मी गेल्या महिन्यात, २० जुलैला फेसबूकवर लिहीले होते…..
“आज शाळेतल्या बाईंची आठवण आली.
मी शाळेत असतांनाची गोष्ट…बाई बरेच दिवस अनुपस्थित होत्या.
मराठी, भूगोल, इतिहास अगदी रंगवून, मनापासून गोष्टीसारख्या सुंदर शिकवायच्या..
म्हणून त्या आमच्या आवडत्या होत्या”.
खूप दिवसांनी त्या शाळेत आल्या. म्हणाल्या, मी आज अभ्यास नाही घेणार !
एक माझा छान अनुभव सांगते…
“मी अमेरिकेला गेले होते. तिथे २० जुलै १९६९ या दिवशी मी तिथल्या टिव्ही वर काय पाहिले माहित आहे ? नील आर्मस्ट्रॅांगनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले.. तो ऐतिहासिक प्रसंग मी पाहिला….. ”बाई तासभर बोलत होत्या. आणि आम्ही मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो..
आज त्या आठवल्या .. कारण आज २० जुलै… National Moon day….
त्या दिवसाची आठवण म्हणून साजरा करतात हा दिवस….
शाळेतलं निरागस वय… अमेरिका म्हणजे प्रति स्वर्ग ही भावना… त्यावेळी शाळेतली मुलं वर्तमानपत्र वाचत नसत. काही काही घरांत तर वर्तमानपत्र येतच नसत. त्यावेळी कुणाच्या घरी टिव्हीही नव्हतेच फारसे.
जगात काय चालले आहे हे कोणीतरी मोठ्यांनी सांगितल्याशिवाय कळायचेच नाही काही ! घर, शाळा, मित्र .. इतकं छोटं जग होतं तेव्हा आमचं !
बाई खूप भारावून, अभिमानानी सर्व सांगत होत्या. चंद्रयान, केनडी, नील आर्मस्ट्रॅाग बरोबरचे आणखी दोघे, मायकेल कॉलिन्स आणि एडविन ऑल्ड्रिन यांच्याबद्दल ….
पहिले पाऊल नीलचे… तो म्हणाला, “हे माणसासाठी एक लहान पाऊल आहे, परंतु मानवजातीसाठी एक विशाल झेप आहे”
…… त्यावेळी आम्हाला वाटले हे फक्त अमेरिकाच करू शकते.
भारत तर चंद्राला देव मानून पूजा करणारा देश ! जसा सूर्य देव, तसाच चंद्र देव ! … संकष्टीला चंद्रदर्शन झाल्यावर इथे उपवास सोडणारी श्रध्दाळू माणसं रहातात ! करवां चौथला बायका दिवसभर कडक उपवास करून चाळणीतून चंद्राला पाहिल्यावर पाणी घेतात, गणपतीत चंद्र गणपतीला हसला यावर पूर्ण विश्वास ठेऊन त्याच दर्शन घेत नाहीत, पण कोजागिरीला त्याचेच कौतुक करतांना थकत नाहीत. चंद्राला भाऊ मानून ओवाळतात.
त्यांना चंद्रावर माणूस ही कल्पनाच न पटणारी असेल. अमेरिकेच्या प्रगतीच्या मानानी खूपच मागे असलेला देश….
पण आता त्याच भारताचे चांद्रयान ३, गौरवाने चंद्रावर उतरणार आहे. अशक्य गोष्ट शक्य झाली आहे.
National Moon day आपणही मोठ्या अभिमानाने साजरा करायला पाहिजे.
खरं ना ?”
आणि जवळपास महिन्यानंतर आता काल
भारताचे यान चंद्रावर उतरले हे साऱ्या जगानी पाहिले.
आणि आपण नशीबवान आहोत कि ६९ साली अशक्य वाटणारी गोष्ट आपण पाहिली. तो थरार अनुभवला.
त्यामागे लाखो लोकांचे ज्ञान, कसब, श्रम, पैसा, शक्ती, जबरदस्त इच्छाशक्ती होती म्हणून हे सर्व शक्य झाले.
त्यांना वंदन करणे, त्यांचे कौतुक करणे, त्यांचा आदर करणे आणि आपल्या कुठल्याही कृतीने भारताची उंचावलेली मान खाली जाणार नाही ह्याची दक्षता घेणे हे आपले कर्तव्य आहे, असे मला वाटते.
सहज गंमतीचा विचार मनांत आला ….
चंद्र खेळायला हवा म्हणून
म्हणे लहानपणी रामाने हट्ट केला..
म्हणून आयोध्यात राम येण्या आधी
भारताने चंद्रावर जाण्याचा घाट घातला..
आता रामाला खोटे प्रतिबिंब दाखवून
फसवायला नको..
चंद्रावर त्याला खेळायला जायचे असले तरी
अडवायला नको…
— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800