संत कान्होपात्रा
लौकिकाचे बंध झुगारून, स्त्रीत्वाच्या पलीकडे जात ज्यांनी चैतन्यतत्त्वाचा शोध घेतला अशा संत कवयित्रींची परंपरा आपल्या संस्कृतीने जपली आहे. त्यांनी मूल्यांना नवे अर्थ दिले. प्रेम, पातिव्रत्य, निष्ठा, भक्ती यांचे संदर्भ त्यांनी अलौकिकाशी जोडले. मळलेल्या वाटा सोडून धैर्याने भगव्या वाटांवर पाऊल टाकणार्या त्या सार्या जणी थोर होत्या..
संत कवयित्री संत कान्होपात्रा यांची आज ओळख करून घेऊ या….
ईश्वराने निर्माण केलेल्या अनेक सुंदर रत्नांपैकी एक सुंदर रत्न ते म्हणजे संत कान्होपात्रा…
कान्होपात्रा या वारकरी संप्रदायातील पंधराव्या शतकातील एक प्रमुख संत कवयित्री ..महाराष्ट्राच्या संत परंपरेतील मांदियाळीमध्ये संत कान्होपात्रा या महत्त्वाच्या संत असून ‘”सकल संत गाथे’” मध्ये कान्होपात्रा यांचे तेहतीस अभंग आहेत..
इतर विठ्ठलभक्त स्त्रियांहून संत कान्होपात्रा यांच जीवन पूर्णत: भिन्न होतं. शामा नावाच्या अतिशय धनवान, रूपसंपन्न गणिकेच्या पोटी जन्मलेल्या कान्होपात्रा ऐषोआरामी आणि सुखोपभोगी वातावरणात वाढल्या.

त्या घरात विठ्ठलभक्तीची परंपरा असणं शक्यच नव्हतं पण गणिकेच्या रूढ अशा भोगविलासी मार्गाकडे न जाता त्या परमार्थ मार्गाकडे वळल्या..
संत कान्होपात्रा यांचा मुळातच ओढा परमार्थाकडे असल्याने त्यांच्या ध्यानी मनी विठ्ठल राहू लागला. मन त्याच्या चरणी एकाग्र होऊ लागले. त्याची भेट व्हावी म्हणून तळमळ होऊ लागली…त्या म्हणतात…
!! जिवाचे जिवलगे माझे
कृष्णाई कान्हाई
सावळे डोळसे करूणा
येथु देई काही !!
अशी आर्त विनवणी उमटू लागली… कालांतराने..
!! सर्व सुखाचे जे निजसुखाचे
सारगे माय
तो हा पंढरीराय विटेवरी !!
असा समाधानाचा शांतीचा भाव मनी उपजला… विठ्ठलाचे चरण हे आत्मसुखासमान असल्याने सर्व इच्छा, वासना त्यांच्या निमल्या..
!! योगिया माझी मुगुट मनी
त्रिंबक पहावा नयनी
माझी पुरवावी वासना
तू तो उद्धारच राणा !!
करुनिया गंगा स्नान घ्यावे ब्रह्मगिरीचे दर्शन
कान्होपात्रा म्हणे पंढरीराव
विठ्ठलचरणी मागे ठाव

कृष्णाचेच रूप असल्याने कान्होपात्रा यांनी विठ्ठलाची भक्ती केली. त्यांच जे भक्तीरसपूर्ण अभंग उपलब्ध आहेत त्यातल्या विठ्ठलभक्तीच्या आविष्काराने आपण दिपून जातो.
!! नको देवराया अंत आता पाहु
प्राण हा सर्वता जावू पाहे
हरिणीचे पाडस व्याघे्र धरियेले
मजलागी जाहले तैसे देवा !!
ही प्रसिध्द आणि सर्वश्रुत असलेली संत कान्होपात्रा यांची रचना.. या रचनेप्रमाणेच त्यांच्या अनेक स्वरचित रचना होत्या पण आज आपल्याला त्यांच्या फारच थोडया रचना ऐकावयाला मिळतात…
आपल्या उत्कट भक्तीने चराचर चैतन्याशी त्या जोडल्या गेल्या आणि अखेर त्या चैतन्याशी एकरूप झाल्या
बिदरच्या बादशहाने मागणी घातल्यानंतर देवाच्या पायी मस्तक ठेवून कान्होपात्रा गतप्राण झाल्या..
संत कान्होपात्रेच्या अपूर्व भक्तीने अखेर त्यांना सर्वातून मुक्ती मिळाली.
विठ्ठलाचे पाय न सोडता त्यांच्या चरणी सहज देहत्याग घडावा हे पराकोटीच्या भक्तीखेरीज अशक्य होतं… कुणी गुरू नाही. काही परंपरा नाही.. भक्तीचं वातावरण ही नाही.
अशा परिस्थितीत केवळ आपल्या भक्तीने ईश्वरप्राप्ती करून घेणारी संत कान्होपात्रा.. त्यांच्या भक्तीमुळे समाजही तिच्या पायाशी नतमस्तक झाला आणि तिला संतपद मिळालं म्हणूनच संत कान्होपात्रा अद्वितीय ठरते…
पंढरपुरात पांडुरंगाच्या मंदिरात एका कोप-यात संत कान्होपात्रा यांची समाधी आहे.. तेथे तरटीचे झाड आपोआप उगवले या झाडाच्या रूपात संत कान्होपात्रा यांना पाहिले जाते.. या झाडाचे दर्शन घेतल्याशिवाय पंढरीची वारी पूर्ण झाल्याचे समाधान मिळत नाही अशी वारक-यांची धारणा आहे.. या झाडाची पाने सेवन केली तर यात्रा पूर्ण होते अशी वारकरी आणि भाविकांची श्रद्धा आहे. तर काही भाविक या झाडाची पाने आपल्या संग्रही ठेवण्यासाठी घेऊन जातात…
संत कान्होपात्रा तरटी वृक्षाच्या रुपाने आजही जशीच्या तशी पांडुरंगाच्या मंदिरात काळ्या दगडावर उभी आहे.
पंढरपूर जवळील मंगळवेढा या गावात संत कान्होपात्रा यांची दुसरी मूर्ती आहे..

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
