‘महाराष्ट्र टाईम्स’ चे गोविंदराव तळवलकर हे किती ज्ञानी संपादक होते; याचा एक प्रसंग अशोक जैन याने त्याच्या ‘राजधानीतून’ या पुस्तकात नोंदवला आहे॰
इंदिरा गांधी यांचे निधन झाले; आणि त्यांची अंत्ययात्रा निघाली होती॰ त्यांचे सर्व विधी पूर्ण झाल्यावर अशोक जैन उद्याच्या ‘म॰ टा॰’ ला पाठवण्याच्या मजकुराची जुळवाजुळव करू लागला॰ इतक्यात त्यांना तळवलकरांचा फोन आला की त्यांच्या अंत्ययात्रेत लष्करी बॅंड जी धून वाजवत होता ती हँडेल या संगीतकाराची होती काय ?
आता जैन खरं तर मजकूर जुळवून पाठवण्याच्या गडबडीत होता; पण संपादकांचे काम टाळता येणे शक्य नव्हते॰ त्यानं लष्कराच्या वाद्यपथकाच्या प्रमुखाचा फोन शोधून त्याला हा प्रश्न विचारला॰
तो उडालाच !
पण ती धून हँडेलचीच होती॰ जैन यानं तसं तळवलकर यांना कळवले॰
दुसर्या दिवशीच्या अग्रलेखात तळवलकरांनी या गोष्टीचा फार मार्मिक उपयोग केला होता॰
नंतर काही वर्षानी अशोक जैन पॅरिसला गेला॰ तेथे एका संगीताच्या म्युजियममध्ये त्याला संगीतकार हँडेलचा पुतळा दिसला आणि त्याला या प्रसंगाची आठवण झाली॰
मला नव्वदच्या दशकात फूटपाथवर Harriet Martineau ( 1802 – 1876 ) या नंतर बहिर्या झालेल्या पत्रकार बाईच्या आत्मचरित्राचा पहिला भाग स्वस्तात मिळाला॰ तो मी जैनचे ‘ राजधानीतून ‘ पुस्तक वाचल्यावर वाचला॰ ही बाई तरुण वयात पियानो शिकत होती॰ तिला त्यावेळेस पियानोवर ज्या संगीत रचना शिकवल्या गेल्या त्या सर्व रचना हँडेल या संगीतकाराच्याच होत्या ! मी तसे जैन याला कळवले॰
तो खूष झाला !
प्रकाश संत हा पुण्याला महाविद्यालयात शिकायला असतांना त्याच्या मावशीकडे म्हणजे कमलाबाई फडक्यांकडे रहात असे॰ कवयित्री इंदिरा संत आणि प्रा. ना. सी. फडक्यांच्या द्वितीय पत्नी कमलाबाई या सख्ख्या भगिनी. त्या कोल्हापूरला महाविद्यालयात शिकत असताना फडके आणि ते प्रेमात पडले.
प्रा. फडके उच्च शिक्षित आणि सुवर्ण पदक विजेते. त्या मानाने फडक्यांच्या प्रथम पत्नी मनोरमाबाई या कमी शिकलेल्या; आणि बौद्धिक बाबतीत तर त्या फडक्यांच्या जवळपास ही न पोचू शकणाऱ्या ! साहजिकच, ते बुद्धिमान, लेखनाचं अंग असणाऱ्या, देखण्या कमल दीक्षित यांच्या ते प्रेमात पडले. त्या काळात द्विभार्या प्रतिबंधक कायदा नसल्यामुळे फडक्यांनी कमल दीक्षित यांच्याशी दुसरे लग्न केलं !
हे लग्न बौद्धिक भूक भागवण्यासाठी केलं आहे, असं फडके म्हणत असत. जरी दुसरं लग्न ही गोष्ट कायदेशीर होती, तरी महाराष्ट्रात या घटनेनं प्रचंड गदारोळ उठला ! फडक्यांचे विद्यार्थी मित्र आणि चळवळ्या नी. गो. पंडितरावांनी तर त्यावेळेस कोल्हापूरला फडक्यांच्या निषेधार्थ एक मोर्चाही आयोजित केला होता !
सुप्रसिद्ध कथा लेखक श्री. ज. जोशी यांनी बहुतेक सर्व कथा मध्यम वर्गीयांच्या जीवनावरच लिहिल्या. इतकंच नव्हे, तर त्यांनी अन्य लेखनही केलं ते पुणे आणि त्यातील मध्यम वर्गीय जीवनावर. श्री. ज. जोशी 1972 — 73 च्या सुमारास मुंबईच्या ‘ महाराष्ट्र टाईम्स ‘ मध्ये / मी पुण्याहून श्री. ज. जोशी लिहितो की ‘ या शीर्षकाचं पुण्यावर एक सदर लिहित असत. त्याचेच त्यांनी पुढे ‘ पुणेरी ‘ हे पुस्तक केलं.
त्यात त्यांनी लिहिलं आहे की, 1930 च्या दशकापासून पुण्याच्या मध्यमवर्गीयांत म्याट्रिक अथवा महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्यांची संख्या वाढू लागली. त्यामानानं मुली फारशा शिकत नव्हत्या. फारच थोड्यांची अक्षर ओळख झालेली असे. काही जणी प्राथमिक शिक्षण घेतलेल्या असत. माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या मुली तर जवळ जवळ नव्हत्याच.
