“लोकपालक” वर संसार.
आता जहाजाचं रुटीन अंगवळणी पडत होतं. सुरुवातीचे चार दिवस कपाटांची लावा लावी, केबिनची ठेव-रेव याच्यात गेले.
जहाजावरती अनेक कामं सतत सुरू असायची. मुकुंदना प्रचंड काम असायचं. ते दिवसभर इंजिन रूम मध्ये बिझी असायचे.
एक दंडवते म्हणून फिटर होता. तो मराठी होता. एकदा काही कामासाठी इंजिनरूम मधून केबिनमध्ये आला होता.मला मराठी बोलायला मिळालं याचं फार बरं वाटलं. जहाजाच्या वेळा, रुटीन याबद्दल बोलणं सुरू झालं. मला म्हणाला सकाळी सात वाजताच तांटू होतो.
तो गेल्यावर मी मुकुंदना विचारलं,”ही तांटू काय भानगड आहे? तांटू होतो म्हणजे काय होतं ?”
मुकुंद जोरदार हसले. म्हणाले “अगं, तो तांटू नव्हे. ते turn to आहे. म्हणजे सकाळी turn to work याच्या वेळेबद्दल तो बोलत होता. या turn to चं क्रू च्या बोलीभाषेत त्यांनी तांटू केलंय.
असे जहाजाच्या शब्दकोशातले नवे नवे शब्द शिकायला मिळत होते.
हरीचं अजूनी लग्न झालं नव्हतं.त्यामुळे एकटाच होता. मुकुंदांचा तर तो पहिल्यापासूनचा मित्र. त्यामुळे आमचं जेवण-खाण, बाहेर फिरायला जाणं, गप्पागोष्टी एकत्र चालत.
सुरुवातीला चार दिवस आम्ही खाली मेस मध्ये जाऊन जेवलो. नंतर मुकुंदनी आमच्या तिघांचं जेवण दुपारी आमच्या केबिनमध्येच आणायला सांगितलं.
दुपारी आणि रात्रीच्या जेवणाला त्यांनी हरीला एकट्याने खाली जाऊन जेवायचं नाही. आमच्या केबिनमध्येच ये असं आग्रहाने सांगितलं.
दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यांची आम्हा तिघांची अंगत पंगत आमच्या केबिनमध्ये सुरू झाली.

जहाजावरचं ते तेलात – बटर मध्ये न्हालेलं लसूण आलं मिरची, गरम मसाले असलेले जेवण सुरुवातीला चार दिवस बरं वाटलं. नंतर त्या उग्र मसाल्यांचा वास आणि चव नको वाटायला लागली. भाज्यांची आणि डाळींची नावं बदलली तरी चव एकच असायची.
केबिनमध्ये एक हॉट प्लेट – विजेची लहानशी शेगडीहोती. मग आपण एखादा पदार्थ बनवून बघावा असं वाटायला लागलं.
संन्याशाच्या लग्नाला शेंडी पासून तयारी लागते. इथे आमच्या स्वयंपाक घराला शेगडीची तेवढी तयारी होती. आता पुढची जुळवाजुळ करायची होती. मग संध्याकाळी विशाखापट्टणच्या बाजारात हिंडताना संसाराची पहिली खरेदी झाली ती…
एक छोटी सपाट बुडाची कढई, दोन लहान झाकण्या, दोन स्वयंपाकाचे चमचे, एक चिमटा ! थोडे कांदे बटाटे, गोड्या तेलाची बाटली हे पण घेतलं.
घरी म्हणजे केबिनमध्ये आल्यावर त्या नव्या भांड्यांना हळदी कुंकू लावून, त्यात थोडी साखर घालून, आई ठेवते तशी, कोरी भांडी देवासमोर ठेवली.
डे रूम मध्ये सगळ्यात खालचं शेल्फ भरपूर मोठं होतं. तिथे बरीच मोकळी जागा होती. तिथं चुलीची स्थापना झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी स्वयंपाकाचा पहिला प्रयोग जाहीर झाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ, कपडे धुणे इत्यादी झाल्यावर पाक सिद्धीला लागायचं ठरवलं. अचानक लक्षात आलं, अरेच्चा,याच्या जोडीला तिखट, मीठ, मसाले, फोडणीचे साहित्य लागणार आहे. आता काय करायचं ?
तेवढ्यात लिंबू सरबत प्यायला मुकुंद केबिनमध्ये आले. मी म्हटलं, “अहो, भाजी किंवा काही करायचं तर फोडणीचं सगळं साहित्य, तिखट, मीठ काहीच नाहीये. ते संध्याकाळी आणायला हवं.” मुकुंद म्हणाले, “अगं खाली गॅली मध्ये जा. मी चीफकुकला सांगतो. तुला लागेल ते थोडसं साहित्य वरती घेऊन ये.”
