“ए आई आज कंटाळा आलाय हं पोळी भाजी नको. मला खूप भूक लागलीय, मी वडा पाव घेऊन येतो.” पावसाळ्यातला दिवस, स्थळ भारत. “ए आई तेच ते काय ग ? मी स्विगीवरनं ॲार्डर देतोय.” असाच कंटाळ्याचा दिवस. स्थळ भारत.
“ए आई लेटस् ॲार्डर पिझा टूडे, ॲार विचविच सॅण्डविच ॲार समथिंग फ्रॅाम पनेरा.“ स्थळ अमेरिका.
“ओके नो वरीज .. ॲानलाईन ॲार्डर कर, पेमेंटचा ॲाप्शन आला की दे मला.”
हे असे संवाद आजकाल घराघरात चालू असतात. आपल्याही नकळत आपण या सगळ्यावर किती अवलंबून राहतोय ?
एखाद्या पुस्तकाची आठवण झाली की लगेच शोध गुगलवर. सहज बोलता बोलता एखाद्या स्थळाची आठवण झाली की आपण लगेच ते त्या त्या क्षणी ॲानलाईन बघण्याची धडपड करतो. एखादं गाणं ऐकण्याची अनिवार इच्छा झाली की लगेच सर्च ॲंड लिसन.
कधीतरी एखाद्या पर्यटन स्थळाचा विषय निघतो. आमच्यासारख्या परदेशात राहणाऱ्या पालकांना आपल्या मुलांना आपण घेतलेला सगळा अनुभव द्यायचा असतो आणि तो देखिल १८ वर्षांच्या आत कारण एवढच की एकदा का मुलं कॅालेजसाठी बाहेर पडली की ती सापडणं कठीण ! कधी लहानपणी पाहिलेल्या जागेची आठवण येते. किंवा खूप वर्षांपासून एखादं पर्यटन स्थळ पहायचं असतं मग लगेच आपण व्हिसा द एक्सप्लोरर सारखा व्लॅाग शोधतो.
हे सारे नव्या काळानुसार होणारे बदल आहेत हे अगदी मान्य. पण यामधे एक गोष्ट घडते ती लक्षात घेणं गरजेचं आहे. आपलं ना अल्लादिनच्या जीनीसारखं झालय.
मनात यायचा अवकाश की हुकूम मेरे आका म्हणत गुगल बाबा आपल्या मदतीला येतो. अनेक लोकं स्वतः फिर फिर फिरतात आणि लोकांना आपण काय काय कुठे कसं गेलो ते कॅमेराबद्ध करून सांगत राहतात. काही दिवस असे कार्यक्रम आवडीने पाहिले जातात मग तोच तो पणा येतो.
या सगळ्यात आपण कोणाचा तरी अनुभव सुटसुटीत करून आपल्यासमोर आणलेला फक्त पहात असतो.
त्यातला माणूस सांगत असतो काय सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे, सुंदर वारा येतोय वगैरे. यातलं काहीच आपल्याला अनुभवायला मिळत नाही तरीही आपण पाहतो मात्र नक्की. एखाद्या गोष्टीचा विरह, की हुरहूर, मग ती मिळाल्यानंतरचा सुखानंद आपण एका क्षणात पुसून टाकतो.
एखाद्या ठिकाणाची आठवण झाली की वेगवेगळ्या लोकांशी बोलून, पुस्तकां मध्ये शोधून काही करण्याचे दिवस म्हणजे, तो जमाना गेला राधे असे जाहिरातीतल्यासारखे म्हणावे लागेल. असो ..
तर मुद्दा असा आहे की एखाद्या गोष्टीसाठी क्षणभरही थांबवेना झालय, कारण हाताशी इतक्या गोष्टी आहेत. यातून आपण फक्त पहात राहतो, कृती फार लांबच राहते.
यातच नको ते इतकं समोर येतं की मुळात काय शोधत होतो ते विसरायला व्हावं !
या साऱ्या “पी हळद हो गोरी” सारख्या कृतींमुळे आपल्यातला संयम संपुष्टातच येतोय की काय ?
ही गोष्ट सर्व स्तरात झिरपू लागते. साधी पोळी करणं घ्या.
