इंग्लंड मधील बॉन्मर्थ येथे डोरसेट मराठी मंडळ यांच्या वतीने “साहित्याचा इंद्रधनु” हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. नोकरी निमित्त इंग्लंड मध्ये स्थायिक झालेल्या मराठी जनांनी एकत्र येऊन हे मंडळ स्थापन केले आहे.
प्रारंभी उपस्थितांतील जेष्ठ व्यक्तींच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने प्रारंभ झाला. नंतर भगिनींनी पसायदान म्हटले. रंगा किडांबी यांच्या गणेश वंदनेने वातावरण भक्तीमय होऊन गेले. यानंतर साहित्याचा इंद्रधनु कविसंमेलनाला सुरुवात झाली.

प्रेम, मैत्री, विरह, आठवणी, निसर्ग इ. भावभावनांची गुंफण करीत सुरेखा पाटील यांनी कविता पेश केल्या.
जेष्ठ उपस्थितांना जुन्या काळातील आठवणींत घेऊन जात दूरध्वनीविषयक दीर्घ तसेच सकारात्मक कवितांचेही वाचन त्यांनी केले. ज्योती तालमाकी, स्वाती कुलकर्णी विजेता यांनी विनोदी आणि वास्तवाचे चित्रण असलेल्या कविता वाचल्या. सायली सोलापूरकर यांनी प्रवासातून पाहिलेली दृश्ये चलतचित्राद्वारे कवितेतून मांडण्याचा परिणामकारक प्रयत्न केला. यामध्ये मायदेशातून सुहृदांनी पाठवलेल्या कवितांनी रंगत आणली.
शुभांगी प्रधान यांनी शाळेतील गंमतीतून लिहीलेली, मनी माऊ ही विनोदी कविता तसेच नोकरीत आलेल्या अनुभवांचे यथार्थ चित्रण करणारी बोन्साय कविता निवेदिका ऋचा रायकर हिने सादर करीत श्रोत्यांना निशब्द केले.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शांता शेळके, बालकवी यांच्या अनुक्रमे कविता सिया आक्रे, पार्थ देशमुख, कृत्तिका देशमुख यांनी तोंडपाठ म्हटल्यावर आपली मराठी भाषा जिवंत असल्याचे यावरुन सिद्ध झाले, असे मत ऋचा हिने व्यक्त केले.
या कार्यक्रमात गाणी संगीत यांची देखील रेलचेल होती. नारायणी काशीकर, रंगा किडांबी, अगस्त्य देशप्रभू यांनी गायन करुन व विक्रम चांदेकर यांनी गिटार वादन करुन रंगत आणली.
सहभागींना कवयित्री सुरेखा पाटील यांचे हस्ते रोपं देऊन सत्कार करण्यात आला.
मंडळाच्या कार्यकर्त्यां वृषाली हरिहर यांच्या हस्ते सुरेखा पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.
छायाचित्रणाचे काम अंकूर रायकर यांनी व सूत्रसंचालन ऋचा रायकर हिने खुमासदार शैलीत केले .
शेवटी आभारप्रदर्शन करताना श्री कुलकर्णी यांनी सलाम केला. संपूच नये असं वाटत असताना या कार्यक्रमाची सांगता झाली. सलग तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाला मराठी प्रेमींनी चांगली उपस्थिती दाखवली.

या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणीही पदाधिकारी नसून सर्वचजण कार्यकर्ते आहेत. जबाबदारी ओळखून एकदिलाने पडेल ते काम आनंदाने पार पाडतात. यापूर्वी हळदीकुंकू तसेच गुढीपाडवा सण साजरे केले गेले.
अल्पावधीतच मायभूमीतील मराठी प्रेमीनी एकत्र येऊन, डोरसेट मराठी मंडळ स्थापन करुन आनंद द्विगुणित करीत आहेत. त्याना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
– लेखन : टीम एनएसटी. ☎️ 9869484800

इंग्लंडमधील मराठीप्रेमींचा सुंदर उपक्रम.