तेवढ्यात ज्यूस घेऊन स्टुअर्ड करवालो केबिनमध्ये आला. मग त्याच्याबरोबर मी खाली गॅली मध्ये गेले.
जहाजाच्या भटारखान्यात मी पहिल्यांदाच शिरत होते.
एक प्रचंड मोठा हॉल असावा तशी ती रूम होती. तिला चार मोठी दारं होती. त्याच्या बाहेर गॅलरी सारखी दिसणारी डेक आणि तिथून खाली दिसणारा बाहेर पसरलेला समुद्र.
मध्यभागी टेबल टेनिसचे खूप मोठे टेबल असावं तशी विजेच्या सपाट सहा भल्याथोरल्या शेगड्यांची मांडणी होती. तिला वरच्या चारही बाजूंनी अर्धा फूट उंचीचे, स्टीलच्या रॉड्सचे भक्कम कठडे होते. समुद्रात जहाज जोरात हलायला लागलं की स्वयंपाकाची ही शिजणारी भांडी शेगडीवरून घसरून खाली पडू नयेत म्हणून ही व्यवस्था असते.
त्यातल्या तीन भल्या मोठ्या चुलाणांवर सपाट तळाच्या अगडबंब पातेल्यात निरनिराळे पदार्थ शिजत होते. डाळ उकळत असलेल्या मोठ्या पातेल्यात चार-पाच फुटी लांब पळीने सेकंड कुक ढवळत होता.
त्या शिजणाऱ्या पदार्थांचा आणि मसाल्यांचा घमघमाट सुटला होता.उरलेली तीन चुलाणं मात्र शांत होती.
अशा स्वयंपाकघरात जेवणाची पंगत वाढायची तर जेवायला भीमा सारखी तब्येतदार मंडळीच हवीत. बकासुराला मारायला निघताना भीम गाडाभर अन्न घेऊन गेला, तेव्हा ते नक्की असंच शिजवलं असणार याची मला खात्रीच पटली.
भिंती लगत भाज्या, कांदा, मासे, मटन, चिकन कापण्यासाठी स्टीलची टेबल्स आणि त्याच्यावरती कटिंग बोर्ड होते. सुर्यांचे विविध प्रकार तिथे होते.
साधारण दोन किलोच्या प्लास्टिकच्या डब्यात रोजच्या वापरातले तिखट, मीठ, वेगवेगळे मसाले, आमसूलं, साखर, वगैरे पदार्थ वरच्या शेल्फ मध्ये मांडून ठेवले होते.
आपण घरी रोजच्या स्वयंपाकासाठी स्टीलच्या चोचवाल्या सहा सात इंची कावळ्यामध्ये गोडेतेल काढतो.
इथे रोजच्या वापरासाठी गोड्या तेलाचा मोठा सोळा किलोचा डबा होता.
एक मोठी गोणी भरून कणिक… जहाजाच्या भाषेत आटा, दुसऱ्या गोणीत तांदूळ होते. हात पुसण्यासाठी अनेक फडकी, टॉवेल लावून ठेवलेले होते.
जहाजाच्या अन्नपूर्णेच्या दरबाराचं हे मला झालेलं पहिलंच दर्शन खरोखरंच भव्य होतं.
या गॅलीला लागून जवळच एक स्टोअररूम म्हणजे कोठीची खोली होती. त्यात तेलाचे डबे, कणीक, मैद्याच्या आणि तांदुळाच्या गोण्या, साखरेचे पोतं,चहा-कॉफीच्या मोठमोठ्या प्लास्टिकच्या बरण्या, रवा, पोहे, साबुदाणा, यांची लहान पोती, शेंगदाणे, तांदुळाची पिठी, वडे अगर भजी करण्यासाठी बेसन, पापड, शेवया, काजू बदाम बेदाणे इत्यादी सर्व ड्रायफ्रूट्स, किसलेलं कोरडं खोबरं, अख्खे गरम मसाले, कंडेन्सड मिल्कचे अनेक डबे असे कित्येक पदार्थ होते.
त्याच्या पलीकडे कोल्ड रूम. ही संपूर्ण खोलीच फ्रिजर सारखी अतिशय थंड केलेली असते. त्यात फिशरुम, मटनरूम आणि व्हेजिटेबल रूम असे तीन भाग असतात. नॉनव्हेज पदार्थ ठेवलेल्या भागाचे तापमान कायम शून्य डिग्री पेक्षा कमी असतं. व्हेजिटेबल रूम मध्ये पाच-सहा डिग्रीज इतकं असतं.
