आज सकाळी नियोजित कार्यक्रमानुसार पोखरा येथे पर्यटनासाठी जाण्याचा निर्णय झाला होता. त्याप्रमाणे सर्व पर्यटक मंडळी तयारी करून ९.०० वाजता पुढे निघायचे होते. दरम्यान एका गाडीच्या इंजीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे ड्रायव्हरने सांगितले. त्यामुळे हे काम झाल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नसल्यामुळे काही मंडळी जवळच असलेल्या पशुपतीनाथ मंदिराकडे दर्शनासाठी निघून गेले, तर काही मंडळी हॉटेलवरच गप्पा गोष्टी करण्यात रंगले. आम्ही सर्व हॉटेलच्या लॉबीतच थांबलो आणि तिथेच रंगला अॅड. विजयकुमार कस्तुरे यांच्या बासरी वरील गीतांच्या आस्वादा बरोबरच डॉ. बबनराव महामुने, डॉ. खरात आणि आमच्या काव्य मैफीलाचा रंग जुळल्यामुळे खूपच मजा आली.
काही वेळाने पशुपतीनाथाच्या दर्शनासाठी गेलेली मंडळी आली. तरी गाडीचे काम सुरूच होते. आता दुपारचे १२ वाजुन गेले होते. त्यामुळे सर्वच मंडळी अस्वस्थ झालेली दिसून येत होती. पण काय करणार, गाडीचे तांत्रीक काम करून घेणे महत्वाचे होते. हे काम करता करता १ वाजून गेला. तेंव्हा गाडीचे काम झाल्याचा निरोप ड्रायव्हरने सांगितल्याचे श्री कांबळे नावाच्या कार्यकर्त्याने आम्हाला निरोप दिला. गाडीचे काम पूर्ण होता होता बराच उशीर झाला. त्याचवेळी आमच्या परतीच्या प्रवासाची काठमांडूहून मुंबईची फ्लाईट दिनांक १७ फेब्रुवारीला दुपारी २.३० वाजता असल्यामुळे आमच्या वेळेचे नियोजन बिघडले. कारण, काठमांडू ते पोखरा सुमारे ७ ते ८ तासाचा प्रवास, साईट पाहिल्यावर तिथला एक दिवसाचा मुक्काम आणि पुन्हा दुस-या दिवशी सकाळी परत येऊन दुपारची फ्लाईट पकडणे शक्यच नव्हते. म्हणून आम्ही विमानाने जाणारे ८-९ प्रवासी विचारात पडलो.
आयोजक श्री संघर्ष सावळे आणि इतर मंडळींनी हळहळ व्यक्त करत, गाडीच्या तांत्रीक बिघाडामुळे आमच्या “पोखरा पर्यटनावर” पाणी फिरल्याची कबुली दिली. शेवटी आमचे “पोखरा दर्शन” रद्द करणे भाग पडले आणि बाकीची मंडळी पुढच्या प्रवासाला दुपारी दोन वाजता मार्गस्थ झाली.
मग बाकी मंडळी हॉटेलवर बसून राहण्यापेक्षा आमची काठमांडू स्थित स्थळापैकी बुढा निलकंठ नारायण स्थान, स्वयंभू भगवान गौतम बुद्धा – विष्णु भगवान आणि “नेपाळ नॅशनल म्युझीयम” पाहून इतरही ठिकाणे पाहण्याचे ठरवून त्याप्रमाणे पुढच्या प्रवासाला निघालो. ठरल्या प्रमाणे आम्ही प्रथम बुढा निलकंठ नारायण मंदिराच्या परिसरात पोहोचलो, स्वयंभू भगवान गौतम बुद्धा आणि विष्णु भगवान मंदिर एकाच परिसरात आहे. याठिकाणी भगवान विष्णु मोठ्या जलाशयात शेष नागाच्या कुशीत झोपले असल्याचे दृश्य साकारलेले आहे. भगवान गौतम बुद्धा हे भगवान विष्णुचा अवतार असल्याची हिंदू धर्मात एक आख्यायिका असल्याचे या ठिकाणी असलेल्या एकूणच चितारलेल्या दृश्यावरून दिसून येते. या ठिकाणी सुद्धा ना कोणतीही हारफुले, नारळ-प्रसाद अगरबत्तीचे सजलेले ताट कोणत्याही भक्तगणांच्या हातात दिसले नाही. ही आश्चर्यकारक गोष्ट पाहून आपल्या देशातील मंदिर परिसरातील हारफुलांचे दुकान, दुकानदारांची दर्शनासाठी जाणा-या भक्तगणांना हार-फुल, प्रसादाचे ताट घेऊन जाण्याचा आणि त्यांच्या चपला त्यांच्याकडे सुरक्षित ठेवण्याचा आग्रह केल्या जातो, असे दृश्य फक्त “मनोकामना देवी मंदिराव्यतिरीक्त” नेपाळभर फिरल्यावर असे चित्र कोणत्याही ठिकाणी पाहायला मिळाले नाही. ही आपल्यासाठी आश्चर्यकारक गोष्ट नाही काय ?
