्या खालच्या फ्लोअर वरच्या टॉयलेट मध्ये बंद केले. शिवाय तो खूप ओरडत होता. त्यामुळे आम्हाला वाटले कि टॉयलेट मध्ये बंद ठेवले तर तो थोडा शांत होईल. शिवाय त्याचे लिटर बॉक्स देखील आम्ही त्याच टॉयलेट मध्ये स्थापित केले होते.

पण त्या रात्री सांता काही शांत झाला नाही. म्हणून मी त्याला आमच्या बेडरूम मध्ये घेऊन आलो. शिल्पाला (माझी पत्नी) ते काही आवडले नाही. म्हणून मी सांता ला घेऊन हॉल मध्ये सोफयावर झोपलो. सांता पूर्ण वेळ माझ्या छातीवर बसून झोपून राहिला. आम्हाला हे कळायला थोडा वेळ लागला कि सांता एकटा झोपू किंवा राहू शकत नाही, त्याला माणसे आपल्या आजूबाजूला हवी असतातच.

दुसऱ्या दिवशी आम्ही त्याचा बेड समृद्धीच्या रूम मध्ये लावला आणि ते दोघांना पण खूप आवडले. सांता नेहमी आपल्या बेडमध्ये बसून समृद्धीच्या हाताला आपला हात टेकवून ठेवून झोपायचा. मी त्याच्यासाठी त्याचे फूड आणि पाणी दररोज समृद्धी च्या रूम मध्ये घेऊन जात असे.

हळूहळू सांता ला वेळेची आणि सर्व गोष्टीच्या नियमितपणाची सवय लागली. नेमके ८.३० वाजले की त्याला माहित होते वर जायचे आणि गेल्यानंतर पहिले माझ्या बेडरूम मध्ये यायचे. माझ्यासोबत १५-२० मिनिटे झोपला की मग समृद्धीकडे जायचे आणि तिच्या बेड वर झोपायचे. सकाळी मी ४ वाजतो उठलो की पहिले समृद्धी च्या रूम चा दरवाजा उघडायचो. म्हणजे सांता माझ्याकडे यायचा आणि माझा मॉर्निंग नित्यक्रम एक टक लावून पाहत राहायचा. मी बाथरूम मध्ये शॉवर ला गेलो की तो पण यायचा आणि मी त्याला बारीक धार असलेला नळ सुरु करून द्यायचो. ते त्याला खूप आवडत असे. तो त्यातून आपले पाणी प्यायचा आणि पाणी पिणे झाले की बाथरूमच्या बाहेर माझी वाट बघायचा.

मग आम्ही दोघे खाली यायचो. मी माझे मॉर्निंग पेय आणि सांता साठी त्याचे ट्रीट घेऊन बाहेर बसायचो. ट्रीट खाऊन झाले की सांता एक फेर फटका मारून यायचा. त्याला मी किती वेळ बाहेर बसायचो याची कल्पना आली होती. त्यामुळे तो माझी घरात जायची वेळ व्हायच्या आत परत येत असे. मी कामाला जायच्या आधी त्याला पॅटीओ चे दार ओपन करून द्यायचो. मग सांता आपला तिकडे जाऊन झोपायचा.

घरातल्या प्रत्येकाची उठण्याची वेळ त्याला माहिती असल्यामुळे तो पहिले शिल्पा ला जाऊन उठवत असे आणि नंतर समु च्या बाजूला जाऊन तिच्या उठण्याची वाट पाहत असे. मी १० वाजता जेवणासाठी घरी परत यायचो, त्यावेळेस सांता पॅटीओ मधून यायचा आणि माझ्या बाजूला बसून मला कुर्वाळ असे सांगायचा. काही दिवसांनी त्याला एका पाण्याच्या बाटली मधून पाणी पिण्याची सवय लागली. त्यामुळे मी त्याला त्या बाटलीतून पाणी पाजायचो. हा आमचा दररोज चा नित्यक्रम ठरल्या प्रमाणे चालायचा.