व्हेजिटेबल रूम मधे क्रेट भरून मिरच्या, आलं, लिंबं, कडीपत्ता, अनेक फळभाज्या, कोबी फ्लॉवर यांचे ढीग, भोपळ्यांचे विविध प्रकार, काकडी, टोमॅटो, गाजरं, बीट यांनी भरलेले क्रेट्स, पालक-मेथीच्या कित्येक जुड्या,
अंडी भरलेले क्रेट्स, दुधाची हरीने एकावर एक मांडलेली कार्टन्स, अनेक प्रकारची फळं हे सारं ठेवलेले असतं. तिथल्या खास फ्रीजरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम आणि योगर्ट– दही याचे मोठे मोठे पॅक्स, तसेच छोटे कप्स फ्रिज भरून ठेवलेले असतात.
जहाजावर ऑफिसर्स व क्रू मिळून पन्नास एक मंडळी होती. त्यांची रोजची तीन मोठी जेवणं…. ब्रेकफास्ट लंच आणि डिनर, त्याच्या बाहेर सणा-समारंभासाठी बनवलं जाणारं खास जेवण. यासाठी एवढा मोठा शिधा जहाजावर कायम लागायचा.
जहाज किनाऱ्याजवळ असताना त्या त्या पोर्ट मध्ये जहाजावर आवश्यक ती शिधासामग्री भरून घेतली जाते. याला provision घेणं म्हणतात. Ship Chandler ही सर्व व्यवस्था करतो. कंपनीने असा शिप चॅन्डलर प्रत्येक बंदरात नेमलेला असतो. जहाजाला लागणारे अन्नधान्य,साबण, इतर आवश्यक ते सामान, स्पेअर पार्ट्स पुरविणे हे त्या व्यक्तीचे अगर कंपनीचे काम असते.
या वस्तू मागवण्याचे अधिकार कॅप्टन कडे व व्यवस्था चीफ स्टुअर्ड कडे असते. स्पेअर पार्ट्स चीफ इंजिनियरच्या अधिकारात असतात.
सर्व कुक्स आणि त्यांच्या मदतीला काम करणारे क्रू मेंबर्स यांची कामे पहाटे चारलाच सुरू होतात.
गॅलीच्या जवळ हँडलिंग रूम असते.ब्रेकफास्ट आणि लंच साठी लागणाऱ्या भाज्या, तसेच दुपारच्या जेवणात बनवले जाणारे फिश, चिकन, मटण कोल्ड रूम मधून पहाटे बाहेर काढून thaw करण्यासाठी या हॅण्डलिंग रूम मध्ये आणून ठेवलं जातं.
त्या दिवशीच्या ब्रेकफास्ट साठी कधी उप्पीट, अगर इडली किंवा डोसा, मेदुवडा यांची इन्स्टंट पिठं, कधी पोहे, यासाठीचं साहित्य.
मग दुपारच्या स्वयंपाकासाठी लागणारा सगळा शिधा तिथे काढून ठेवतात.
कांदे बटाटे लसुण हे हॅण्डलिंग रूम मध्येच असतात.
दुपारच्या जेवणानंतर अशीच तयारी रात्रीच्या जेवणासाठी केली जाते. यात डिनर साठी डेझर्ट म्हणून केक्स, पुडिंग, खिरी, शिरा असा एखादा पदार्थ बनवण्यासाठी लागणारे साहित्य ही काढले जाते. अनेकदा आइस्क्रीमही असतं. सबंध गॅलीचा प्रमुख चीफ कुक असतो.
हे सर्व कुक्स, स्टुअर्ड्स, साफसफाई करणारे कामगार, थोडक्यात क्रू मेंबर्स यांचा प्रमुख असतो त्याला *चीफ स्टुअर्ड* असं म्हणतात. तोही अनुभवी, बऱ्याच जहाजांवर काम केलेला असतो.
जहाजाच्या सर्व केबिन्सची व्यवस्था, त्यातील अंथरूणं पांघरूणं, उशा, पडदे, टॉवेल्स, तिथे असणारे ग्लास, डिशिस इत्यादी सर्व गोष्टींची व्यवस्था – थोडक्यात housekeeping – त्याच्या अखत्यारीत येते.
ही गॅली, म्हणजे स्वयंपाक घर हे फक्त ऑफिसर्स साठी होतं. क्रू मेंबर्स साठी गॅली, मेस हे संपूर्ण स्वतंत्र असतं. त्यांचा स्वयंपाकी असतो त्याला भंडारी म्हणतात.
