माणसेच माणसे अवती भवती..माणसांच्या मनाचे हजार रंग..काही प्रकाशमान..काही गडद.. काही फिके..काही मंद.. काही धूसर.. तर काही शेडेड.. जेव्हड्या माणसांच्या तऱ्हा, लकबी, व सवयी तेव्हढे हे रंग वेगवेगळे..
आपण काही दहा हजारो माणसे नाही अनुभवू शकणार.. पण जी माणसे आपल्या आजूबाजूला असतात, त्यांचे निरीक्षण केले तरी माणसांच्या विविध परी आपल्या निदर्शनास येतात..फक्त आपली नजर चौकस हवी.
तसे तर दुसऱ्याचे फेस रिडींग प्रत्येक जणच करीत असतो.त्यामुळे च आपल्याला त्यांच्या। स्वभावाचा थोडाफार अंदाज येऊ शकतो. काही माणसांशी आपली स्पंदने इतकी जुळून जातात, की जणु आपली आणि त्यांची गेल्या कित्येक वर्षांपासूनची ओळख आहे. तर काही माणसांचा चेहरा पाहताक्षणीच ती माणसे आपल्याला आवडत नाहीत.

माणसांची काही वैशिष्ट्ये असतात. कोणाचे अक्षर मोत्यासारखे सुंदर असते..काही माणसे बाहेरून येता येता काही तरी गुणगुणतच आत येतात.. काही एकदम आत येतात ती एकदम excite झालेली.. सनसनाटी बातमी घेऊन आलेली..काही एकदम आतिथ्यशील.. काही एकदम वक्तशीर.. शिस्तबद्ध.. कोणी हरहुन्नरी.. कोणाच्या नजरेत एकदम जरब.. कोणी अत्यंत टीकाखोर.. कोणी नाविन्याची आवड असणारे..तर कोणाची कल्पनाशक्ती अगदी उत्तम !
प्रत्येकाच्या शारीरिक सवयी तरी किती वेगवेगळ्या..माणसांची चालायची पद्धत, स्कुटरवर बसायची पद्धत, खोकायची, शिंकायची, नाक शिंकरण्याची पद्धत वेगवेगळी.. कोणी बेसिनवर जाते तर कोणाला चार लोकांच्या बैठकीतही रुमाल काढून नाक शिंकरायला काही वाटत नाही.. कोणाचे हसणे मोकळे.. कोणाचे छातीवर हात ठेवून..कोणाचे स्मितहास्य.. कोणाचे कुत्सित.. कोणाचे गालातल्या गालात.. तर कोणाचे छद्मी..! कोणाला बोलता बोलता डोळा मिचकवायची सवय.. कोणाला नाक उडवायची.. तर कोणाला गाताना दोन्ही खांदे वर उचलून धरायची व सोडायची सवय..

कोणी बोलताना आपला एकच खांदा गोल फिरवते..कोणाचा चेहरा इतका शार्प, की जणू तो पाहताक्षणीच मिलीटरी मध्ये आहे का काय असे वाटावे.., तर कोणाचे दिसणेच असे की पाहताक्षणीच तो एखादा डॉक्टर किंवा सायंटिस्ट वाटावा !
आणि स्वभावाच्या तऱ्हा तरी किती अगणित.. कोणी डोकं दुखलं तरी तक्रार करणारे.. तर कोणी कॅन्सर होऊनसुद्धा लाइटली घेणारे..म्हणजेच कोणी परिस्थितीचे सतत रडगाणे गाणारे.. तर कोणी परिस्थितीवर हसत हसत मात करणारे..कोणी सतत दुसऱ्याचे कौतुक करणारे.. तर कोणी सतत दुसऱ्याचे उणेदुणे काढणारे.. सतत टीका करणारे.. दुसऱ्याला कधीही चांगले न म्हणणारे..कोणी दुसऱ्याची कायम फुलासारखी काळजी घेणारे तर कोणी स्वतःच्या अंगाला जरासुद्धा लावून न घेणारे.. स्वतःची झीज न सोसणारे..बेदरकार..