त्यामुळे या सुशिक्षित आणि वाचन असलेल्या पुरुषांच्या या कमी शिकलेल्या बायका बौद्धिक बाबतीत जवळ जवळ शून्य असत; त्याचं अशा पुरुषांना खूपच वैषम्य वाटत असे; त्यांची या बाबतीत कुचंबणा होत असे.
1920 च्या दशकात आलेल्या प्रा. फडके यांच्या ‘ दौलत ‘ कादंबरीपासून फडक्यांनी तरुण तरूणींचं भावजीवन कसं असायला हवं, याचं चित्र रेखाटायला सुरवात केली. ते या बौद्धिक उपासमार होत असलेल्या तरुणांना खूप म्हणजे खूपच आवडत असे. फडक्यांच्या कादंबऱ्या तुफान लोकप्रिय का झाल्या, याचं हे प्रमुख करण आहे !
हरिभाऊ आपटे आणि काशीबाई कानिटकर, ना. सी. फडके, न्यायमूर्ती रानडे यांच्या बौद्धिक क्षमता असलेल्या पत्नीबद्दल ऐकलं किंवा वाचलं की, कित्येक पुरुषांना आपली बायको अशी शिक्षित असावी, अथवा अशी बौद्धिक भूक भागवणारी एखादी मैत्रीण असावी; असं वाटत असे. असं श्री. ज. जोशी यांनी लिहून ठेवलं आहे.
नंतर 1950 च्या दशकापासून तथाकथित उच्च आणि खालच्या जातींतील मुली सर्रास शिकू लागल्या. त्या पदवीधरही होऊ लागल्या. हळूहळू त्या वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि अन्य तांत्रिक शाखांतील पदवी / पदाव्युत्तर शिक्षण घेऊन पुरुषांच्या बरोबरीनं अथवा जास्त शिक्षण घेऊ लागल्या !
आता मुली / स्त्रिया या कुठल्याही बाबतीत पुरुषांपेक्षा मागे नाहीत, उलट त्या किती तरी पुढे निघून गेल्या आहेत; असंच दिसून येतं !
जाता जाता :
नंतर 1950 च्या दशकाच्या अखेरीस इंग्लिश भाषेचे नामवंत प्राध्यापक मं. वि. राजाध्यक्ष यांनीही त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनीच लहान असलेल्या विजया आपटे या त्यांच्या विद्यार्थिनीशी प्रेमलग्न केलं !
… आणि ते ही कोल्हापुरातच !
या कोल्हापूरच्या मातीचा हा कोणता गुणधर्म आहे !
याच विजया आपटे नंतर नामवंत समीक्षिका आणि लेखिका विजया राजाध्यक्ष झाल्या !
गम्मत :
प्रा॰ ना॰ सी॰ फडक्यांची एक स्मरणीय आणि फारशी माहिती नसलेली आठवण !
प्रा॰ फडक्यांना असे कळले होते की आफ्रिकेत एक माकडाची जात आहे ती वय वाढले तरी उंचीने वाढत नाही॰ जन्मत:च जी उंची असते तीच कायम रहाते॰ त्यांना ते माकड पाळण्याची खूप इच्छा होती ! ( काय एकेकाच्या इच्छा ! )
त्यांनी त्या जातीचे माकड मिळवण्याचे खूप प्रयत्न केले; आणि अखेरीस त्यांना त्या जातीच्या माकडाचे पिल्लू मिळाले॰ त्यांनी आनंदाने ते घरी पाळण्यासाठी आणले॰
पण कसचे काय; आणि कसचे काय !
त्या माकडाची उंची वाढूच लागली !
प्रा. फडके निराश झाले; आणि हे माकड ‘ पेशवे पार्क ‘ येथे भेट द्यावे की काय, असा विचार करू लागले. मात्र, तो पर्यन्त त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्या माकडाचा लळा लागला आणि ते माकड काही त्यांना टाकवेना !
त्यांच्या ‘ दौलत ‘ बंगल्याबाहेर मोकळे आंगण होते; आणि त्यात एक झोपाळा होता॰ त्यावर फडके आणि त्यांचे कुटुंबीय बर्याच वेळा बसून आनंद घेत॰ हे माकड पण तेथे बागडत असे॰
तो पर्यन्त आसपासच्या लोकांना तर फडक्यांनी असे माकड पाळले आहे हे कळलेच होते.
पण एक दिवस फडके दुपारी त्या झोपाळ्यावर एकटेच बसले असतांना एक रिक्शा तेथे थांबली, आणि तो रिक्षावाला आतल्या गिर्हाईकाला म्हणाला, ‘ हा त्या माकडवाल्या फडक्यांचा बंगला; आता तुम्हाला कुठे जायचे आहे ते सांगा ? ‘
प्रा. फडके त्याचे ते उद्गार ऐकून सर्दच झाले !
म्हणजे लेखक, प्राध्यापक, कादंबरीकार, संगीताचे जाणकार, रसिक, टीकाकार अशी फडक्यांची 60 वर्षांची ओळख पुसली जाऊन आता ते ‘ माकडवाले फडके ‘ म्हणून प्रसिद्ध झाले होते !
काय वाटले असेल प्रा॰ फडक्यांना !

— लेखन : प्रकाश चान्दे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