आमचे भगवान गौतम बुद्धा आणि भगवान विष्णुचे दर्शन झाल्यावर नेपाळ देशाच्या राष्ट्रीय वस्तु संग्रहालयाच्या दिशेने निघालो. काही वेळेतच या संग्रहालयाच्या परिसरात पोहोचल्यावर तिकीटे काढून झाल्यावर प्रवेश करते झालो. जाता जाता सेक्युरीटी चेक अप झाली, मोबाईल आणि कॅमेरे आंतमध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. मात्र कॅमेरा न्यायचा झाल्यास १०० रुपये अतिरिक्त तिकीट घेतल्यावरच सोबत नेता येते. मात्र सर्वांचे मोबाईल त्यांच्याकडे जमा करून लॉकरमध्ये ठेवण्यात आले. आमच्या कॅमेराचे पैसे भरल्यावर सोबत घेतला आणि पुढे म्युझीयमच्या भव्य परिसराबाहेर मुलांनी आमचे फोटो सेशन घेतल्यावर पहिल्या सेक्षनमध्ये प्रवेश केला.
या ठिकाणी नेपाळ देशातील अनेक देवी देवतांचे विशेषत: भगवान शंकर-पार्वती, भगवान विष्णु-लक्ष्मी, गणपतींच्या दगडी मुर्ती, तर काही भग्नावस्थेतील मुर्ती पाहिल्यावर आपल्याकडील भायखळा आणि श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील राष्ट्रीय वस्तु संग्रहातील अनेक गोष्टींची आठवण झाली. पुढे दुस-या सेक्षन मध्ये नेपाळ देशाचे राजे, त्यांचा कार्यकाळ, तिथले सामाजिक जीवन, त्याबरोबरच अनेक देशातील संस्कृती, त्यांचे पेहराव, खानपान पद्धती आणि ब-याच गोष्टींचे जतन करण्यात आल्याचे या सेक्षनमध्ये पाहायला मिळाले. ते सर्व पाहून नेपाळ देशाच्या समृद्ध संस्कृतीची ओळख झाली. पुढच्या सेक्षनमध्ये पशु-पक्षी, त्यांच्या जीवन शैली पाहायला मिळाली. सोबतच नेपाळ देशातील कृषी जीवन, तेथील शेतकरी, पीक पद्धती, त्यामध्ये महिलांचा सहभाग, आपल्याकडील बारा बलुतेदारी प्रमाणे त्या देशातील अनेक कारागीर, लोहार सुतार, सोनार, बुरूड काम करणारे बाया-माणसे, त्याबरोबरच धार्मिक सण उत्सव साजरे करण्याची परंपरा आदींचे दर्शन या म्युझीयमधील मांडणीमधून पाहायला मिळाले. हे सर्व पाहून खूप छान वाटले.
आता दुपारचे ३ वाजून गेले होते. सर्वांना भुकाही लागल्या होत्या. म्हणून एका भारतीय पद्धती प्रमाणे वाटणा-या आदीती भोजनालयामध्ये जेवणासाठी आलो. हे हॉटेल एका भारतीय मारवाड्याचे असल्याचे पाहून आम्ही या ठीकाणी जेवण घ्यायचे ठरविले. तेथे काम करणारे नेपाळी असले तरी, जेवणाचे पदार्थ भारतीय पद्धतीचे होते. म्हणून मुलांनी इडली- मेदूवडा-उत्तपा सारखे पदार्थ मागविले आणि आम्ही राईस प्लेटवर ताव मारला, सर्वांचे जेवण आटोपले.
आज आमचा नेपाळ पर्यटनाचा शेवटचा दिवस असल्यामुळे उरलेला वेळ काही मार्केटींग करण्याच्या दिशेने निघालो. नेपाळमध्ये “चायनीज मार्केट आणि भारतीय मॉल असल्याचे गाडीच्या ड्रायव्हरने सांगितल्याप्रमाणे आमचा मोर्चा मार्केटीच्या दिशेने वळवला. मात्र, मुलांनी चायनीज मार्केटला जावून खरेदी करायची नाही, म्हणून निर्वाणीचा सल्ला दिला. त्यामुळे आम्ही भारतीय मॉलमध्ये शिरलो. कोणी काय घ्यायचे हा प्रश्न होता. मात्र आमच्या सौ च्या डोक्यात फक्त नातवंडासाठी कपडे घ्यायचे बाकी काही नाही. कारण, एवढ्या दूरून ओझे घेऊन जाण्यात काय अर्थ ? कारण बाकीच्या सर्व वस्तु मुंबईला मिळतातच ना ? आम्हीही तिच्या मताला दुजोरा दिला.