कोणी कायम समजूतदारपणा दाखविणारे तर कोणी एकदम हट्टी.. कोणी एकदम हळुवार बोलणारे, तर कोणी एकदम परखड.. स्पष्टवक्ते.. कोणी एकदम उधळे तर कोणी एकदम कंजूष मारवाडी ! कोणी एकदम दिलखुलास.. तर कोणी एकदम आतल्या गाठीचे..काही दुसऱ्यांच्या बातम्या सतत काढून घेणारे.. त्यांच्या आयुष्यात विनाकारण डोकवायचा प्रयत्न करणारे.. कोणी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वागणारे तर कोणी वागण्याचा पोच नसणारे..कोणी आल्या आल्या एखाद्या समूहाचा ताबा घेणारे, त्यांना जिंकून घेणारे..तर कोणी एका कोपऱ्यात मागे बसून राहणारे.. कोणाला भरभरून उत्साह.. कशात ना कशात सारखा रस …तर कोणाला कशातच रस नसणारे.. कोणी एकदम रसिक.. तर कोणी एकदम अरसिक..!
कोणी एकदम गॅस चालू ठेऊन गरम गरम खाणारे, तर कोणी ते गरम न करताच गारढोण जेवणारे.. कोणी वृत्तीने धरसोड करणारे तर कोणी एकदम चिकाटी असणारे..

कोणी कृतघ्न… तर कोणी कृतज्ञ..! कोणी एकदम चंचल, स्वतःची मते एकदम बदलणारी, बोलात बोल नसणारे तर
कोणाचे बोलणे म्हणजे अगदी काळ्या दगडावरची रेघ..!
कोणी उठल्यापासून झरझर कामाला लागणारे.. तर कोणी कोणी उठल्यापासून तासंतास नुसते बसून रहाणारे.. कोणी एकदम प्रॅक्टिकल तर कोणी अति भावनाशील आणि नसता घोळ घालणारे..
कोणाचे घर म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा.. तर एखाद्याच्या घरात ‘कारणाशिवाय अधिक वेळ बसू नये’ अशी पाटीच…!
कोणी प्रत्येक गोष्टीचा अगदी खोलात जाऊन अभ्यास करणारे, तर कोणी कोणी सगळ्याच गोष्टींकडे वरवर पाहणारे.. एखाद्या स्त्रीची साडी इतकी स्टार्च व नुकती इस्त्री केल्यासारखी.. असे वाटावे की जणू हिने आत्ताच साडीची घडी मोडली आहे, .. तर कोणाची साडी.. , कपडे कायम चुरगळलेले..

कोणी कायम दुसऱ्याला उपदेशाचे डोस पाजणारे, दुसऱ्याला कायम सल्ला देणारे.. शहाणपणा शिकवणारे.. व आपण स्वतः कोरडे पाषाण असणारे.. तर कोणी विचारल्याशिवाय आपले मत न सांगणारे..
कोणी प्रसिद्धीच्या झोतात स्वतःला ठेऊ पाहणारे तर कोणी एकदम प्रसिद्धीपासून चार हात मागे..
माणसा माणसांना असं हे वाचणं म्हणजे आपण जेव्हडं अभ्यासू तेव्हडं कमीच!तुम्हीही अशा कित्येक माणसांच्या वेगवेगळया परी, तर तऱ्हा अनुभवल्या असतील.. मला सांगा मग..!लेख किती तरी मोठा मोठा होत जाईल.. पण समृद्धही…!
कारण माणसे जेव्हडी अगणित, तेव्हडा त्यांचा अभ्यास रोचक..!

कंटाळलात का माझा लेख वाचून..मग मला असेही म्हणावे लागेल की काही वाचक चांगला लेख वाचता वाचताही कंटाळून जाणारे.. तर कोणी ‘लेख’.. ‘अनुराधाचा‘ आहे, म्हणून कायम रस घेऊन वाचणारे.. त्याचा आनंद घेणारे..! 😉😉🤣
किती किती लिहू मी…! कुठे तरी थांबायलाच हवं ना..थांबते..!

— लेखन : सौ.अनुराधा जोगदेव
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
हे वाचून स्वभाव निरीक्षण ची माझी उजळणी झाली
लेख आवडला मला लेखन वाचायला मिळाले मला पाठवले त्या साठी आभारी आहे
Thorough study & observation of people. Written so effortlessly and almost covered all character of people.
Enjoyed reading it 👌👌👏👏👍👍