जळलेला मोहोर
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वि.स.खांडेकर यांचे ११ जानेवारी २०२२ पासून “शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष” सुरू आहे. त्यांची पंचाहत्तर वर्षांपूर्वी म्हणजे १९४७ साली प्रकाशित झालेली “जळलेला मोहर” ही कादंबरी नुकतीच वाचली.
खांडेकर यांनी पिरॅंडेलोचे “Six characters In search of An Author” हे नाटक वाचले. त्यात लेखकाने जी पात्रे निर्माण केलेली असतात ती प्रत्यक्ष त्याला भेटतात नि आपली खरीखुरी हकीगत सांगू लागतात, अशी या नाटकाची मध्यवर्ती कल्पना आहे.
खांडेकर यांना या नाटकाचे तंत्र आवडले. या धर्तीवर त्यांनी “पारिजातकाची फुले” ही गोष्ट लिहिली. ही गोष्ट लिहिताना खांडेकर यांनी निवेदन पध्दतीचे नावीन्य तर वापरलेच परंतु त्याकाळात ज्या विषयावर लिहीणे तर सोडाच परंतु साधी चर्चा करणे पाप आहे असे समजले जायचे अशा विषयावर कथा लिहिली.
या कथेचे कादंबरीत रूपांतर करण्यापुर्वी खांडेकर यांनी पहिली पाच प्रकरणे किर्लोस्कर मासिकात प्रसिध्द केली. अंक प्रकाशित झाल्यानंतर अनेक स्त्री – पुरुष वाचकांनी खांडेकर यांना पत्र पाठवून आपल्या व्यथा व्यक्त करण्यास सुरुवात केली. या सर्व पत्रांचा अभ्यास केल्यानंतर खांडेकर यांच्या असे लक्षात आले की “लग्न म्हणजे प्रेम” असे समीकरण असले तरी त्या प्रेमाचे पृथःकरण करणे गरजेचे आहे. संसाराला फुलबाग मानून हल्ली तरुण- तरुणी त्यात प्रवेश करतात. पण त्यापैकी अनेक जोडपी लवकरच काट्यांनी पाय रक्तबंबाळ होऊन सैरावैरा धावू लागतात. मध्यमवर्गामध्ये वैवाहिक असंतोष किती मोठ्या प्रमाणात धुमसत आहे, हे या पत्रांवरून लक्षात येते. या असंतोषाच्या मुळाशी जी कारणे आहेत त्याबाबत पूर्ण विचार करून त्यांनी १९४७ साली “जळलेला मोहोर” या नावाने कादंबरी लिहिली.
या कादंबरीचा विषय व तंत्र चाकोरी बाहेरचे असल्याने अनेकजण टीका करतील असे खांडेकर यांनी गृहीत धरले होते. पढीक पंडितांपेक्षा सर्वसामान्य वाचक हाच कुठल्याही कलाकृतीचा अधिक रसिक टीकाकार होऊ शकतो, याची खात्री खांडेकर यांना होती. सर्वसामान्य वाचकांना कादंबरीचे तंत्र व विषय आवडला म्हणून तर या कादंबरीच्या पंचाहत्तर वर्षात अनेक आवृत्या निघत आहेत.
सध्या घटस्पोटाचे प्रमाण इतके वाढले आहे की लग्न जमवणे व संसार टिकवणे हे कठीण झाले आहे हे लक्षात येते. वाचकांनी फक्त करमणूक म्हणून ही कादंबरी न वाचता या विषयाचा अभ्यास करण्यासाठी ही कादंबरी वाचावी. वाचनाच्या बाबतीत एक सुविचार वापरला जातो “वाचाल तर वाचाल” , ही कादंबरी वाचल्याने अविवाहित वाचक तर वाचतीलच परंतु इतरांनी ही कादंबरी वाचून या गंभीर विषयावर चर्चा घडवून आणली तर अनेकांच्या संसार वृक्षांवरील मोहोर जळणार नाही.
— परीक्षण : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800