आज २६ जुलै. कारगिल विजय दिवस. या निमित्ताने DRDO मधून वरिष्ठ शास्त्रज्ञ, गन एक्स्पर्ट म्हणून निवृत्त झालेले,
चार दशकांचा सैनिकी शस्त्रास्त्रे संशोधनात अनुभव असलेले श्री काशीनाथ देवधर यांनी जागविलेल्या स्फूर्तिदायी आठवणी…
कारगिल शहीद जवानांना विनम्र अभिवादन.
– संपादक
3 मे 1999 रोजी पाकिस्तान घुसखोर द्रास भागात असल्याचे भारतीय लष्कराला मेंढपाळांकडून समजले. पाच जणांचे गस्त पथक पाकिस्तान्यांनी बंदी बनवून नंतर त्यांची निर्घृण हत्या केली. सुमारे पाच हजार पाकी सैनिकांनी घुसखोरी करून द्रास-कारगिल-बटालिक येथील भारतीय चौक्या ताब्यात घेतल्या. लेह-श्रीनगर महामार्गावर ताबा मिळविणे सुरू केल्याचे लक्षात आले.
भारताचे तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आदेशानुसार भारतीय सैन्याने हवाई हल्ले केले. साठ दिवस आपले 26 अधिकारी, 23 जेसीओ व 473 अन्य सैनिकांचे बलिदान द्यावे लागले. प्रचंड प्रमाणावर म्हणजे दोन लाखांपेक्षा जास्त तोफगोळे, क्षेपणास्त्र व अग्निबाणांचा वर्षाव करण्यात आला. पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबावही निर्माण केला. त्या योगे पाकिस्तानला सपशेल माघार घ्यावी लागली.
आपल्या जितक्या चौक्या त्यांनी काबीज केल्या होत्या सर्वांवर भारतीय लष्कराने पुन्हा ताबा मिळविला. 26 जुलै 1999 रोजी संपूर्ण विजय प्राप्त करून तशी घोषणाही केली.
भारतीय सैनिकांचा अथक पराक्रम, धैर्य, बलिदान यांच्या प्रेरक घटना ऐकून भारतीय सशस्त्र सेनांचा प्रत्येक भारतीयास अभिमानच वाटतो. ग्रेनेडिअर योगेंद्रसिग यादव, शूर शिपाई संजयकुमार यांना परमवीर चक्राने तर लेफ्टनंट मनोजकुमार पाण्डेय, कॅप्टन विक्रम बात्रा, यांना मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले. तर अकरा जणांना महावीर चक्र प्रदान केले. तसेच सर्व सहभागी जवानांना ‘OP VIJAY MEDAL’ प्रदान केले गेले. तसेच OP सफेद सागर द्वारा घुसखोरांना हुसकावून लावले.
डीआरडीओचे तत्कालीन प्रमुख डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा एआरडीईचे संचालकांना 18 जून 1999 रोजी दुपारी दूरभाष (फोन) आला व 84 एमएम एलडब्लूएलच्या सद्यस्थितीबद्दल विचारणा केली. दोन शस्त्रे सिद्ध आहेत, मात्र त्याच्या केवळ प्राथमिक चाचण्याच झाल्या आहेत, अन्य सर्व चाचण्या, सर्व खडतर परिस्थितीतील चाचण्या व्हायच्या आहेत असे सांगितले. डॉ. कलाम म्हणाले, ‘शस्त्रे तयार आहेत ना..मग झालं तर, चाचण्या आता सरळ पाकिस्तान विरूद्धच घेऊ. शस्त्रे पाठवून द्या.’

मग आम्ही रविवार असूनही अक्षरक्षः 16 ते 18 तास काम करून दोन शस्त्रे (84 एमएम एलडब्लूएल) संपूर्णपणे काळजीपूर्वक जोडणी केली. त्याच्या गुणवत्ता व विश्वासार्हता चाचण्या पूर्ण करून, कागदपत्रांची पुर्तता करून मी स्वतः ती 21 जून 1999 च्या सायंकाळी विमानाने दिल्लीला घेऊन गेलो होतो. 22 जूनला शस्त्राची माहिती, प्रदर्शन, त्याबद्दलच्या शंकानिरसन, फायदे-तोटे व सुरक्षासंबंधी काय करावे, काय करू नये ही माहिती प्रथम डीआरडीओच्या मुख्यालयात मुख्य नियंत्रक श्री पी. यु. देशपांडे, नंतर डॉ. कलाम व त्यानंतर सेना मुख्यालयात तत्कालिन सेनाध्यक्ष जनरल व्ही. पी. मलिक व त्यांच्या आदेशानुसार उधमपूर येथे आर्मी कमांडर ले. ज. एच. एम. खन्ना (उत्तर कमांड) यांना दिली.

मला दोन्ही शस्त्रे घेऊन सेनेद्वारा हवाईमार्गे नेण्यात आले होते. उधमपूर येथे 3 डिव्हिजनमधील मेजर, ले. कर्नल, कर्नल, ब्रिगेडिअर या स्तराचे सात ते आठ अधिकारीही या शस्त्रांची माहिती देताना उपस्थित होते. त्या सर्वांचे शंकानिरसन करून ती दोन्ही शस्त्रे म्हणजे 84 एमएम एलडब्लूएल ही त्यांच्याकडे सुपूर्त केली. त्याचा प्रत्यक्ष उपयोग द्रास-कारगिलच्या युद्धात पाकिस्तानी सैनिकांविरूद्ध केला गेला.

शस्त्रावर जवान खूपच खूष होते असे आम्हाला कळविले होते. 84 एमएम आरएल एम-2 ही स्वीडनची शस्त्रे 1982 पासून भारतीय सैन्य वापरत होते. मात्र ती प्रणाली 26.5 किलोग्रॅम वजनाची होती. आम्ही कोणतीही क्षमता कमी होऊ न देता त्याचे वजन 13.5 ते 14 किलोग्रॅम केले होते. देशात प्रथमच कार्बन कंपोझिट तंत्रज्ञान तोफनळीसाठी विकसित केले होते. उच्च पर्वतीय युद्ध प्रणालीमध्ये जवळपास निम्मे वजन केल्यामुळे सैनिक सहजतेने ते हाताळू शकत. चार जास्तीचे तोफगोळे नेणे शक्य असल्याने त्यांची कार्यक्षमता व मारक क्षमतेत वाढ झाली. त्याचा चांगला उपयोग प्रत्यक्ष युद्धात पाकिस्तान विरोधात झाल्याने अप्रत्यक्षपणे युद्धात आपले योगदान दिल्याचा आनंद झाला.
भारताच्या या विजयानिमित्त समाजामध्ये सैन्याबद्दल आत्मविश्वास निर्माण व्हावा, तसेच सैनिकांनी त्यावेळी दाखविलेल्या शौर्याबद्दल, पराक्रम, त्याग व बलिदान याबद्दल, सशस्त्र सैन्यदलाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, हुतात्मा जवानांना श्रद्धांजली म्हणून, समाजामध्ये विजिगिषू वृत्ती वृद्धी व्हावी, जोपासावी यासाठी दरवर्षी 26 जुलै हा कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. या निमित्त सर्व भारतीयाद्वारे सशस्त्र सेनेस शत शत नमन….
“अंतरात मातृभूचि मूर्ती स्थापिली, शक्ती बुद्धी संपदा ही तिलाच अर्पिली
चित्त ही तिचे, तिचीच कीर्ती मान्यता”
“भारत माता की जय”
— लेखक : काशीनाथ देवधर.
निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ, गन एक्स्पर्ट. डि आर डि ओ
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