घरी एखादा गेस्ट आला कि सांता लगेच त्यान्च्याकडे जाऊन विचारपूस करत असे आणि त्याना चाटले कि परत आपल्या ठिकाणी जाऊन बसत असे. लहान मुलांना सांता चा खूप लाड यायचा. ते त्याला सोडत नसत. पण सांता ला हे फारसे आवडत नसे. तो आपला त्यांना तसे ओरडून सांगत असे. पण मुलांना त्याचा फारसा फरक पडत नसे. शेवटी कंटाळून सांता आपल्या ठिकाणी परत जाऊन बसायचा.

समृद्धी आणि सांता एकमेकांचे घट्ट मित्र झाले होते. त्यामुळे आता सांताला आम्ही ऍडॉप्ट करण्याचे ठरवले कारण त्याला परत करणे आता शक्य नव्हते. एका वर्षा मध्ये आता सांता तगलपल्लेवार फॅमिली चा सदस्य बनला. काही दिवसांनी समृद्धी आपल्या पुढच्या शिक्षणासाठी लंडन ला गेली. मग सांता माझ्यासोबत झोपायला लागला. मी माझ्या पायाच्या दिशेने त्याचा बेड लावायचो आणि तो बरोबर ८.३० वाजता त्याच्या बेड वर झोपायला तयार असायचा. प्रत्येक वेळेस रात्री मी उठलो की माझ्याकडे बघायचा. माझी दररोज ची उठायची वेळ त्याला माहिती झाली होती. मी उठलो की तो पण बेड च्या खाली यायचा आणि मी माझा जो नित्यक्रम करायचो, ते तो पाहत राहत असे.

प्रत्येक वेळेस मी शॉपिंग वरून आल्यावर मी शॉपिंग बॅग्स गाडी मधून घरात आणायचो. सांता त्या वेळेस माझ्यासोबत गाडी पर्यंत यायचा आणि तिथून परत घरी यायचा. तो मला माझ्या बॅगस न्यायला काही मदत नाही करायचा पण उगीच माझ्या सोबत चालायचा कारण त्याला माहिती होते की मी शॉपिंग ला गेलो की त्याच्यासाठी त्याचे फूड घेऊन येतो. मी बॅग ठेवल्या की तो ते फूड बॅग्स मध्ये शोधायचा. शेवटी मी त्याला ते दिले की तो खाऊन निघून जायचा.

इंग्लंड हून घरी येताना समृद्धी अक्षरशा फक्त सांता साठी केमन ला यायची. येताना ती सांता साठी वेगवेगळे गिफ्ट घेऊन यायची. असे करत ३-४ वर्ष निघून गेलीत. आम्हाला गावी जायचे म्हटले की सांता ला हॉस्टेल मध्ये ठेवावे लागायचे. सांता ला ते अवघड जात असे पण त्याला दुसरा काही पर्याय नव्हता.

अचानक या वर्षी सांता चे वजन कमी होऊ लागले. शिवाय त्याच्या खाण्याची सवय पण कमी होऊ लागली. हळूहळू त्याची झोपण्याची वेळ कमी होऊ लागली. ऍक्टिव्हिटीज हि कमी होऊ लागल्या. त्यामुळे रात्री झोपताना त्याचा चीड चिडेपणा वाढला. आता आम्ही सांता ला बेडरूम मध्ये झोपू देऊ शकत नव्हतो म्हणून त्याला खाली हॉल मध्ये किंवा पॅटीओ मध्ये झोपावे लागत असे. सांता ला ते काही फार आवडायचे नाही. त्यामुळे तो रात्री आमच्या बेडरूम च्या दरवाज्याला येऊन नखाने स्क्रॅच करत असे जेणेकरून आम्ही जागे व्हावे आणि त्याला आतमध्ये घ्यावे आणि पुष्कळशा वेळेस तो त्यात यशस्वी हि व्हायचा.