(ही सर्व जेवणाची व्यवस्था 47 वर्षांपूर्वीची आहे. आता त्यात खूप बदल झालेले असतील. त्यावेळी केबिनमध्ये एखादा पदार्थ करायची परवानगी होती. अलीकडे जहाजांवर ती असत नाही असं समजलं)
इथेही चीफ कुक, सेकंड कुक अशी अधिकाऱ्यांची श्रेणी असते. त्यांना विशिष्ट परीक्षा देऊन त्या उत्तीर्ण झाल्यानंतर, ट्रेनिंग संपल्यानंतरच जहाजावर नोकरी मिळते.
मी गॅलीत गेले तेव्हा तिथे कुकच्या हाताखालचा एक मदतनीस 30 ते 40 कांदे सुरीने पटापट चिरत होता. तेवढ्यात चीफ कुक आला. तोही गोव्याचाच होता. नमस्ते मेमसाब, आपको जो चाहिये लीजिए म्हणाला.
स्टोअर रूम मधली ती अलीबाबाची गुहा पाहून, काय काय घ्यावं हा प्रश्नच होता. मी आपलं “थोडी मोहरी, जिरं, हळद, हिंग, लाल तिखट, मीठ साखर द्या” असं सांगितलं. सेकंड कुकनं प्लास्टिकच्या छोट्या छोट्या पिशव्यांच्यात सगळं प्रत्येकी दीड दोन वाट्या सामान भरलं.
एका पिशवीत थोडा कडीपत्ता, कोथिंबीर,आलं, मिरच्या हे ही दिलं. एक छोटा बटरचा पॅक दिला. एका पिशवीत जिरे-धन्याची पावडर, दुसऱ्या पिशवीत किसलेलं खोबरं दिलं. ते बघून, ये सब किस इसलिये ? असे मी विचारलं. त्यावर माझ्याकडे अत्यंत करुणेने बघत त्याने सांगितलं, “आप खाने मे कुछ बनाना चाहती हो ना ? तो ये सब लगेगा” मी तत्काळ त्याचं शिष्यत्व पत्करलं आणि नवी ज्ञानप्राप्ती झाल्याच्या आनंदात केबिन कडे निघाले. मागोमाग हा सगळा सरंजाम घेऊन करवालो पण केबिनमध्ये आला.
त्या सर्व पिशव्या एका प्लास्टिकच्या ताटलीत ठेवून शेगडी जवळ त्याचीही स्थापना झाली. माझी ती गडबड बघून करवालो हळूच हसत होता.
मग कांदे बटाट्याच्या काचऱ्या करायच्या ठरवल्या. मला घरी विळीवर चिरायची सवय होती. इथे सुरी वापरायला लागत होती. (अजूनही मला सुरीने भराभर चिरता येत नाही). चार बटाटे, दोन कांदे चिरायला बराच वेळ लागला. बरं त्यात साल काढायची सोलणी नव्हती. मग काय, बटाटे धुऊन सालासकट पातळ काचऱ्या केल्या आणि मग गणपती बाप्पा मोरया म्हणून, तुळजाभवानीचं स्मरण करून, शंकर प्राणवल्लभा असलेल्या सदापूर्णा अन्नपूर्णेचं स्मरण करून शेगडीला नमस्कार केला. आईने सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदाच शेगडी वापरायची होती म्हणून तिला हळदीकुंकवाची बोटं टेकवली.
अथातो ब्रह्म जिज्ञासा च्या धरतीवर अथातो स्वयंपाक जिज्ञासा म्हणत शेगडीवर कढई चढवली.
कांदा बटाट्याच्या काचऱ्यांची परतवून भाजी तयार झाली. जहाजावरच्या संसारातला पहिला पदार्थ तयार झाला.
अगदी चारीठाव स्वयंपाक केल्यासारखं मला हुश्श झालं. पण खूप आनंद झाला. काचेच्या एका छानशा बाऊलमध्ये ती भाजी काढली. वर किसलेलं खोबरं बारीक चिरून कोथिंबीर घालून सजवलं.
आपण काहीतरी फारच भारी केलं आहे असं वाटून गेलं. कारण माहेरी मला स्वयंपाक करण्याची वेळ कधीच आली नव्हती. एक-दोनदा कधीतरी पोहे केले होते, पण तो फक्त कौतुकाचाच विषय होता. सासरी पण भाज्या निवडून चिरून दे, खोबरं खवून दे, डाळ तांदूळ धुऊन ठेव, अशीच कामं माझ्याकडे होती. मला प्रत्यक्ष स्वयंपाक अजूनही करायला लागला नव्हता. आईप्रमाणेच माझ्या सासूबाई-वहिनी अन्नपूर्णा होत्या. हाताला उत्तम चव होती.