या ठिकाणी लेडीज-जेंटस्-किड्स असे भाग असल्यामुळे आम्ही किड्स सेक्षनमध्ये जावून काय घ्यायचे ते पाहून-पाहून इकडे-तिकडे फिरत होतो. परंतु या ठिकाणी साध्या कॉटन कपड्यांच्या ऐवजी उलनचेच कपडे होते. त्यासंदर्भात विचारणा केली असता येथे फक्त थर्मल आणि उलनचेच कपडे मिळतात. म्हणून हिरमुसले होऊन मॉलच्या बाहेर पडलो आणि परत हॉटेलकडे परत जाण्याचा विचार केला. सर्वजण ठरलेल्या ठिकाणी आल्यावर परतीच्या प्रवासाला निघालो. काही वेळातच पशुपतीनाथ मंदिराच्या परिसराजवळ आल्यावर जाताजाता दर्शन घेण्याची महिला मंडळीची इच्छा झाल्यामुळे आम्ही सर्व मंदिराच्या मुख्य गेटवर उतरून दर्शनार्थ निघालो.
योगायोगाने संध्याकाळच्या आरतीची वेळ असल्यामुळे भगवान श्रीकृष्ण आणि पशुपतीनाथांच्या आरतीचा दुर्लभ लाभ मिळाला. आरती-दर्शन झाल्यामुळे मंडळी खुश होऊन आम्ही चालतच हॉटेलकडे निघालो. रस्त्याने चालता चालता काही कपड्यांची दुकाने पाहत असतांना एक मोठे कपड्याचे दुकान पाहून आंत जाण्याचा मोह आवरला नाही. योगायोगाने हे कपड्याचे दुकान सुद्धा एका भारतीय व्यापा-याचे होते. त्या मालकानेही हिंदीत बोलून सगळ्यांचे स्वागत केले. आमच्या सौ ची नातवंडांसाठी कपडे घेण्याची इच्छा असल्यामुळे लहान मुलांचे कॉटनचे कपडे आहेत का ? म्हणून विचारल्यावर आपको जो कपडे चाहिए वो मिल जाएंगे म्हणत त्यांनी कपडे दाखवायला सुरूवात केली. हं असे कपडे न्यायचे आहेत नातवंडासाठी म्हणून सांगत होती. ठीक आहे, तुला कसे आणि कोणते कपडे पसंत आहेत ते घेऊन टाक म्हणजे तुला समाधान मिळेल अशी संमती देताच तिनेही काही कपडे न्याहळत नातीसाठी प्लाझो अन् टॉपची निवड केली, तर नातूसाठी पठाणी पेहरावाचा झब्बा-कुर्ता घेतला आणि माझ्या आग्रहास्तव तिच्यासाठी एक कुर्ता घेतला. मी आणि मुलाने मात्र काहीही घेतले नाही. बील चुकते केले. दुकानदारांचे नाव आणि भारतातून कधी आले अशी विचारणा केली असता माझे नाव भैयालाल गुप्ता वाराणशीहून आल्यावर आमच्या वडिलांनी नेपाळमध्ये येवून हा धंदा सुरू केला सुमारे पन्नास वर्षापूर्वी, एवढी ख्याली खुशाली झाल्यावर आम्ही पुढे जवळच असलेल्या हॉटेलकडे गप्पा मारत निघालो. इकडे आल्यावर फ्रेश झालो, थोडावेळ आराम केला आणि मस्तपैकी चहा घेतला. दुपारचे जेवण उशिरा झाल्यामुळे रात्रीचे जेवण करण्याची आवश्यकता नव्हती. मात्र मुलांनी काहीतरी खाल्ले आणि थकल्या-भागल्या जीवाला कधी झोप लागली कळलेच नाही.
आज दिनांक १७ फेब्रुवारी काठमांडू – नेपाळहून परतीचा प्रवास म्हणून सकाळचा चहा घेतला आणि बॅगा भरायला घेतल्या, सर्व वापरलेले कपडे, काही वस्तु, मिळालेले मोमेंटो व्यवस्थितपणे भरून झाले. आंघोळी आटोपल्या आणि काही वेळेत जेवण केले. जेवण झाल्यावर दोन अतिरिक्त दिवसाचे हॉटेलचे बील भरले आणि विमानतळाकडे १२ वाजण्याच्या सुमारास टॅक्सी बोलावली. आमच्या सोबतचे पर्यटक न्यायमुर्ती नामदेवराव चव्हाण सोलापूर व त्यांचा परिवार आणि प्रा. डॉ. अशोक पवार, छत्रपती संभाजी नगर यांचे दुस-या दिवशी म्हणजे १८ फेब्रुवारीचे तिकीट असल्यामुळे ते एक दिवस काठमांडूला मुक्कामासाठी राहणार होते. टॅक्सी येईपर्यंत काही वेळ गप्पागोष्टी केल्या, विचारांचे आदान-प्रदान केले. एकदाची टॅक्सी आली, बॅगा व्यवस्थित ठेवल्या आणि हॅलो हाय-बाय झाले आणि विमानतळाच्या दिशेने निघालो नेपाळमधील एक आठवड्याच्या पर्यटनाच्या आठवणी कायम मनात ठेवून !!
समाप्त.
— लेखन : राजाराम जाधव. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
नेपाळचे प्रवासवर्णन सुरेख मांडले आहे.