मला नेहमीच वाटतं, देवाने आपल्याला 32 दात का दिलेत ? 2/3 च द्यायचे म्हणजे लवकर घासून झाले असते म्हणजे एवढ्या दातांची काळजी घेण्याचे श्रम वाचले असते आणि Rc वगैरे करायची वेळ आयुष्यात कमी आली असती. अर्थात दंतवैद्याचे अर्थकारण वेगळेच झाले असते.
अस्मादिकांची एक दाढ फक्त दोनच वर्षे मुक्कामाला होती. आल्या आल्या तिने मान टाकली. तिला मुळीच राहायचं नव्हते माझ्याजवळ. इयत्ता सातवीतच आमची एक परमनंट दाढ काढली. तेंव्हा दात वाचवायचाच हे दंतवैद्याचे ब्रीदवाक्य नव्हते.
लहानपणापासूनच माझं आणि दातांचं वाकडच होतं. माझ्या दातात भरपूर फटी होत्या. पेरूची बी स्केलने माप घेतल्यासारखी बरोबर त्या फटीत जाऊन बसायची. तिची ती आवडती जागा !!! मग एक एक शस्त्र घेऊन तिच्याशी लढाई सुरू व्हायची. पहिले उदबत्तीची काडी मग आगपेटीची काडी शेवटी सेफ्टी पिनच्या सहाय्याने लढाई जिंकली जायची. त्या लढाईत कधी कधी बिचारी मान जायबंदी व्हायची !
माझी आजी म्हणायची जिच्या दातात फटी तिला कोण लुटी ? अगं तिला डेंटिस्ट लुटीच लुटी.
नंतर मात्र दातांनी आपले दात दाखवले ते एकदम विदेशातच. पण अक्कल दाढ हं ! साधी नाही.ज्याला नसते त्याला येते असं म्हणतात. पण अस्मादिक नियमाला अपवाद बरं का!!!
तर एक दिवस कानाच्या मागे दुखायला लागले. मग गाल सुजला. मग मैत्रिणींना फोन करून झाले. छान सल्ले मिळाले आणि त्या बरोबरच वेगवेगळ्या सूपाच्या रेसिपीज पण कळल्या. कारण काहीच खाता येत नव्हते. त्यात दोन दिवस गेले. पेनकिलर घेत होतीच.पण नंतर तिनेही हात टेकले आणि मला गळा काढून मोठ्याने रडावेसे वाटू लागले. पण मोठ्यांने रडायला तोंडाचा आ कुठे होत होता ? फक्त बारीक फट पडत होती.
तितक्यात नवऱ्याला कोणाशी तरी बोलतांना पाहिलं. दुसऱ्या मिनिटाला आम्ही कारमध्ये होतो. आधी ज्या डेंटिस्ट कडे गेलो होतो त्याचा फोन होता. त्याने एका अजून दुसऱ्या डेंटिस्टचा नंबर दिला होता. आणि ताबडतोब तिकडे जायला सांगितले होते.आमची वरात आता तिथे गेली. पण काय माहित तिथे गेल्यावर जरा बर वाटलं. एखाद्या जागेचा प्रभाव असतो नं ! तसं !
पण तोपर्यंत माझा हनुमान झाला होता.
त्या डॉक्टरा़ंनी बघितलं आणि सांगितले कि सर्जरी करावी लागेल. उद्या या. मी तिथेच रडायला लागली. विना आवाजाची !!
मी म्हटलं डॉक्टर आत्ताच्या आत्ता सर्जरी करा. मी इथून जाणारच नाही. मला सहनच नव्हतं होत.
शेवटी संध्याकाळ वर तडजोड झाली. गोरज मुहूर्त होता 6 चा. पण ऑपरेशनसाठी आ कुठे होत होता ! मग काय फॉर्म भरला. सही झाली कारण मला जनरल अनेस्थेशिया द्यावा लागणार होता.
आयुष्यात पहिल्यांदाच ऑपरेशन होणार होतं. नवरा आणि मुलगा दोघांच्या ही चेहऱ्याकडे बघवत नव्हतं. नवऱ्याला म्हटलं मला काही झालं तर दुसर लग्न
कराल ? बरं झालं त्या डाक्टरांना मराठी कळत नव्हतं.
15/20 मिनिटांत मी शुद्धीवर आले तेव्हा हलक हलक वाटतं होत. अक्कल दाढ मासात फसली होती आणि ते आधीच्या डेंटिस्टच्या लक्षातच नाही आलं. तेव्हाच सर्जरी केली असती तर एव्हढे झालेच नसते. भोग या शब्दाचा शब्दशः अर्थ मला चांगलाच कळला होता. म्हणून म्हटल कि कशाला 32 दात. 2/3 च चालले असते.
आम्ही गंमतीत म्हणायचो डोळे दोनच असतात आणि दात बत्तीस म्हणून डेटिंस्टच व्हावे. जास्त स्कोप असतो पैसे कमावण्याचा !!
– लेखन : वर्षा फाटक
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.
टीप : सर्व डेंटिस्ट बंधू भगिनींनी उपरोक्त दंत कथेतील विनोद समजून घ्यावा. त्यांच्या भावना दुखावण्याचा लेखिका किंवा संपादक, पोर्टल यांचा अजिबात उद्देश नाही.

खूपच छान दंतपुराण