काल, २८ सप्टेबर.स्व. लता मंगेशकर ह्यांची जयंती होती. सर्वच अर्थानी त्या मोठ्या होत्या..
वयानी, त्यांच्या गायनाच्या आवाक्यानी, किर्तीने, त्यांना मिळालेल्या जनतेच्या आदराने, प्रेमाने, त्यांच्या गोड वागण्या- बोलण्याने.. त्या सामान्यांच्याही लतादीदी होत्या..
आपण देवाला कसे एकेरी संबोधतो, तसे आमची लतादीदी म्हणण्या इतक्या त्या सर्वांच्या जवळच्या वाटायच्या..
म्हणूनच त्यांना लतादीदी असे एकेरी संबोधत ४ ओळी लिहाव्या असे वाटले.
मी स्वतः ला भाग्यवान समजते की त्यांच्याशी बोलण्याची संधी मला मिळाली, त्यांची सही मला मिळाली.
आमच्या जवळच्या हॅालमध्ये त्यांनी काढलेल्या फोटोंचे प्रदर्शन भरवून, त्या हॅालच्या कलादालनाचे उद्घाटन झाले होते . डॅा. रमेश प्रभू ह्यांनी माझ्यावर त्या हॅालच्या सजावटीची जबाबदारी टाकली होती. मैत्रिणींच्या मदतीने मी ती निभावली. पण आयत्यावेळी मला रांगोळी काढण्याचा आग्रह झाला. आणि मी लतादीदींचे वडिल दीनानाथ मंगेशकरांची रांगोळी सुरवातीलाच, समईच्या जवळ काढली. त्या रांगोळीचे कौतुक, लतादीदींने केल्यामुळे मी भरून पावले. तो क्षण माझ्या आयुष्यात खूप मोलाचा आहे.
नंतरही मी कधीतरी त्यांची रांगोळी काढली, पेन स्केच काढले. आज ते सर्व फोटो आठवले. त्यांना माझी भावपूर्ण आदरांजली..

लतादीदी
तुझ्या सुरेल आवाजामुळे,
दीदी, तू ..जवळची झालीस…
मी चित्र काढतांना,
कानांत तू घुमत होतीस,
मी रांगोळी काढतांना
त्यात तू रंग भरत होतीस,
प्रत्यक्ष भेटलीस ना,
तेव्हा हृदयात जाऊन बसलीस..
आज लांब गेलीस,
पण मनांत तशीच आहेस… जवळची !
हसरी, स्वर्गीय आनंद देणारी….
सर्वांची लाडकी ……लतादीदी..
भावपूर्ण श्रध्दांजली..

— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800