वेळा अशी ही सावळसुंदर
होते दिन निशेमधील दुवा
रंगांचा अद्भुत चालतो खेळ
वाटे मोहक अन हवाहवा
प्रसन्न ज्योती समईतली
धुपाचा दरवळ मंद मंद
स्तोत्रांच्या गंभीर स्वरांनी
पसरे गृहात चैतन्य आनंद
येण्याची परतून स्वसदनी
पावलांना रोज आस नवी
अन मनामनात उमेद जागी
मिळो संधी उद्या एक नवी
छाया भासती गडद जराशा
तमात सोबत त्याच करिती
कातरवेळा मना भिवविता
सोबतीचे हात आठविती
संधिकाल आयुष्याचाही
असाच असो नितांत सुंदर
आस लागे जीवनास ज्याची
संधिकाली भेटावा योगेश्वर

— रचना : सौ.वैदेही कुलकर्णी. कराड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800