देशात या वर्षाच्या सुरुवातीला कोरोना विरुद्ध दोन लसी उपलब्ध झाल्या. माझा स्वतःचा असा एक मराठमोळा अंदाज होता की मला नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत लस मिळेल. कधीही मिळो काहीही घाई नाही असा मला ठाम विश्वास होता.
कारण माझे सोशल लाइफ सध्या दिल्लीत असूनही नव्हते आणि गड्या आपला गाव बरा या वृत्तीने अजूनही मी दिल्ली अनुभवू शकलो नव्हतो. त्यामुळे माझी रूम, माझे विश्व या न्यायाने मी वर्क फ्रॉम होम करत जगत होतो.
फेब्रुवारी, मार्च नंतर लस, लसीकरण, यातील समज गैरसमज याचीच चर्चा होवू लागली. आता नेमके करावे काय ? हे मला समजेना. आधीच आषाढ त्यात फाल्गुन मास ! नेमकी लस कोणती घ्यावी याची पण शंका मनात होती.
गूगल देवळात फिरलो तेव्हा काही उत्तरं मिळाली पण त्यावर विश्वास ठेवून पुढे जाणारा मी ध्येयवादी बंडू नव्हतो. “बाबा वाक्य प्रमाण” या तत्त्वाचा अंगीकार आजपर्यंत केला होता पण वेळ आता स्व निर्णय घ्यायची होती.
आठवलेल्या एका डॉक्टर मित्राला फोन केला तर तोच कोरोना सेवा देवून दमला होता. घरी पण वेळ देता येत नाही म्हणत तो त्याची कहाणी, मी किती दमलो हेच सांगू लागला. अरेरे, अच्छा अच्छा, होईल होईल नीट असे मीच त्याला धीर देत फोन ठेवला .
म्हटले जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा पाहू आणि तो परीक्षेचा क्षण दिल्लीत एका उंच सरकारी इमारतीमध्ये काम करत असल्याने आणि काम माध्यम वर्गाशी निगडित अगदी दररोजच असल्याने आता तुम्ही लस घ्या त्यासाठी इथे नोंदणी करा असा संदेश ऑफिसच्या व्हाट्सएप ग्रुपवर आला. आता करायचे काय ?
सकारात्मक विचार कमी आणि नकारात्मक विचार, विचारांवर परिणाम करत असल्याने नकोच ते
लसीकरण अशी माझी मनस्थिती होती.
मला शेवटी देवा तुला शोधू कुठे म्हणत ? आठवला माझा अनुभवी, हुशार, मनमोकळा नाशिकचा मित्र. लगेच मेसेज, आता करू तरी काय मित्रा ? लगेच उत्तर आले बिल्कुल घाबरू नको. पटकन करून घे. दोन्ही लसी चांगल्या आहेत. कोणतीही घे. काही प्रॅाब्लेम नाही.
चला हा म्हणतोय ना म्हणजे घ्यायलाच हवे.
विश्वासाने मी कालनिर्णय मध्ये आधी शुभ दिवस कोणता ते पाहिले. मग त्या दिवशी सुट्टी आहे का मला ? याची चौकशी केली आणि मग नाष्टा झाल्यावर सकाळी ११ वाजताची वेळ बूक केली.
खोलीतील प्रथम लसीकरण घेणारी व्यक्ती असल्याने पोटभर खावून जा, रात्री पण पोटभर जेव, जाताना फ्रूट ज्यूस, कोरडा नाष्टा, पार्ले बिस्किटे सोबत ने, तुझे कपडे धुऊन टाक, दोन दिवस हात दुखेल लस घेतल्यावर…. असे एकेकाचे सगळे ऐकून, मी धुण्याचे काही कपडे आधीच धुतले. थोडे खायला अजून सामान आणले. आणि उगाच कोणाची नजर नको लागायला म्हणुन फक्त माझ्याच घरी, मी लसीकरण करत आहे हे सांगितले.
