१.
घोडदौड चांद्रयान ३ ची
आम्ही भारतीय
कुठेच नाही कमी ।
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील यानाचे
आम्हीच आहोत स्वामी ॥🚀
२३/०८/२०२३ लिहून ठेवावी
तारीख सुवर्णाक्षरात ।
इस्त्रोची मेहनत
उतरली आहे सत्यात ॥
भारताने अंतराळात
रचला नवा अध्याय ।📜
यानाचे यशस्वी लँडिंग होऊन
ध्वज भारताचा चंद्रावर फडकला ॥
लॅन्डर विक्रम चंद्राच्या
दक्षिण ध्रुवी उतरले ।
हळूच दरवाजा उघडून
रोव्हरने पाऊल चंद्रावर ठेवले ॥
किती हुशारी शास्त्रज्ञांची,
एकजूट भारतीयांची ।
आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली
स्वारी चांद्रयान ३ ची ।
आता पुढचं लक्ष्य
शुक्राचं आम्ही गाठणार ।
चंदामामाच्या आशीर्वादाने आमचे शास्त्रज्ञ
अंतराळाचे अधिक संशोधन करणार ॥
चांद्रयान ३ चा यशस्वी विजय।
एकमुखाने म्हणूया भारत माता की जय ॥

–– रचना : चैताली कानिटकर
२.
यश चांद्रयानाचे
चांद्रयान ३ उतरले हलके
आणि घडला इतिहास
चंद्राच्या दक्षिण तटे
अभिमान तिरंगा फडकला
देशवासियांचा उर
किती भरला अभिमानाने
प्रत्येकाचा शब्द आज
फुलला आनंदाने
कष्टाचे झाले सोने
साऱ्या शास्त्रज्ञांचे
न खचता पुढेच पडे
पाऊल आत्मविश्वासाचे
ज्ञानाची सरिता अशी
अखंड वाहे निरंतर
यशोगाथा भारताची
उंचावावी युगोत्तर
अभिनंदन करण्या सारे
भारतीय एक झाले
विज्ञानाच्या क्रांतिने
दर्शन नवे लाभले.

— रचना : शिल्पा कुलकर्णी. अमेरिका
३.
चंदामामा
निल नभाचा चंदामामा
खेळत होता भाच्यासंगे
कथा, कविता गोष्टीमध्ये
डोकावे अन करतो दंगे
आज उघडले दार नभीचे
चंदामामाच्या वाड्याचे
निलनभीचा राजा गोंडस
स्वागत करतो भारतभूचे
— रचना : सौ.मानसी जोशी. ठाणे
४.
क्षण विलक्षण
क्षण कायम लक्षात राहणारा,
क्षण राष्ट्राभिमान जागविणारा,
क्षण ४ वर्षांचे सार्थक करणारा,
क्षण श्वास, प्राण रोखून धरणारा,
शास्त्रज्ञांची अथक अविरत मेहनत,
अनेकांच्या कष्टांची, घामांची किंमत,
अनेकदा केलेल्या त्यागाची रंगत,
तिरंग्याची आण, अन् गाठले लक्ष्य,
असा क्षण पाहण्याचे भाग्य लाभले,
मला अभिमान मी हे सत्य पाहिले,
माझ्या भारताचा जगात वाढला मान,
तिरंगा चंद्रावर, गाऊ विजयाचं गान,

— रचना : हेमंत भिडे
५.
चांद्र अभियान
अभिमानाने भारतीयांचा,
उर भरून आला |
चांद्रयान ३ चंद्रावरती,
दिमाखात उतरला ||
प्रयत्न बुद्धी कौशल्याचा,
संगम सुरेख झाला |
भारतीय विज्ञान प्रगतीचा,
झेंडा नभी फडकला ||
जयघोष करूया एक मुखाने,
भारत मातेचा |
शास्त्रज्ञांचा तंत्रज्ञांचा,
स्वदेशी बाण्याचा ||
असेच आपण पुढे जाऊ,
एक विचाराने l
विश्वगुरूपदी मातृभूमीला,
नेवू मानाने ||
|| जय जवान, जय किसान, जय विज्ञान ||
|| भारत माता की जय ||

