चमच्यांचा मोर
आपण अगदी बारकाईने चमच्यांचे निरीक्षण केल्यास या चमच्यांमध्ये कितीतरी सुंदर आकाराचे व प्रकाराचे चमचे दिसतात. आज अशा चमच्यांचा उपयोग करून आपल्याला पिसारा फुलवून नाचणारा मोर तयार करायचा आहे.
त्यासाठी गोल आकाराने जाड पुठ्ठा कापून घ्यावा. त्यावर गडद रंगाचा कागद चिकटवावा. काळा रंग घेतल्यास मोर अधिकच उठावदार दिसेल. त्यानंतर त्यावर फोटोत दिसतो त्याप्रमाणे पिसारा फुलवून नाचणार्या मोराची आऊटलाईन काढून घ्यावी. नंतर लांबट आकाराच्या चमच्याने मोराचे शरीर तयार करून गोल आकाराच्या चमच्याने डोक्याचा भाग तयार करावा. स्केचपेनचे टोपण कापून घेऊन त्याची चोच तयार करावी.
एवढे केल्यानंतर आईस्क्रीम खाण्याचे लाकडी चमचे पिसाऱ्याप्रमाणे चिकटवून घ्यावेत. आता या चमच्यांचा आकर्षक गोलाकार पिसारा तयार होईल. मोराचे पाय, डोळे, डोक्यावरचा तुरा हे सारे आपणास रंगाने रंगवायचे आहे. मोराचा पिसारा देखील आकर्षक रंगात रंगवावा. आवश्यक वाटेल तिथे रंगाने सजावट करावी.
तर असा हा चमच्यांचा मोर आपणास नक्कीच आकर्षक व नावीन्यपूर्ण तर वाटेलच आणि करायला अगदी सोपा आहे. चला तर करायला लागा…. बघा तुम्हाला नक्की जमेल.
— लेखन : अरुणा गर्जे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
Beautiful Peacock.
Beautiful.