गहू आणा, निवडा, दळण करा, कणिक भिजवा, लाटा, भाजा, तेल लावा …. ही भली मोठी यादी आहे. पण पोळी खायची मनात आली आणि घाई आहे (?) कसली कुणास ठाऊक ? लगेच विकत आणणे हा पर्याय होतो.
हे साधं उदाहरण आहे. पण मनात आलं की केलं, त्याला कोणताही विधीनिषेध राहिलेला नाही. याला कोण आणि कसे जबाबदार हे निरिक्षण करून ठरवावे लागेल. प्रत्येकाला स्वतःला पारखून पहावे लागेल. हे नेमके कधी सुरू झाले ? हे ही स्वतःलाच पडताळून पहावे लागेल.
यातून आपण कुठेतरी हे थांबवू शकतो का ? नाही थांबवले तर असे काय नुकसान होणार आहे ? हे आणखीही प्रश्न हाताळण्याची गरज आहे. नवीन पिढीला सहसा असंयमी, उतावीळ असं म्हटलं जातं. तर आता हे सर्वच लोकांना लागू होतय का ? कदाचित् मागच्या पिढ्यांच्या हातात अल्लादिनचा छोटासा दिवा नव्हता, इलाज नव्हता म्हणून ते अधिक शांत, कष्ट करणारे झाले असतील का ?
ही जी आज, आत्ता, ताबडतोब ची निकड निर्माण झाली आहे वा केली आहे, याचा विचार करणं गरजेच आहे.
आपण मारे प्रायॅारीटी चार्ट प्रमाणे कामे वेगवेगळ्या रकान्यांत भरायला शिकतो पण खरी निकड ठरवताच येत नसेल तर काय ? सारेच आत्ताच घडायला हवे. नाही घडले तर जगबूडीच आलीय अशी अस्वस्थता. यामधे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट अनुभवण्याचा प्रवासच सिमित होतोय. अनुभवाचा प्रवास सिमित म्हणून त्या अनुभवांतून येणारं शहाणपण लिमिटेड. आज जिथून माहिती मिळाली तो सोर्स उद्या असेलच याची खात्री नाही.
पुरेसा अनुभव नसल्याने स्वतःच्या खात्यात काही विशेष जमा नाही आणि सर्वांच्या मुळाशी असलेला वेग आणि विनाकारण दिलेली प्रायॅारीटी ! हे असे वर्तुळ आहे.
एखादा माणूस पारंपारीक पद्धतीने शोधन, मनन, चिंतन करत असेल तर त्याला मागासलेला ठरवून मोकळे होतात पण कदाचित् अशाच लोकांमुळे समतोल शिल्लक असावा. याचा अर्थ आपण बदलायचेच नाही का ? असेही कोणी विचारेल. पण तसे मुळीच नाही. कुठे आणि कसे बदलायचे, कोणत्या गोष्टीची आपणास खरेच निकड आहे ? ह्या मर्यादा प्रत्येकांने निश्चित केल्या तर वहावत जाणं थांबेल आणि कदाचित् थोडा तरी संयम आपल्या शिलकीत पडेल.
अचानक पणे समोर आलेली एखादी गोष्ट आपल्याला नवी वाटेल, ती आधीच चोथा होऊन पाहून मग समोर आली तर आपण जसे उदासिन होतो तसे होणार नाही. अजुनही काहीतरी शोधण्याची उर्मी मनात शिल्लक राहील.
मनातली निरागसता कुठे तरी एका कोपऱ्यात का होईना जागी राहील यात झालं तर समाजाचं भलच होईल.
तेव्हा कोणतीही इन्सटंट गोष्ट करताना थोडा श्वास घ्या, थांबा, विचार करा आणि मगच निर्णय घ्या. एखादी आनंददयी अनुभव सफर कदाचित तुमची वाट पहात असेल.

— लेखन : शिल्पा कुलकर्णी. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
वाचून लक्षात येते छान माहिती
Mast Shilpa! So relatable 👌🏻
Keep writing! ❤️
खुप छान लिहीलेले आहेस शिल्पा! आजच्याजीवनामध्ये (constant distraction from social media life) Mindfulness च्या practice ची खुप गरज आहे. Being present in the moment याची आठवण आपल्या मनाला करुन द्यावी लागते