उभे चराचर, थांबला संसार,
सारा हाहा:कार, माजलासे.!
श्वापद ही वनी, आभाळात पाणी,
व्यावसायी वाणी, दिसे ची ना.!
शांतता भयाण, आनंदाची वाण,
रोगांची लागण, लागताहे.!
श्वासास ना धीर, नावेस ना तीर,
धर्मासी ही पीर, नोहे बाकी.!
पूजेसी बामण, लंकेसी रावण,
देवाचे स्मरण, भुललासी .!
जंतूचे कारणी, मृत्यूच्या या रणी
यमास पर्वणी, झालीयसी.!
पापाचा डोंगर, व्यसना बहर,
प्राणासी जहर, जाहलासे.!
प्रलय अटळ, दिसे हा जवळ,
टाळी अमंगळ, वाचवी तू.!
ना बंधू ना त्राता, उरलासी आता
जणू मृत्युदाता, उभा दारी.!
पूजा देवभक्ती, जागवून प्रिती,
वाढो आत्मशक्ती, मनोमनी.!
करिता उपाय, टाळूनी अपाय,
धरणी दे ठाय, पका म्हणे.!
रचना : प्रकाश गजानन राणे.