–– रचना : प्रवीण देशमुख. कल्याण
६.
🌙 🌒 🌒 🌙
स्वप्न हळूवार अंतरी
सारे भारतीय पाहती
विक्रम चंद्रयान ३
चंद्रावरी अलवार उतरती ||🌙
शान भारतमातेची
आज जगात उंचावली
इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी
🦅 गरुडझेप हो घेतली ||🌙
केला सार्थ विश्वास भारतीयांचा
थांबला क्षणभरी जरी श्वास
विजय उत्सव आज सुवर्ण दिनाचा ||🌙
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर
तिरंगा असा झळकला
चांदोमामा ही आज
भाच्याला पाहून खूश झाला ||🌙
यशस्वी मोहीम फत्ते झाली
जगात साऱ्या मान उंचावली
चांदोमामाला राखी पाठवली
भारतमाता आज सुखावली |
🌙🌒🌒🌒🌒🌙

–– रचना : आशा दळवी. दुधेबावी
७.
विजयी विश्व तिरंगा
विजयी विश्व तिरंगा आमुचा
आज फडकला चंद्रावरती
चांद्रयानाच्या यशस्वीतेने
भारतीयांची फुलली छाती
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर
कुणीच पोचू शकले नाही
चांद्रयानाने ते करून दावले,
ही आमच्या सामर्थ्याची ग्वाही
भारत आमचा विश्र्वगुरू हा
ब्रह्मांडाला घाली गवसणी
वाटचाल ही असेल पुढची
सूर्यमण्डल हे लक्ष्य ठेवुनी

- –– रचना : उद्धव भयवाळ
८.
चांद्रयान ३ : पाच शिरोमणी
इंडियन स्पेस रिसर्च इंस्टिट्यूट ,
मेहनत भारत चांद्रयान-३ संघाची ,
३ वर्षे ९ महीने १४ दिवस //१//
रचला इतिहास पाच हिरोनी ,
बाहुबली रॉकेटची केली रचना ,
डॉ. एस्. सोमनाथ यांनी //२//
शोध ओळख चंद्रावरी करत ,
मोहिमेचे होते प्रोजेक्टर डायरेक्टर ,
“वीरा” नावाने सारे ओळखत //३//
एस्. उन्नीकृष्णन नायर ,
जबाबदारी त्यांची रॉकेट निर्माणाची ,
विक्रम अवकाश केंद्री भूषण डायरेक्टर //४//
इस्त्रोचे सॅटेलाइट डिझायनर डायरेक्टर ,
उपग्रहाचे निर्माते एम्. शंकरन् ,
हवामान भविष्यवाणीत ग्रहांचे फादर //५//
डॉ. के. कल्पना भारतीय नारी ,
कोविड काळात रमली यानशोधात ,
डेप्युटी प्रोजेक्टर शास्त्रज्ञ भारी //६//
दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ भारताचे ,
आनंद जल्लोषात अवकाश दुमदुमे ,
इतिहासात जयजयकार इस्त्रो संघाचे //७//
पाच शिरोमणी भारताचा अभिमान ,
स्वप्न अवतरले भारतीयांचे भाग्य ,
तिरंगा लहरला भारतदेश महान //८//

— रचना : सौ.वर्षा महेंद्र भाबल.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
चांद्रयान मोहीम फत्ते झाली.भारताचा तिरंगा नव्या जोमाने फडकावला.वैज्ञानिकांचे कौतुक करावे तेव्हढे कमीच,पण कवितेच्या माध्यमातून वर्षा भाबल, उद्धवसाहेब,आशा मॅडम,प्रवीण साहेब,हेमंत भिडे,,शिल्पा मॅडम,चैताली मॅडम यांनी सुरेख वर्णन केले आहे.वर्षा मॅडम यांनी तीन ओळींचे एक कडवे, थोडे वेगळेपण जानवले.मस्त ,असेच काव्य आपल्या हातून घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना 👌👌🌹🌹🙏🙏