Thursday, January 1, 2026
Homeलेखल्युटन मधील पाऊस

ल्युटन मधील पाऊस

ल्युटन हे इंग्लंडमधले बऱ्यापैकी मोठे टाऊन. तिथली बाजारपेठही मोठी. लोकांची भाषा, कपडे, दुकानांची नावे पाहून इथे दिल्लीतल्या एखाद्या रस्त्यावरून जात असल्याचे जाणवते.

इथे आशियाई लोक मोठ्या प्रमाणात रहातात असं कुणाकडून तरी कळाल्याने माझी शंका खरी ठरली.
एक दिवस मी, माझी पत्नी आणि मुलगी संध्याकाळी ल्युटनला गेलो.

नुकताच पाऊस पडून गेला होता. सायंकाळची सूर्याची किरणे गवतावर परावर्तित होऊन गवताची टोके सोनेरी झाली होती. या सोनेरी टोकांवर पावसाचे थेंब मोत्यासारखे फुलून आले होते. हिरव्याकंच पार्श्वभूमीवर मधूनच सोनेरी रंग एखाद्या भरजारी हिरव्या शालूवर काढलेल्या कशिद्यासारखा वाटत होता. रस्ता उंचसखल होता. दूरवरून एका खोलगट भागातून काही पक्षी उडत आले. जणू काय ते उगवत आहेत असं वाटत होतं.

कुत्रा पाळणे हा इथल्या लोकांचा आवडता छंद आहे. एकजण आपल्या कुत्र्याला मोकळ्या हवेत फिरायला घेऊन आला होता. दाढीमिशा असलेला असला कुत्रा मी पहिल्यांदाच पहात होतो.

परत पाऊस सुरू झाला.
मला काही दिवसांपूर्वीची एक घटना आठवली.
एक बाई आपल्या छोट्या बाळाला बाबागाडीत घेऊन एका बागेत आली होती. अचानक पाऊस सुरू झाला. ती बाबागाडी एका झाडाखाली घेऊन गेली. बाबागाडीच्या प्लॅस्टिकचं कव्हर बाळावर सगळ्या बाजूंनी टाकलं. आता बाळ भिजणार नव्हतं आणि पावसातच बाबागाडी घेऊन ती घराकडं चालली. ‘स्वतः भिजले तरी चालेल पण आपल्या मुलाला काही होऊ नये’ अशा प्रवृत्तीची एक आई मी इथे पहात होतो.

ल्युटनकडे, पावसाचा लपंडाव सुरूच होता. मात्र आम्ही छत्री नेली होती त्यामुळेच पाऊस पडत असला तरी हवेतील बोचरी थंडी सोडली तर आम्हाला इतर काहीच त्रास होत नव्हता. धावत पळत आम्ही ल्युटनची बस पकडली. मी पाहिलं, बसमधले बहुतेक जण आपापल्या मोबाईलमध्येच दंग होते. जे मोबाईल पहात नव्हते, ते शांतपणे झोपी गेले होते. बसबाहेरचा निसर्ग क्षणाक्षणाला बदलत होता. पाऊस पडत असूनही कुठेही चिखल किंवा घाण दिसत नव्हती. खिडकीतून सतत बदलत्या निसर्गाचे रंग मी पहात होतो. विजेचे खांब ढगांतून उगवल्यासारखे दिसत होते. पण स्थानिक लोकांना यात काही नवीन नसावे.

ल्युटनला जाऊन खरेदी झाल्यावर तिथल्या एका आशियाई हाॅटेलात जेवण करायला गेलो. या साफसूफ हाॅटेलात विविध टेबलांच्या बाजूला अनेकजण बसून हसत खिदळत होते. त्यात काही जोडपी होती, काही कुटुंबं तर काही मित्रमंडळींचे थवे.
‘खा, प्या, मजा करा’ अशा प्रवृत्तीने खाण्यापिण्यात सगळे मग्न होते. लहान मुलं इकडून तिकडे आनंदात फिरत होती. मोबाईलवरून फोटो आणि सेल्फी काढली जात होती.

इंग्लंडमध्ये एक बाब मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे हाॅटेलांतून बहुतेक ठिकाणी महिला वेटर असतात.
“कशासाठी पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी :”
एक आठवण आली.
काही दिवसांपूर्वी आम्ही लंडनच्या हाॅटेलात गेलो होतो. आमच्या पलीकडच्या टेबलावर एक तरूण जोडपं मराठीतून बोलत होते. उत्सुकता म्हणून आम्ही चौकशी केली. ते मुळात पुण्याचे होते. एका हॉस्पिटल मध्ये ते नर्स म्हणून काम करत होते. हेक्टिक शेड्युलमधून वेळ काढून महिन्यातून एक दिवस लंडनला येतात. महिनाभरचा शीण घालवतात.

ल्युटन मध्ये खाणं झाल्यावर आम्ही बाहेर पडलो. पाऊस जोरात पडत होता. वाराही जोराने वहात होता. तशात जवळ खरेदी केलेल्या बऱ्याच वस्तूही होत्या. तशा पावसात बसस्टॉप पर्यंत जाणेही अवघड होतं. सगळं सामान भिजलं असतं. कारनं घरी परतायचा निर्णय घेतला. काही वेळात ऑनलाईन कार आली. मात्र तिथपर्यंत जातानाही भिजलो. कारने जाताना खिडकीतून बाहेर पहात होतो. मात्र लाईटच्या प्रकाशाव्यतिरिक्त काहीच दिसत नव्हतं. कारच्या खिडकीवर पाऊस आपटत होता.
असा हा ल्युटन चा पाऊस मनात कायमचा राहणार होता…

सतीश शिरसाट

— लेखन : प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ. ह.मु.इंग्लंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”