सकाळी भरपूर नाष्टा करुन देवाला काही विपरीत करु नकोस अशी प्रार्थना करून लसीकरणसाठी जाताना दरवेळी दिल्ली सरकारी बस वापरणारा मी, खास ओला गाडी बूक करून गेलो. उगाच या वेळेत कुठे कोरोना भेटू नये ही भीती सारखी वाटत होती.
ल्युटीयन दिल्ली मधील रायसीना रोडवरील एका मोठ्या सरकारी कार्यालयात आम्हाला लसीकरण होणार होते. एकमेकांशी कामाव्यतिरिक्त बोलणार्या एका मित्राने मी पण तुझ्याच स्लॉटमध्ये आहे, तेव्हा गेटजवळ थांब असे आधीच सांगितले होते. आधार कार्ड आणायला विसरू नकोस हे पण सांगितले होते.
एका टिपिकल मराठी माणसासारखं मी पाच मिनिटे उशिरा पोचलो. मित्र आधीच आला होता. (कपडे धुणे महत्वाचे. बाहेरून घरी आल्यावर हाताला आराम हवा) चला चला नाहीतर आपली लस कोणी दुसराच घेईल या ध्येयाने आम्ही पळत पळत लसीकरण केंद्र गाठले.
मोजकीच दोन तीन माणसं होती. डॉक्टर अब तक नाही आये है, आओ बैठ जाओ म्हणत आम्ही बसलो. थोड्याच वेळात डॉक्टर आले आणि लसीकरण सुरू झाले. दहा मिनटात आमचा नंबर आला. तुम्हाला मागच्या तीन महिन्यात कोरोना झाला होता का ?
तुम्हाला कोणती ऍलर्जी ? कोणती लस या आधी तुम्ही घेतली आहे का ? असे विचारुन आमचे लसीकरण झाले. नर्सने इतक्या सहजपणे सुई टोचली, की काही झाले असे वाटले पण नाही. हात मोकळा सोडा आणि हाताला मसाज करू नका. समजा ताप आला तरच औषध घ्या आणि आज विश्रांती घ्या, असा सल्ला दिला.
ऑफिस कडून मोफत लसीकरण झाले याचा इतका आनंद होता तो ऑफिस मधील मित्राशी बोलताना द्विगुणित झाला. ऑफिसने उत्तेजनार्थ एक चहा आणि पनीर पराठा पण ठेवला होता. चहा घेत घेत आपले ऑफिस थोडे चांगले आहे. खरंच आता जरा रविवार आला की घराबाहेर पडू, पिझ्झा खायला आता हरकत नाही असे बोलणे करून, आम्ही दोघेही आपापल्या घरी जाणार्या बस पकडून घरी निघालो. दुपारची वामकुक्षी आम्हाला हवी होती. आणि ओला प्रवास फारच खर्चिक यावर आम्ही मित्र अगदी ठाम होतो. बचत फार महत्वाची. पगार आता वाढला पाहिजे यावर आम्ही पुन्हा एकदा बोललो आणि लस घेऊन घरी आलो.
रात्रीच्या दरम्यान थोडी अंग दुखी, आणि थंडी वाजली इतकेच. दुसर्या दिवसापासून मी नॉर्मल आहे. काल एका डॉक्टर मित्राने एक औषध घे सांगितले आणि मी ते घेतले पण. मेंदूत कुठे गाठ झाली नाही. चक्कर पण आली नाही. काल वर्क फ्रॉम होम करताना लस घेतलेला हात जरासा कुरकुर करत होता इतकेच. दूरगामी परिणाम अजून तरी माहीत नाहीत. पण सद्यस्थितीत सगळे काही ठीक आहे. आता वाट पहातोय दुसऱ्या डोसची.
माझ्या अनुभवाच्या आधारावर सांगतो की अफवांवर विश्वास ठेवू नका, खोट्या बातम्या पाहू नका. विद्यापीठाच्या परीक्षा अजून सुरू नाही, त्यामुळे नको त्या व्हाट्सएप संदेशांचा अभ्यास करणे बंद करा, इतकीच विनंती करतो आणि माझी साता उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण करतो.

– लेखन : कमल अशोक, नवी दिल्ली
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.