माझं कॉलेज सकाळचं असायचं. मी घरी येईपर्यंत आईचा सकाळचा स्वयंपाक होऊन बाबा जेवण करून शाळेला आणि प्रसन्नदादा, अतुल कॉलेजला गेलेले असायचे. आईच्या सकाळच्या ट्युशन्स आवरून जेवायची तयारी झालेली असायची. आम्ही दोघी एक वाजता जेवायचो. पण त्यानंतर अन्न झाकून ठेवणं, मागचं सगळं आवरून ओटा धुणं ही कामं मी करत होते. मग आईला खुर्चीवर बसवून ठेवायचं आणि गप्पा मारता मारता ही मागची आवरावर मी करायची.
आता भाजी झाली होती. मग पेपर नॅपकिन घेऊन शेगडी स्वच्छ पुसून वगैरे ठाकठीक केलं. प्रत्येक केबिनमध्ये फ्रीज असतो आणि रोज त्यात प्रत्येकासाठी फळं ठेवली जातात. मग फळं चिरून ती ही जेवणात ठेवली.
तोपर्यंत मुकुंद इंजिन रूम मधून आले. गरम जेवण घेऊन करवालो पण आला. मागोमाग हरी पण आला. आज कांदा बटाट्याच्या काचऱ्यांनी मज्जा आली. मला सुरीने पटापट चिरता येत नाही आपण विळी आणूया असा प्रस्ताव मी मांडला. तो हरी आणि मुकुंदांनी एक मुखाने मान्य केला.
त्या दिवशी संध्याकाळी विशाखापट्टणच्या बाजारात नारळ खवण्यासाठी खोवणी असलेली विळी, काकडी बटाट्याची सालं काढायला सोलणी उर्फ पीलर आणि हाता सरशी सपाट बूड असलेली दोन लहान पातेली, एक नॉनस्टिक तवा यांची पण खरेदी झाली. तसंच वांगी, एक नारळ, काकडी, टोमॅटो, मिरची, आलं, कोथिंबीर हे पण घेतलं. खरंतर हे सर्व जहाजावर होतंच.पण भाजी घ्यायची गृहिणीची हौस….. ! विशाखापट्टणम् मध्ये तर फुलांची रेलचेल. मग केसात माळायला आणि केबिन मधल्या मांडलेल्या देवांसाठी चमेलीचे आणि अबोलीचे टप्पोरे गजरे घेतले.
घरी आल्यावर हरी आणि मुकुंद डेकवर चक्कर टाकायला गेले. मी देवाला संध्याकाळची उदबत्ती लावून देवाच्या फोटोंना गजरे घातले. सगळी केबिन त्या गजर्यांच्या आणि उदबत्तीच्या वासाने दरवळून निघाली. माझी संध्याकाळची रामरक्षा वगैरे म्हणून झाली.
तोपर्यंत संध्याकाळचे साडेसात वाजून गेले होते. रात्रीचे जेवण केबिनमध्ये आलं. शिपवर रात्रीच्या जेवणात फक्त भात असायचा. हरी म्हणाला, ए मेमसाब फोडणीच्ये भात कर की त्याचं तामिळी ढंगाचं मराठी फारच गमतीशीर होतं.
महाराष्ट्रात प्रधानांच्या घरी हरीने फोडणीचा भात कधीतरी खाल्ला होता.
माझ्या मते तर महाराष्ट्रातल्या अनेक पक्वान्नातलं फोडणीचा भात हे पण एक पक्वान्नच आहे. माझा तर फार आवडता.
नव्या विळी वर पटापट कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर चिरून खमंग फोडणीचा भात तयार झाला. त्या दिवशीचं रात्रीचं जेवण म्हणजे एकदम बडाखानाच झाला.
जहाजावर सण किंवा पार्टी असेल तर काही विशेष पदार्थ केले जातात. त्यात बिर्याणी पण केली जायची. अशा खास जेवणाला शिपच्या भाषेत बडाखाना म्हणतात.
एरवी फोडणीचा भात घरी कित्येकदा केला जातो.पण इथे परक्या प्रांतात जहाजावर आपल्या चवीच्या पदार्थांची अपूर्वाई होती. त्यादिवशी तो भात अमृताहुनी गोड लागला.
क्रमशः

— लेखन : वेदवती कुलकर्णी. विलेपार्ले पूर्व, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