या वर्षी समृद्धी उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी आली. जवळ पास १५ दिवस सांता आणि ती सोबत होती. मग जुलै महिन्यात आम्ही फॅमिली व्होकेशन साठी अमेरिकेत गेलो. त्यामुळे नेहमी प्रमाणे सांता ला हॉस्टेल मध्ये ठेवले. जाताना तो फारसे खात नव्हता म्हणून मी दोन तीन वेग वेगळे फूड घेऊन आलो. परत आल्यानंतर आम्ही सांता ला घरी घेऊन आलो. आता हि तो खात नव्हताच. पाणी तेवढे प्यायचा.

मागच्या तीन दिवसात घरी आणल्यानंतर त्याची तब्येत खूप खालावली म्हणून आम्ही त्याला डॉक्टर कडे घेऊन गेलो. डॉक्टर च्या रिपोर्ट्स मध्ये फारसे काही मिळाले नाही म्हणून घरी घेऊन आलो. पण त्या रात्री मात्र त्याला खूप विकनेस आला. मला कळले कि सांता चा शेवट जवळ आला आहे. त्याला जास्त त्रास होऊ नये म्हणून दुसऱ्या दिवशी पुन्हा डॉक्टर कडे घेऊन गेलो. आता मात्र सांता आपल्या पायावर उभा देखील राहू शकत नव्हता. त्याला सु किंवा शी साठी देखील जाता येत नव्हते. तो खूप अस्वस्थ होता. म्हणून आम्ही त्याला युथेनेशिया द्यायचा निर्णय घेतला. डॉक्टरना हि तेच योग्य वाटले. त्याप्रमाणे डॉक्टरनी त्याला इंजेकशन दिले. सांता ने शांतपणे आणि केविलवाण्या दृष्टीने सर्वाना एकवेळ बघितले. एक म्याव केला आणि शांत पणे १५ सेकंदात हॉस्पिटलच्या बेड वर आपला प्राण सोडला. (१९ जुलै २०२३)

आमचा सर्व परिवार दुःखी झाला. समृद्धी तर खूप रडली. त्यात मृत्यू बघण्याची तिची हि पहिलीच वेळ होती. सर्व जड अंतकरणाने घरी आलो.

आता आमच्याकडे राहिल्या आहेत त्या सांता च्या आठवणी आणि फोन मधले त्याचे खूप व्हीडिओ आणि फोटोज. मी सकाळी उठतो तेव्हापासून रात्री झोपे पर्यंत प्रत्येक काम करताना सांता च्या आठवणी येतात. परिवारा मध्ये माझ्या सोबत तो जास्त वेळ राहिला आणि त्याच्या सु शी पासून तर फूड पर्यंत मीच त्याची देखभाल करायचो त्यामुळे मला हि दोन दिवस खूप कठीण गेलेत.

सांता एक प्राणी होता. पण त्याने आम्हाला माणसापेक्षा प्रेम दिले. तो या परदेशात आमच्या परिवाराचा सदस्य झाला आणि त्याने आमच्या आयुष्यात सुखाचे चार दिवस आणले. शिवाय समृद्धी साठी त्याने तिचा एकटेपणा घालवायला जी मदत केली त्याबद्दल आम्ही त्याचे नेहमीच ऋणी राहू.

आमच्या परिवारा साठी “सांता” आपल्या नावाप्रमाणे एक खराखुरा “देवदूतच” होता.

संदीप तगलपल्लेवार

— लेखन : संदीप तगलपल्लेवार. केमन आयलंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. Article is very touching and emotional
    It is well written and described rthe elationship between human and animal very well .
    We really spent good time with Santa ..
    Thank you Devendra sir for publishing the story and feelings .

  2. Dr शिरसाठ तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे , प्राण्यासोबत राहिल्या नंतरच हे आपल्याला कळते , माणसाच्या आयुष्यात जशी रक्तांची नाते महत्वाची तसेच प्रेमाची देखील तितकीच महत्वाची असतात.

  3. एक प्राणीही सहवासाने कुटुंबाचा अविभाज्य भाग बनू शकतो हे यातून सिद्ध होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments