दिवेलागणीची वेळ….
नीरव शांततेत शांतता शोधणारा काळ…
थकलेल्या उन्हाला सावली मिळण्याचे ठिकाण….
चांगल्या घटनांची उजळणी आणि वाईट घटनांना विस्मृतीत टाकण्याचा क्षण…
सकाळ आणि रात्र यातील दुवा…
अंधारात चाचपडताना आशेचा नंदादीप लावून प्रकाशाचा मार्ग शोधण्यास मदत करणारा जणु यात्रीच….
‘सांज ये गोकुळी सावळी सावळी’ असे गुणगुणत घरट्याकडे धावण्याची ओढ प्रत्येकाची विलक्षणचं असते ना….!
विविध रंग उधळीत सूर्याचा गोळा बुडत असताना फक्त त्याच्याकडे एकटक बघत रहावं….अस प्रत्येकालाचं वाटतं… त्याचं रेंगाळत रेंगाळत जाणं…मनास भावतं…कदाचित त्यालासुद्धा इथुन जावसं वाटतचं नसावं…म्हणूनच तो ही उगाच रेंगाळत हळु हळु सरकत असावा. नाही का ?
बालकवींनी या सूर्यास्ताचं किती छान वर्णन केले आहे…
“कुठे बुडाला ? पलीकडे.
तो सोन्याचा गोळा….
सोन्याच्या गोळ्याची उपमा…किती छान वाटते नाही ?…तो त्यावेळी प्रखर नसतो..त्याच्यातील स्निग्धता मनाला आल्हाददायक वाटते…
म्हणजे, आत्ता खरी सांजवातीची,
तिन्हीसांजेची वेळ आलीय…
कितीतरी कुटुंबात देवाजवळ सांजवात लावून शुभं करोती कल्याणम् म्हणून सकारात्मक ऊर्जेचं आवाहन करतात. अंधाराचे साम्राज्य आलं म्हणजे वाईट शक्तींचा प्रभाव येतो आणि त्याच्याशी लढण्याचं बळ अंगी यावं हा त्यामागचा हेतू….

अर्थात तसा विचार हा प्रत्येकाच्या मानण्यावर अवलंबून असतो म्हणा….पण या सांजवातेचं एक वेगळेच महत्त्व आहे हे मात्र मान्य करायलाच हवे.
मंद तेवणारी सांजवात
शांतता देऊन जाते..
संकटातून निघण्याचा
वेगळा मार्ग दाखवते…
दिवसभराचा थकवा काही क्षणांत मिटावा…आणि पूर्ण रिक्त व्हावं त्याच्यापुढे…उद्याच्या अजून नवीन साठवणुकीसाठी….उद्याच्या अजून नवीन जबाबदारीसाठी…उद्याच्या अजून नव्या संकटाशी दोन हात करत त्याच्यासमोर हसत हसत सामोरे जाण्यासाठी…
‘संधीकाळी या अश्या धुंदल्या दिशा दिशा’ प्रियकराची साद त्याच्या प्रेयसीकडे मंद, धुंद वेडावत भेटीस व्याकुळ होणारा हा काळ….
झाल्या तिन्ही सांजा
करुन श्रृंगार साजा
वाट पहाते मी गं
येणार साजन माझा..
मिलनोत्सुक ललनेची तिच्या सजनाला भेटण्याची आर्तता..या तिन्हीसांजेला कवळून मिठीत घेणारी…. कितीतरी कवींना काव्यउत्मुख करणारी ही सांज….! मोहक, अवर्णनीयचं !!
अमृताच्या जणु ओंजळी
सांज ये गोकुळी सावळी सावळी
सावळ्याची जणु सावली
हा सावळा म्हणजे श्रीकृष्ण बरं का !….त्याच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या बासरीच्या आवाजात सारे विश्व कान्हा होते…
बरं…इतकचं वेडावणार्या संगीतासोबत धुंद करणारा एखादा सुगंध आला की बस्स….या विश्वातला सारा आनंद आपल्याच ओंजळीत वसलाय अस वाटलं तर नवल काय ? नाही का ? स्वर्गीय सुखाचा प्रत्यक्ष अनुभव आल्याचा भाव निर्माण करणारी रातराणी त्यावेळी फुलून सुगंध चौफेर उधळीत मनाला प्रसन्न करुन टाकते…
भुलवणारा परीमळ
रातराणीचा…
अंधारलेल्या रात्री
स्वः विसरण्याचा….
आणि फक्त रातराणीचं नव्हे बरं का ? यावेळेस खुलणार्या पुष्पांचा थाट काही वेगळाचं असतो… त्यांंचे वेगळेच सौंदर्य मनास मोहवणारे…!

मग मंद सुवासाची गुलबक्षी असो किंवा सौंदर्यात भर टाकणारे बह्मकमळ असो… सार्या सृष्टीला काळोखातही वेड लावणारा असा परिमळ!आणि अशी ही सांजवात,सांजवेळ…कातरवेळ!आपल्याला आठवांच्या दुनियेत नेऊन गाठतेचं…. आणि या आठवांच्या राज्यात एकदा गेले की परतण्याचा मार्ग आपला आपल्यालाचं शोधावा लागतो…बरं….त्यासाठी खुप काही नाही या सांजवेळेच्या सौंदर्यात स्वःला विसरायचे… मनाची पाटी एकदम कोरी करायची…दुखद घटना कायमच्या पुसून टाकायच्या…आणि सुखांना भरभरून ओंजळीत घेऊन दान करायचे.. मग आनंदून लक्ष्मीचे आगमन होणारचं ना !म्हणजे आपोआप तिचे पाऊल आपल्या अंगणी पडून सुखांच्या नद्या वाहतील आणि आयुष्यात नवीनवीशी हवीहवीशी वाटणारी पहाट रंग भरेल.
रंग आगळे
रंग वेगळे
पहात रहावे
वाटत रहाते..!
हवेहवेसे
सुखावणारे
सतत यावे
वाटत रहाते…!
अशी मनाची अवस्था ….असं काहीसं
— लेखन : मेघा महाडीक. कोल्हापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
अप्रतिम लेखन
खूप छान
Khupach chaan.. keep it up…
Nice article. Have good read after long time… Keep it up madam..👍🙏
प्रत्येक माणसाच्या मनातील संध्याकाळच्या वेळेचे विविध भावभावनांचे दर्शन घडवणारा लेख….. खूप सुंदर मेघा ताई…😊 असेच लिहीत रहा.
Very Nice..Keep It up Vahinisaheb..
Khupch chhan
खूप सुंदर लिहिले आहे..
Superb fantasy and great depiction of the most silent time of the day.
अप्रतिम वाक्यरचना…. 💯
खूपच छान लेखन…. उत्कृष्ट शब्दांची रचना… सांजवेळ भावली.